16 January 2021

News Flash

विशाल विजय माथुर

विशाललाही आम्हा देशी लोकांमध्ये मिसळताना सुरुवातीच्या काळात खूप त्रास झाला असावा

विशाल जयपूरचा. विशालचे वडील विजय माथुर जयपूर युनिव्हर्सिटीच्या ड्रामा डिपार्टमेंटचे हेड होते.

विशालचा विचार मनात आला की शापित राजपुत्राची गोष्ट आठवते. जो कुठल्यातरी चेटकिणीच्या शापामुळे बेडकाच्या शरीरात बंदिस्त झालेला असायचा. किंवा चेकॉव्हच्या रशियन नाटकांचे नायक आठवतात.. जे आपल्या परिस्थितीच्या पिंजऱ्यात अडकून दूर क्षितिजावर दिसणाऱ्या एखाद्या धुसर आशेकडे नजर लावून बसलेले असायचे. पण यामुळे माझा हा मित्र गुडघ्यापर्यंत चेहरा ओढून, जगाचा भार खांद्यावर असल्यासारखा वावरणारा एखादा ट्रॅजिडी किंग आहे, असा जर कुणाचा समज होत असेल तर ते साफ चूक आहे. आजही विशाल विजय माथुर भेटला की तुम्ही खूप हसता, खूप खाता आणि मग त्या भेटीच्या आठवणी कितीतरी दिवस मनात दरवळत ठेवता.

विशाल जयपूरचा. विशालचे वडील विजय माथुर जयपूर युनिव्हर्सिटीच्या ड्रामा डिपार्टमेंटचे हेड होते. ते राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे माजी विद्यार्थी होते आणि त्यांचा हा सुपुत्र माझा बॅचमेट झाला होता. सहा फुटाला थोडी कमी उंची, जिममध्ये जाऊन तयार केलेलं कडक शरीर, डोक्यावरून कपाळावर आणि कपाळावरून डोळ्यांवर ओसंडणारे केस असा विशाल आजही आठवतो. त्याचे वडीलही रा. ना. वि.चे माजी विद्यार्थी असल्यामुळे विशालला रॅगिंगच्या काळात ‘पासआऊट कोटा’ असं नाव पडलं. आमचं एकत्र रॅगिंग चहाच्या दुकानावर चाललं होतं. ते घेणाऱ्या सीनियरनं विशालला विचारलं, ‘‘बता बे, इससे पहले कौनसा नाटक किया है?’’ ‘‘दिमाग से पैदल..’’ विशाल बोलू लागला. ‘‘ये नाटक का नाम है, या तेरा इंट्रोडक्शन है?’’ मला हा शेरा अपेक्षितच होता. तेव्हा मला कळलं, की विशालनं एन. एस. डी.ला यायच्या आधी फारसं थिएटर केलं नव्हतं. त्यानं जी नाटकं केली होती ती त्याच्या वडिलांच्याच दिग्दर्शनाखाली केली होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात आम्हालाही उगीच वाटायचं, की हा वशिल्याचा कॅन्डिडेट आहे की काय?

विशाललाही आम्हा देशी लोकांमध्ये मिसळताना सुरुवातीच्या काळात खूप त्रास झाला असावा. मुळात रा. ना. वि.मध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून मुलं-मुली येतात. बऱ्याच लोकांची हिंदी बोलायचीच बोंब असते. आणि काहींना तर इंग्रजी हे एक भूतच वाटत असतं. तिथं आमचा हा ‘वॉकिंग इंग्लिश, टॉकिंग इंग्लिश’ मित्र म्हणजे बटाटय़ाच्या टोपलीत पांढरा कांदा येऊन पडावा तसा वाटत होता. मला असं वाटतं, की मुळात माझी आणि विशालची मैत्री झाली, कारण आम्हा वीसजणांच्या बॅचमध्ये तो आणि आमचा आणखी एखादा मित्र सोडला तर मलाच बऱ्यापैकी इंग्रजी येत होतं. हॉस्टेल जीवनाच्या सुरुवातीच्या काळात विशालला खूप ‘अ‍ॅडजेस्टमेंट इश्यूज्’ झाले असावेत. शुक्रवार आला की तो होमसिक होऊ लागायचा. आणि शनिवारी तो सरळ जयपूरला पळून जायचा तो कधी कधी थेट सोमवारी दुपारच्याच वर्गाला उगवायचा. यासाठी त्याची फॅकल्टीकडूनही बऱ्याचदा कानउघाडणी व्हायची.

