चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

सनातन संस्कृती ही अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आहे. जीवन प्रकाशानं भरून टाकणारी आहे. मूर्तीपूजेपासून ते निराकाराच्या ध्यानापर्यंतचा तिचा विराट पल्ला हा माणसातील दिव्यत्व जागवणारा आहे. या मार्गातलं प्रत्येक पाऊल हे माणसाच्या मनात उत्तुंग ध्येयाची इच्छा जागवणारं आणि त्या ध्येयाकडे नेणारं आहे. देवीदेवतांची अनेक रूपं. ज्याच्या मनात ज्या दैवताची भक्ती आपसूक जागी होते त्याच्या उपासनेसाठी कितीतरी आधार आणि साधनं. मग त्या पोथ्या असतील, स्तोत्रं असतील, मंदिरं असतील, मूर्त्यां असतील. ज्याला निर्गुण तत्त्वाची ओढ आहे त्यालाही सगुणातून निर्गुणाकडे नेणाऱ्या वाटा उपलब्ध आहेत. पुढे या सर्व वाटा भक्तीच्या राजमार्गालाच मिळतात. या प्रकाशोपासक संस्कृतीनं त्यामुळे ज्योतीरूप तेववणाऱ्या दिव्याचीही पूजा करावी, यात नवल ते काय! सायंकाळी दिवेलावणीच्या वेळी देवघरात दिवा लावून जी प्रार्थना केली जाते ती आपण अनेकांनी अनेकवेळा लहानपणापासून ऐकली आहेच. त्या प्रार्थनेतल्या पहिल्या चरणांकडेच पहा ना! ही प्रार्थना अशी आहे : शुभंकरोति कल्याणं। आरोग्यम् धनसंपदा। शत्रुबुद्धि विनाशाय। दीपज्योती नमोऽस्तुते।। हे चरण अनेक सद्विचारांची प्रेरणा देतात. चिंतनाची प्रेरणा देतात. याच चरणांत थोडा बदल मी करतो. त्या बदलानंतर साधकासाठी हा श्लोक असा होतो : शुभंकरोति कल्याणं। आरोग्यम् धनसंपदा। शत्रुबुद्धि विनाशाय। आत्म-ज्योती नमोऽस्तुते!! हा श्लोक साधकांना काय सांगतो? तर, आत्मकल्याणाची जर इच्छा असेल, तर जे शुभ आहे तेच करा! शुभ म्हणजे काय? तर जे सर्व बाजूनी ईश्वरोन्मुख आहे ते. म्हणजे व्यवहारातदेखील जी कोणती कृती करीत असाल, तर त्यात भगवंताचं स्मरण ठेवा म्हणजेच ती कृती शुभ होऊन जाईल. कारण देहानं कृती घडत असेल, पण मन चिंतनात असेल. शुभचिंतनात सदिच्छा आणि सद्विचारच जागृत होतात. अशुभाकडे सुरू असलेली घसरण आपोआप ओसरली असते. मग ‘आरोग्य’ आणि ‘धनसंपदा’ अर्थात देह आणि भौतिक संपदा या दोन्ही गोष्टींचाही आत्मकल्याणासाठीच वापर सुरू होतो! देह हा केवळ साधनेसाठी आहे, हे उमगतं आणि भौतिकाचा उपयोगही केवळ साधनेसाठीच केला जातो. हे घडलं की काय होईल? शत्रुबुद्धीचा विनाश होईल. माउली म्हणतात ना? ‘खळांची व्यंकटी सांडो’ म्हणजे दुर्जनांच्या मनाचा वाकडेपणा सांडो, दुर्जनांना सांडायचं नाही, नष्ट करायचं नाही. मनाचा वाकडेपणा गेला की दुर्जनाचं दुर्जनत्व कुठून उरणार? तर इथंही जी शत्रुबुद्धी आहे ना, ती आपल्यातच आहे! आत्मकल्याणाच्या आड आपणच येत असतो. ज्या विपरीत बुद्धीमुळे हे संकट ओढवतं त्या विपरीत बुद्धीचा निरास इथं अपेक्षिला आहे. आत्मशक्तीला इथं नमस्कार केला आहे. ही आत्मज्योती हृदयात तेवू लागली की हृदयाचा गाभारा प्रकाशानं भरून जातो. प्रकाश किरणांचं बोट पकडून निश्चयानं, निर्धारानं आणि भावतन्मयतेनं चालू लागतो!

(एकात्मयोग हे सदर सोमवारी प्रसिद्ध होईल.)