16 January 2021

News Flash

अभय सर

जी वाट मला ठाऊकच नव्हती त्या वाटेवर अलगद बोट धरून चालायला शिकवणारा वाटाडय़ा झाला.

एका नगण्य फोन कॉलमधून आयुष्य आपल्याला एका वेगळ्याच प्रदेशात घेऊन जाणार आहे, याची मला कल्पना नव्हती. ज्या माणसानं मला तो फोन ज्या कामासाठी केला होता त्या कामाशी त्याचा काहीच संबंध नव्हता. त्यानं त्या संभाषणात मला आणखी एका माणसाला फोन करायला सांगितलं. त्या आणखी एका माणसाचाही त्या गोष्टीशी दुरान्वये संबंध नव्हता. पण या सगळ्या फोन मालिकेच्या शेवटी जो माणूस मला भेटला, तो माझा गुरू झाला, पितृतुल्य झाला. जी वाट मला ठाऊकच नव्हती त्या वाटेवर अलगद बोट धरून चालायला शिकवणारा वाटाडय़ा झाला.

वर्ष होतं २००३. माझा अत्यंत जिवलग मित्र सुनील भोसले याचा मला फोन आला, ‘‘निरु पत्कीला फोन कर. तुझ्यासाठी काहीतरी काम आहे बहुतेक.’’

‘‘कोण निरु पत्की?’’ मी विचारलं.

‘‘अरे, तुझा कॉलेजमधला सीनियर आहे. सध्या ‘बालाजी’मध्ये असतो. निरंजन पत्की. नंबर घे फोन कर.’’

आपल्याला थेट ‘बालाजी’च्या भट्टीतच काम मिळतंय की काय या हुरहुरीनं मी निरंजन पत्की यांना फोन लावला. ‘‘अरे, माझा एक मित्र आहे. ‘वादळवाट’ म्हणून एक सीरियल येतेय सध्या, तिचा रायटर आहे. त्याला डायलॉगसाठी मदतीला कोणीतरी हवंय.’’

डायलॉग? मला काही कळेना. ‘‘पण निरंजन, मी रायटर नाही. मला वाटलं होतं अ‍ॅक्टिंगचं काहीतरी काम आहे.’’

‘‘अरे, पण तू आता काहीतरी एकांकिका लिहिलीस ना?’’ निरंजननं विचारलं.

‘‘हो. ते असंच. प्रयत्न म्हणून. पण मला सीरियल बिरीयल लिहिता येणार नाही.’’

‘‘भेटून तर घे. नंबर पाठवतो तुला. फोन कर.’’

‘बालाजी’त काम केल्यामुळे असेल कदाचित निरंजनमध्ये एक वेगळीच चिकाटी दिसली. मी नंबर घेतला. ‘‘नाव काय यांचं?’’ मी जवळ जवळ फोन ठेवेपर्यंत हा प्रश्न विचारायचं विसरलो होतो.

‘‘अभय परांजपे.’’

फोन ठेवल्यावर मी काही वेळ विचार करत राहिलो. ‘अभय परांजपे’.. नाव खूप   ओळखीचं आहे. कुठे भेटलोय यांना? किंवा कुठेतरी वाचलंय हे नाव! आणि अचानक ‘और बीस साल पहले..’ म्हणताना भारत भूषणछाप नटमंडळी जसा चेहरा करायचे तसा माझा चेहरा झाला. मला माझे आठवी-नववीचे आडनिडे दिवस आठवले..

आमचे वडील शिवसैनिक. त्यामुळे घरात अनेक वर्ष ‘मार्मिक’ यायचा. अंक व्यंगचित्रांनी खच्चून भरलेला असल्यामुळे तो चाळायला आवडायचा. शेवट शेवटच्या पानांवर सिनेमाचं परीक्षण यायचं. ते मात्र आवर्जून वाचायचो. ते परीक्षण लिहिणारे हेच होते- ‘अभय  परांजपे.’ त्यांचा एक लेख तर मी जवळ जवळ पाठ केला होता. ‘मुंबई, पाऊस आणि बटाटावडा.’ रामगोपाल वर्माच्या ‘सत्या’ या चित्रपटाची समीक्षा होती ती. ‘पटकथा बंदिस्त होती, छायाचित्रण पूरक होतं’ छाप ठोकळेबाज समीक्षा लेखांपेक्षा खूप वेगळा असा तो लेख. एका आवडलेल्या सिनेमाचं मनापासून केलेलं रसग्रहण होतं ते. जितके वेळा मी ‘सत्या’ पाहिला त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळा मी तो लेख वाचला.

माझ्या या इवल्याशा फ्लॅशबॅकमधून बाहेर आल्यावर मी निरंजन पत्कीनं दिलेल्या त्या नंबरवर फोन केला. पलीकडून खर्जातल्या आवाजात ‘हॅलो’ आलं. ‘‘सर, माझं नाव चिन्मय मांडलेकर. मला निरंजन पत्कीनं तुम्हाला फोन..’’

