05 August 2020

News Flash

२१४. दुस्तर माथा!

एकनाथी भागवताच्या तिसऱ्या अध्यायाचा प्रारंभ हा सद्गुरूंच्या चरणांना वंदन करून झाला आहे

(संग्रहित छायाचित्र)

एकनाथी भागवताच्या तिसऱ्या अध्यायाचा प्रारंभ हा सद्गुरूंच्या चरणांना वंदन करून झाला आहे. हे वंदनेचे श्लोक मुळातच वाचण्यासारखे आणि वारंवार चिंतन करण्यासारखे आहेत. पण त्यातील काही भाग तेवढा पाहू. एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘हे सद्गुरो! तुझ्या चरणीं जो सद्भावपूर्वक लागला, त्याचा मीपणाच लयाला गेला. अहो, हा जो जीवभाव आहे ना, तो वज्रानंदेखील तुटणारा नाही. पण त्याची तुझ्या चरणांच्या प्रीतीनं राख होते! (‘‘नवल पायांचें कठिणपण। वज्रें न तुटे लिंगदेह जाण। त्याचेंही केलें चूर्ण। अवलीळा चरण लागतां।।२।।’’). जो तुझ्या चरणांचं आवडीनं चिंतन करतो, त्याचा मनुष्यधर्मच नष्ट होतो! (‘‘आवडी पाय चिंतिती दास। त्यांच्या मनुष्यधर्मा होय नाश।’’) आता मनुष्यधर्म नष्ट होणं म्हणजे काय हो? तर, मनाच्या ओढींनुसार जगण्याची धडपड करीत राहणे, हाच तर मनुष्याचा धर्म उरला आहे. मनाच्या ओढींनुसार जगण्याच्या धडपडीतून स्वार्थाधता आली आहे, संकुचितता आली आहे. ती लयाला जाते, असं नाथांना सांगायचं आहे. मग ते म्हणतात, काय सांगावं? या पायांना वंदन केलं तेव्हा केवळ ऐक्यभावच उरला. मग कुणी कुणाला वंदन करावं आणि कुणी कुणाचा नमस्कार स्वीकारावा? सगळं काही तूच आहेस. मी उरलोच नाही. केवळ तू आहेस आणि म्हणून माझ्या निमित्तानं तूच हा ग्रंथ करवून घेत आहेस. मग एकनाथ महाराज तिसऱ्या अध्यायाचा प्रारंभ करताना दुसऱ्या अध्यायाचे सूत्र पुन्हा हाती घेतात आणि एक अनुपम अशी उपमा वापरत भक्तीची थोरवी सांगतात. ते म्हणतात, ‘‘तेथें द्वितीयाध्यायाचे अंतीं। दुस्तर माथा उत्तम-भक्तीं। निरसोनियां भजनस्थिती। भगवत्प्राप्ती पावले।।१६।।’’ उत्तम भक्ती हा दुस्तर माथा आहे! म्हणजे उत्तम भक्तीशिवाय जीवनाला पूर्णत्व नाही; पण उत्तम भक्तीचा हा शिखरमाथा अतिशय दुस्तर आहे. सोपा नाही. तो का सोपा नाही? याचं कारण जीवाच्या मनात असलेला मायेचा प्रभाव! ही माया नेमकी आहे काय व तिच्या पकडीतून सुटण्याचा उपाय कोणता, हे प्रश्न त्यामुळेच साधकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याच प्रश्नांना राजा जनकानं आता स्पर्श केला आहे (‘‘कैशी दुस्तर हरीची माया। पुसावया सादरता झाली राया।’’). तिसऱ्या अध्यायात राजानं चार प्रश्न विचारले आहेत. एकनाथ महाराज सांगतात, ‘‘तृतीयाध्यायीं निरूपण। राजा करील चारी प्रश्न। ‘माया’ आणि तिचे ‘तरण’। ‘ब्रह्म’ तें कोण, ‘कर्म’ तें कैसें।।१८।।’’ म्हणजे माया म्हणजे काय, तिचा तरणोपाय काय, ब्रह्म म्हणजे काय आणि खरे कर्म ते कोणते; हे ते चार प्रश्न आहेत. आणि आपल्या दृष्टीनं मायेची चर्चा ही अतिशय महत्त्वाची आहे. राजा जनक म्हणाला की, हे मुनिवर या मायेनं ब्रह्मदेवालाही सोडलं नाही. मग त्यानंच उत्पन्न केलेल्या जीवांची काय कथा! अहो, सज्ञानांनाही जी भ्रमित करून छळते, जी अजिंक्य आहे, असं श्रुतीही सांगतात, त्या हरीच्या दुस्तर मायेचं विवेचन कृपापूर्वक करावं! अनन्य भक्तांना माया बाधत नाही, एवढंच सांगून थांबू नका, असंही चातुर्यानं सांगत राजा प्रश्नाचा दोर कापू देत नाहीये!

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 12:09 am

Web Title: poor forehead god akp 94
Next Stories
1 २१३. चिवट संग
2 २१२. ज्ञानाचा अहंकार-सापळा
3 २११. धाराप्रवाह
Just Now!
X