पण त्याचं हे दर आठवडय़ाला घरी जाणं आमच्या पथ्यावर पडत होतं. कारण परत येताना त्याची आई खाण्यापिण्याची भरपूर रसद त्याच्याबरोबर पाठवत असे. विशाल हा आमच्या हॉस्टेलची ‘अन्नपूर्णा’ होता. रात्री-अपरात्री, पहाटे कुठल्याही वेळी विशालच्या खोलीत खायला काही ना काहीतरी मिळतच असे. आणि विशालही दारी आलेल्या याचकाला कधीच रिक्त हातानं परत पाठवीत नसे. एकदा त्याच्या आईनं शुद्ध देशी तुपात बनवलेलं मटण पाठवलं होतं. विशालनं डबा उघडला. या दिवशी कसं कोण जाणे, हॉस्टेलवर फर्स्ट इयरचा मी एकटाच होतो. बाकी लोक सिनेमाला गेले होते. आणि मी तो सिनेमा आधीच पाहिलेला असल्यामुळे भिंतीला पाय लावून आयुष्याचा विचार करत पडलो होतो. पण काहीशा झणझणीत वासानं मी उठून बसलो आणि वासाच्या मुळाचा शोध घेत निघालो. मटणानं भरलेला डबा घेऊन विशाल हलवायासारखा मांडी ठोकून बसला होता. ‘‘आजा मेरी जान! मां का प्यार आया है..’’ असं म्हणत त्यानं मला आमंत्रण दिलं. आणि डॉरमेट्रीच्या करकरत्या खुच्र्यावर बसून आम्हा दोघांमध्येच जी मेजवानी झडली, तो आमच्या मैत्रीचा पाया! त्या रात्रीपर्यंत विशाल माझा बॅचमेट होता. त्या रात्री तो माझा मित्र झाला. तसे आम्हा दोघांना जवळ आणणारे अनेक दुवे आहेत. अमिताभ बच्चन हा त्यातलाच एक. आम्ही दोघंही एकमेकांमध्ये अमिताभचा उल्लेख ‘पप्पा’ असा करत असू. आम्ही पहिल्या वर्षांला असताना ‘कौन बनेगा करोडपती’चा पहिला सीझन सुरू झाला होता. ‘पप्पां’ चं नैमित्तिक दर्शन घेण्यासाठी मी आणि विशालनं स्वखर्चानं आमच्या मेसमधला बिघडलेला टी. व्ही. दुरूस्त करून घेतला होता. एन. एस. डी.चा कोर्स झाला की आपण थेट बॉलीवूडच्या दिशेनं घोडं फेकणार आहोत, हे विशालचं खूप आधीच ठरलं होतं. रा. ना. वि.मधल्या सगळ्याच विद्यार्थ्यांसमोर स्कूलची तीन वर्ष संपल्यावर ‘आपण नेमकं काय करायचं?’ हा प्रश्न असतोच. मी मुंबईचाच असल्यानं माझ्यासाठी हा प्रश्नच नव्हता. बरेच लोक मग एन. एस. डी.च्याच ‘रिपर्टरी कंपनी’मध्ये नोकरीला लागतात. एन. एस. डी. रिपर्टरी कंपनी ही आज देशातील सगळ्यात मोठी आणि श्रीमंत नाटक कंपनी आहे. पण तिथे अभिनेत्याचा सरकारी कर्मचारी होतो. आपल्या जुन्या नाटक कंपन्यांच्याच धर्तीवर ही कंपनी चालते. रिपर्टरीतर्फे उत्तमोत्तम नाटकं सादर होतात. पण अभिनेत्यांचा जॉब नऊ ते पाच धाटणीचा. आणि मग हे अभिनेते अभिनयही नोकरी केल्यासारखे करायला लागतात. मी, विशाल आणि आमच्यासारखे मोजके ‘बॉम्बे लोग’ रिपर्टरी- इच्छुकांची मनसोक्त टिंगल करायचो. ‘‘साला सरकारी अभिनेता बनेगा!’’ असं म्हणत आमच्याच मित्रांची हेटाळणी करायचो. आपण पासआऊट होऊन मुंबईला जाऊ तेव्हा यश चोप्रा, सुभाष घई आणि रामगोपाल वर्मा मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनबाहेर पायघडय़ा घालून उभे असणार आहेत असा आमचा कधीच गैरसमज नव्हता. पण सरकारी लांगुलचालन करण्यापेक्षा आपण आपल्या दगडांवर लाथा मारून किंवा डोकी आपटून पाणी काढू असा उगीचच एक दुरभिमान आमच्या ठायी होता. ‘‘हमारे लिये एन. एस. डी. एज्युकेशनल इन्स्टिटय़ूट है, एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज नहीं..’’ असं बाणेदार उत्तर मी माझ्या शेवटच्या वर्षीच्या वायवामध्ये दिलं होतं आणि विशालही थोडय़ाफार फरकानं हेच बोलला असणार. त्यामुळे शाळेतली तीन वर्ष आम्ही आमच्या मस्तीत जगलो. पहिल्या वर्षांची दुसरी टर्म सुरू झाली तेव्हा विशाल जयपूरहून त्याची ‘चेतक’ स्कूटर घेऊन आला आणि मग आमच्यासाठी दिल्ली छोटी झाली. रात्रीच्या कुठल्याही प्रहरी कुठेही बोकाळण्याचं साधनच आमच्या हाती लागलं होतं.  विशालबरोबर मी जी दिल्ली पाहिली त्याच्या खूप रम्य आठवणी माझ्या मनात मोरपिसासारख्या आहेत. रॅगिंगच्या काळात ‘पासआऊट कोटा’ हे गमतीत पडलेलं नाव त्याच्या कुठेतरी जिव्हारी लागलं असावं, कारण नंतर विशालनं एन. एस. डी.ची लायब्ररी गिळंकृत करण्याचा चंगच बांधला. या मुलानं तिथल्या तीन वर्षांत जेवढी नाटकं वाचली तेवढी एन. एस. डी.च्या इतिहासात कुणी वाचली नसतील. आपण वशिल्याचे तट्ट नाही आहोत, हे सिद्ध करायला निघाल्यासारखाच तो लायब्ररीत शिरायचा. बॅचच्या कुठल्याच भांडणात विशाल कधीच पडला नाही. त्यामुळे याला कुणाशी फारसं देणंघेणं नाही असंही वाटायचं. पण एखादा माणूस आजारी पडला की विशाल फ्लोरेंस नाइटिंगेलच्या आस्थेनं त्याची शुश्रूषा करत असे.