‘‘दुपारी तीन वाजता कुणालाही फोन करायचा नसतो. ही झोपायची वेळ असते.’’ झोपमोड झाल्यानंतरचा त्रासिक सूर नव्हता, पण तरी आवाजात एक जरब होती.

‘‘सॉरी सर. तुम्ही पुण्याचे आहात हे मला माहीत नव्हतं.’’ मला आजही हे कळलेलं नाही, की त्यावेळी हे वाक्य माझ्या तोंडून कसं निसटलं. अनेक दिवस काही काम नसल्याचं फ्रस्ट्रेशन बोलून गेलं होतं बहुधा. पलीकडे एक लांबलचक पॉज गेला. मग पुन्हा खर्जातला आवाज उमटला, ‘‘सहा वाजता फोन कर.’’ फोन ठेवला गेला. आपण माती खाल्लेली आहे याची मनोमन खात्री पटलीच होती. पण गरजवंताला अक्कल नसते, त्यामुळे सहा वाजता पुन्हा फोन लावला. ‘‘सर नमस्कार, मी चिन्मय मांडलेकर. मगाशी मी तुम्हाला फोन..’’

‘‘राहतोस कुठे?’’ परांजपे थेट मुद्दय़ावर आले.

‘‘अंधेरी.’’

‘‘मला साडेआठला पाल्र्यात भेट. सद्गुरू हॉटेलच्या इथे.’’ मी कोण सद्गुरू, कुठला सद्गुरू विचारायच्या आधी फोन ठेवण्यात आला होता.

पार्ला मार्केटमधलं सद्गुरू हे हॉटेल तेव्हा बंद होतं. पण तिथे जो ‘कट्टा’ तयार झाला होता, तिथे मंडळी सिगारेट फुंकायला, चहा प्यायला आणि गप्पा ठोकायला जमत. साडेआठ वाजता मी सद्गुरू नाका गाठला. आणि तिथे माझा हा गुरू मला पहिल्यांदा भेटला. आवाजाला शोभेलसा भारदस्त देह, एका हातात सिगारेट, अंगात गडद निळ्या रंगाचा कुर्ता होता अन् चष्म्यातून थेट रोखून पाहणारे आणि कधी कधी किंचित तिरळे वाटणारे फिकट तपकिरी डोळे. तिथल्याच एका दोन बाकडय़ांच्या हॉटेलमध्ये आम्ही बसलो. ‘‘सर, मी या आधी फारसं काही लिहिलेलं नाही.’’

‘‘जे वर्षांनुवर्ष लिहितायत ते तरी बरं कुठे लिहितायत? आज दुपारी फोनवर जी हुशारी दाखवलीस तेवढी जरी जमली तरी पुरे आहे मला. आपण करतोय काम.’’ एवढा आटोपशीर जॉब इंटरव्ह्यू फारच कमी लोकांच्या नशिबी आला असेल.

अभय सर ‘वादळवाट’चे मुख्य लेखक होते. कथा-पटकथा त्यांची. बरोबरीनं संवाद लिहिण्यासाठी त्यांना कुणीतरी जोडीदार हवा होता. तिथे माझी नेमणूक झाली. मी पहिल्याच दिवशी जे सीन लिहिले, त्या हस्तलिखिताचा गठ्ठा घेऊन सरांच्या घरी गेलो. तेव्हा सर सांताक्रूझच्या ‘इंडियन एअरलाइन्स’ कॉलनीत राहात होते. त्यांच्या पत्नी- चारू मॅडम इंडियन एअरलाइन्समध्ये होत्या. मी लिहिलेल्या कागदांवरून त्यांनी नजर फिरवली. ‘‘कुठल्या भाषेत लिहिलंयस हे?’’ त्यांनी मला आश्चर्यानं विचारलं.

‘‘सर.. मराठी.’’ माझं अक्षर पाहून उमटणारी प्रतिक्रिया मला नवीन नव्हती.

‘‘उद्यापासून टायपिंग शिकायचं. प्रायॉरिटीनं.’’ गुरुआज्ञा झाली. ‘‘तुझं हे वाचून नट चकणे झालेले आपल्याला परवडणार नाहीत.’’

‘वादळवाट’च्या संवाद लेखनात मी रुळलो. सरांनी सांगितेलेले सीन्स लिहून त्यांना द्यायचे आणि मग परीक्षेच्या निकालाची वाट पाहावी तशी त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहायची. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून मी त्याच दिवसापासून कंप्युटरवर टाइप करायला सुरुवात केली. पहिला एक पानाचा सीन, अक्षरं शोधत शोधत टाइप करायला साडेतीन तास लागले. आधी मी पेनानं सीन कागदावर लिहून काढे आणि मग तो माथेरानच्या मिनी ट्रेनच्या वेगानं टाइप करे. पण हळूहळू पेनाबरोबरचं नातं तुटत गेलं आणि कीबोर्डबरोबरचं दृढ होत गेलं. एके दिवशी सर म्हणाले, ‘‘दिवसभराचे सीन लिहून झाले, की एरवी काय करतोस?’’

