16 January 2021

News Flash

शशांक गणेश सोळंकी

शशांक सोळंकी हा फक्त पैसे लावणारा किंवा जोखीम उचलणारा निर्माता नाही.

८० आणि ९० च्या दशकात खिशात राजीनामा घेऊन फिरणाऱ्या पोलीस किंवा सरकारी अधिकाऱ्याबद्दल विलक्षण कौतुक असायचं. एकूणच व्यवस्थेविरुद्ध बंड करणाऱ्यांबद्दल मनात एक कुतूहलमिश्रित आदर असायचा. पण ग्लोबलायझेशननंतर जसजसा कॉपरेरेट कल्चरनं सगळीकडे प्रवेश केला, तसं सगळ्यांचंच बंड हळूहळू थंड होत गेलेलं दिसतं. ९० च्या दशकानंतर ज्या वेगानं गँगस्टर्स नाहीसे झाले, त्याच वेगानं खिशात राजीनामा घेऊन फिरणारे ते बाणेदार अधिकारीही! तात्त्विक वादांमुळे किंवा पटत नाही म्हणून व्यवस्थेला आणि पर्यायानं उत्पन्नाच्या साधनाला लाथाडणारे आजच्या जगात मूर्ख ठरतात. आपल्या डोक्यात बंडाचा विचार आलाच तर महिन्यातून एकदा बँकेकडून येणाऱ्या ‘अमाऊंट  हॅज बिन क्रेडिटेड’ या मेसेजमध्ये सगळी बंडं शांत करायची ताकद असते. त्यात ‘निर्माता’ या प्राणिविशेषाच्या खांद्यावर जगाचं ओझं असतं. आपल्याकडे एक चुकीची समजूत आहे. ज्याच्याकडे पैसा.. तो निर्माता! आपल्याला ‘निर्माता’ म्हटला की तो संगमरवरी वाडय़ामध्ये मखमली गाद्यांवर लोळत पडणारा लक्ष्मीपुत्रच वाटतो. पण वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. जो जोखीम उचलतो, तो निर्माता. एखादा चित्रपट किंवा मालिका बनवण्याची जोखीम. मग ती बनवण्यासाठी बऱ्याचदा तो कुठूनतरी पैसे उचलतो. ते पैसे त्याला व्याजाने परत करायचे असतात. मग त्याची कलाकृती पैसा कमावो अथवा न कमावो. कलाकारांना, तंत्रज्ञांना त्याला पैसे द्यायचे असतात; त्याला नफा होवो की तोटा! अर्थात आपल्याकडे कोटय़वधीचा नफा कमावूनही कलाकारांचे पैसे न देणारे नतद्रष्ट निर्माते आहेतच. पण मुद्दा असा की, निर्मात्याच्या डोक्यावर ही सगळीच ओझी असतात. आणि एवढी ओझी वाहणाऱ्याला मान आणि पाठीचा कणा ताठ ठेवणं मुश्कील ही नहीं, नामुमकीन असतं. शशांक सोळंकींच्या बाबतीत एक गमतीदार रेकॉर्ड असा आहे की त्यांच्या नावावर ‘वादळवाट’,‘अवघाची संसार’, ‘तू तिथे मी’सारख्या दीर्घकाळ चाललेल्या यशस्वी मालिका आहेत, तशाच ‘कन्यादान’, ‘बालपण देगा देवा’ अशा अकाली बंद पडलेल्या मालिकाही आहेत. आणि याचं कारण कुठेतरी हेच आहे, की आजही त्यांच्या खिशात राजीनामा तयार असतो. ‘चॅनल इज ऑलवेज राइट’ हेआजच्या टेलिव्हिजन जगताचं सत्य झालेलं असतानाही, ते अजूनही न पटलेल्या मुद्दय़ांवर हिरीरीनं वाद घालतात. भांडतात. चिडतात. पुन्हा कधीही काम न करण्याची शपथ घेतात. आणि पुन्हा काही दिवसांनी नवीन गोष्ट सांगण्याच्या ऊर्मीनं त्याच चॅनलबरोबर, त्याच लोकांबरोबर नवी मालिका उभी करण्याच्या कामाला त्याच जिद्दीनं भिडतात.