आमचं तिसरं वर्ष संपत आलं होतं. आता एन. एस. डी.नावाच्या सुरक्षित अंडय़ातून बाहेर पडून बाहेरच्या खऱ्या जगात जाण्याची वेळ आली आहे, या जाणिवेची धग प्रत्येकालाच रात्र रात्र जागं ठेवत होती. त्याचवेळी फरहान अख्तरच्या ‘लक्ष्य’ या सिनेमाची ऑडिशन्स सुरू झाली. रा. ना. वि.मध्ये शिकत असताना आम्हाला कुठेही बाहेर काम करण्याची किंवा ऑडिशन्स देण्याची परवानगी नसते. पण तो नियम धाब्यावर बसवून आमच्यापैकी प्रत्येक जण ऑडिशन देऊन आला होता. ‘सिनेमा तयार होऊन रिलीज होईल तेव्हा आपण पासआऊट झालेलो असू..’ या जाणिवेमुळे आम्ही निश्चिंत होतो. खरं सांगायचं तर ऑडिशन देतानाच ‘आपलं होणार तर नाहीये. ऑडिशन देऊन तर बघू!’ याच भावनेनं बरेच जण गेले होते. आणि विशालचं कास्टिंग झालं. हृतिक रोशनबरोबर मिलिट्री अकॅडमीमध्ये असलेल्या मित्राचा रोल. आम्ही सगळेच उडालो. आमच्या बॅचपैकी बॉलीवूडमध्ये कुणाला संधी असलीच तर ती विशालला आहे, हे आम्हा सगळ्यांनाच वाटत होतं; पण ती संधी शाळेची तीन वर्ष संपायचीही वाट पाहणार नाही, याची जाणीव नव्हती. रा. ना. वि.मध्ये चक्क आजारपणाचं कारण सांगून विशाल ‘लक्ष्य’च्या शूटिंगला निघून गेला. तुम्ही ‘लक्ष्य’ पाहिला असेल तर त्यात प्रीती झिंटाची कानउघाडणी करणाऱ्या एका सैनिकाचा सीन आहे. तो सैनिक म्हणजेच माझा मित्र- विशाल विजय माथुर.