‘‘काही नाही सर. टाइमपास! प्रायोगिक नाटक करतो. तालमी असतात कधी कधी.’’

‘‘स्क्रीनप्लेसाठी माझ्याबरोबर बसत जा.’’

पूर्वी गवई जेव्हा एखाद्या गुरूचा गंडा बांधायचे तेव्हा ते शिष्य जवळजवळ गुरुनिवासीच मुक्कामाला असायचे. संगीत शिक्षणाबरोबर गुरूची अडलीनडली कामंही करायचे आणि गुरूही मोठय़ा ममत्वानं त्यांना शिकवायचे. मी काठी-कमंडलू घेऊन कधी अभय सरांकडे राहायला नाही गेलो आणि त्यांनी कधीच मला त्यांची अडलीनडली कामं करायला सांगितली नाहीत; पण बाकी आमचं नातं अशाच गुरू-शिष्यासारखं होत गेलं. सर पटकथा करायला बसले, की मी त्यांच्याबरोबर बसायचो. माझं काम फक्त गणपतीचं असायचं. नंतर नंतर त्यांच्या तालमीत थोडा टणक झाल्यावर त्यांच्या कल्पनाशक्तीचा बाऊन्सिंग बोर्डही झालो. जशा आरत्या वर्षांनुवर्ष ऐकून ऐकून तोंडावर कधी चढतात हे आपल्याला कळतही नाही, तसेच अभय सरांचे पटकथा लेखनातले गुण माझ्या अंगी कधी बाणवले गेले माझं मलाच कळलं नाही. चर्चा करताना ते मोकळेपणानं चर्चा करायचे. ‘हा आपला साहाय्यक आहे, वयानं लहान आहे, याच्याबरोबर नीड टू नो बेसिसवरच संबंध ठेवावेत’ असा त्यांचा दृष्टिकोन कधीच नव्हता. पत्रकारिता-जाहिरात क्षेत्रात आणि मालिका-चित्रपट लेखन यांत त्यांनी गाठीशी बांधलेलं जे संचित होतं ते त्यांनी कर्णाच्या दातृत्वानं माझ्यासमोर मोकळं केलं.

घरी बसून लिहायचा त्यांना कंटाळा. नंतर त्यांच्याच गोरेगावच्या ‘सामना परिवार’च्या जागेत आम्ही ऑफिसही केलं. पण सर पटकथा करायची म्हटली, की ‘बाहेर जाऊया’चा धोशा लावायचे. मग पुणे, दापोली, अलिबाग, चौल, वसई, महाबळेश्वर.. वाट फुटेल तिथे जायचो. कधी कधी मुंबईतून गाडी काढताना कुठे चाललो हे ठरलेलंच नसायचं. मी जाताना घरी ‘अभय सरांबरोबर जातोय.’ एवढंच सांगून निघत असे. एकदा अशीच गाडी निघाली. जे.व्ही.एल.आर.ला गाडी वळवतानाच सर म्हणाले, ‘‘आपण सतत पुण्याच्याच बाजूला जातो. आज आग्रा रोड पकडून जाऊ. नाशिक बिशिक कुठेतरी.’’ पावसाळ्याचे दिवस होते. शाळेला बुट्टी मारून पळालेल्या मुलांसारखे आम्ही दिवसभर उनाडक्या करत माळशेजपर्यंत  येऊन पोहोचलो. तिथे ‘पळू’ नावाचं एक गाव आहे. तिथे एक बंगल्यांची कॉलनी होऊ घातली होती. सॅम्पल फ्लॅट रेडी होता. तीन दिवस आम्ही त्या सॅम्पल फ्लॅटमध्ये राहिलो. ‘वादळवाट’ची पटकथा आपल्या या कुटीत लिहिली जाणार म्हटल्यावर मालक खूश होता. त्यानं दिमतीला माणसं दिली. मागे काळाकभिन्न डोंगर, धबधबा.. अशा सगळ्या थाटात आम्ही तीन दिवस तिथं राहून ‘वादळवाट’ची पुढची पटकथा रचत होतो. ‘‘या जागेचा सगळ्यात मोठा फायदा काय? इथे रेंज नाही.’’ दुपारी बीयरचा ग्लास खाली ठेवता ठेवत सर म्हणाले.

तीन दिवसांनी आम्ही जेव्हा परत रेंजमध्ये आलो तेव्हा मुंबईच्या दिशेनं भसाभस मेसेज आले. आम्ही दोघं पृथ्वीतलावरून नेमके कुठे गायब झालो होतो, याची काळजी अभयसरांच्याही घरी लागली होती आणि माझ्याही!

(क्रमश:)

– चिन्मय मांडलेकर

aquarian2279@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2017 2:51 am

Web Title: chinmay mandlekar articles in marathi on abhay paranjape
Next Stories
1 संगीतदादा..!
2 शशांक गणेश सोळंकी
3 शशांक गणेश सोळंकी
Just Now!
X