एन. एस. डी.ची तीन वर्ष संपली. मी मुंबईला परतलो. विशाल कधी येतोय याची आतुरतेनं वाट पाहत होतो. आणि तो आला. ‘‘मॅक्स! (विशाल मला याच नावानं हाक मारतो.) ‘लक्ष्य’ का पॅचवर्क है. हॉटेल सन अ‍ॅन्ड सॅन्ड में रुका हूं. पर अब वापस नहीं जाऊंगा. नाऊ बॉम्बे इज माय होम.’’ ‘‘बॉम्बे नहीं बे नॉर्थ इंडियन! मुंबई!’’ मी उगीचच प्रांतवादी होण्याचा प्रयत्न केला. ‘‘जय मुंबई.. जय महाराष्ट्र!’’ पलीकडून जवाब आला. विशालचं शूटिंग आटोपलं. मी त्याच्या बॅगा उचलून त्याला माझ्या घरी घेऊन आलो. आपला भाऊच शिक्षण संपवून घरी आल्यासारखं मला वाटत होतं. दोन दिवस दिल्लीसारखीच तफ्री करण्यात आणि आई-बाबांच्या कोडकौतुकात गेले. तिसऱ्या दिवशी विशाल म्हणाला, ‘‘मॅक्स! अब खुद का ठिकाना ढूंढना पडेगा यार! ब्रिंग ऑन द इस्टेट एजंटस्.’’ मला त्या दिवशी नेमकं काम होतं. माझे वडील म्हणाले, ‘‘मी जातो याच्याबरोबर. याच्या घराचं नक्की करून टाकतो आज.’’ पण विशाल बाबांना ‘तकलीफ’ द्यायला तयार नव्हता. ‘‘आप मुझे सिर्फ इस्टेट एजंट का नंबर दे दो अंकल. आय विल मॅनेज.’’ मी माझ्या कामाला निघालो. संध्याकाळी सहाला अंधेरीच्या मॅक्डॉनल्डस्ला भेटायचं ठरलं. माझं काम संपवून मी विशालला अंधेरीच्या मॅकडोनल्डस्ला संध्याकाळी भेटलो. आणि माझा हा देखणा, राजबिंडा मित्र अचानक माझ्यासमोर ढसाढसा रडू लागला.

का?

पुढच्या रविवारी..

(क्रमश:)

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 4:10 am

Web Title: chinmay mandlekar article on vishal vijay mathur friendship
Next Stories
1 अमित सुळे
2 कल्पना
3 जनार्दनकाका
Just Now!
X