शशांक सोळंकी हा फक्त पैसे लावणारा किंवा जोखीम उचलणारा निर्माता नाही. त्यांना गोष्टी सांगायला आवडतात. कधीतरी अचानक फोन येतो- ‘‘तू मला कधीच फोन करत नाहीस रेऽऽ! आय अ‍ॅम द वन हू ऑलवेज कॉल्स यू. चल ना, नवीन गोष्टी (सोळंकी-भाषेत ‘गोस्टी’) करू या.’’ त्यांच्या गोरेगावच्या घराच्या गच्चीवर बसून आम्ही अनेक गोष्टी बनवल्या आहेत. या माणसाचं वाचन अफाट असावं. पण आमच्या १४ वर्षांच्या ओळखीत मी त्यांना कधीच वाचताना पाहिलेलं नाही. पण कुठलाही विषय निघाला तरी सोळंकी एन्सायक्लोपीडियाला लाजवेल अशी माहिती पुरवतात. त्यांना फायनान्समधलं कळतं, कारण त्यांनी सी. ए.च्या परीक्षा दिलेल्या आहेत. कुणी आजारी आहे असं म्हटलं की ते मेडिकलची सगळी पुस्तकं कोळून प्यायल्यासारखे बोलतात. ते स्वत: मार्शल आर्ट शिकत आणि शिकवत असत. त्यामुळे त्या विषयातही त्यांना गती आहे. आपण गाडी बुक केल्याची सुवार्ता कळवली की ते ‘बट व्हाय डिड यू गो फॉर दॅट काऽऽऽर?’’ असं म्हणून आपण बुक केलेली गाडी सोडून बाजारातल्या इतर गाडय़ा कशा उत्तम आहेत, हे ऑटोमोबाईल इंजिनीयरच्या निष्णातपणानं सिद्ध करतात. हीच तयारी साहित्य, नाटक, चित्रपट या विषयांतही आहे. आणि जागतिक इतिहास, टेररिझम, युद्धकला यांबाबतही. स्वत:च्या घराच्या आवारात एक मेकशिफ्ट ‘शूटिंग रेंज’ कोण तयार करून घेतं? सोळंकींनी घेतलीय. कुठल्याही विषयात खोलात शिरून ‘बाल की खाल’ काढणं हे त्यांचं वैशिष्टय़. त्यांच्याबरोबर कधी हॉटेलमध्ये जायचा प्रसंग आलाच तर त्यांचा आणि ऑर्डर घेणाऱ्याचा संवाद ऐकून आपलं यथेच्छ मनोरंजन होतं. ‘‘कौनसा मसाला यूज करता है तुम्हारा शेफ? उसको बोलना, सिर्फ देढ चम्मच डालने का. और देखे- ऑइल जो है ना, रूको.. मैं खुद उससे बात करता हूं..’’ असं म्हणून ते शेफचा इंटरव्ह्य़ू घ्यायला गेल्याचं मी याचि देही पाहिलेलं आहे.

२००६ साली मी ‘आदिपश्य’ नावाचं प्रायोगिक नाटक केलं. नाटकात अकरा गाणी. आम्हाला ट्रॅक रेकॉर्ड करायचे होते. त्यासाठी लागणारी रक्कम कुठल्याही प्रायोगिक संस्थेसाठी मोठीच होती. त्यावेळी मी ‘अवघाची संसार’चे संवाद लिहीत होतो. मी शशांक सरांकडे थोडा ‘अ‍ॅडव्हान्स मिळेल का?’ म्हणून विचारणा केली. त्यांनी ते मान्यही केलं. चेक हातावर ठेवताना त्यांनी अ‍ॅडव्हान्सचं कारण विचारलं. मी सांगितलं. ते क्षणाचाही विचार न करता म्हणाले, ‘धिस इज नॉट अ‍ॅन अ‍ॅडव्हान्स. पहिल्या प्रयोगाला येईन मी.’ मी पुढे काही बोलायच्या आत त्यांनी उभं राहत विषय तिथंच संपल्याचं जाहीर केलं. नाटक करणाऱ्यांबद्दल त्यांना विशेष प्रेम आहे. आजही ‘चतुरंग’ आयोजित गणेश सोळंकी सवाई एकांकिका स्पर्धेला ते घरचं कार्य असल्यासारखे हजर असतात.

शशांक सोळंकी हा माणूस अजातशत्रू नाही. किंबहुना, त्यांच्या अवेळी उफाळून येणाऱ्या रागामुळे त्यांनी मित्रांइतकेच शत्रूही निर्माण केले असतील. पण माणसाच्या वृत्तीत खोट नाही. त्यांच्या ऑफिसला गेलं की बऱ्याचदा ते कोणाशी तरी फोनवर जोरजोरात वाद घालत असल्याचा आवाज आपल्याला बंद दाराआडून बाहेर ऐकायला येतो. अशावेळी ऑफिसमधला स्टाफही जीव मुठीत घेऊन असतो. क्षेपणास्त्र दिशा बदलून आपल्या दिशेला कधी येईल याची गॅरेंटी नसते. मग थोडय़ा वेळानं आतला आवाज शांत होतो. ऑफिस बॉय आपल्याला येऊन सांगतो- ‘तुम्हाला आत बोलावलं आहे.’ आत्ता थोडय़ा वेळापूर्वी कोणावर तरी आग ओकणारा माणूस नेमक्या कुठल्या मूडमध्ये असेल याचा आपल्याला अंदाज नसतो. आपण आपल्या गतचुकांची मनाशी उजळणी करून मगच दार उघडतो. आत गेल्यावर सोळंकी आपला चष्मा डोक्यावर चढवून काहीतरी वाचत बसलेले दिसतात. मग ते आपल्याकडे पाहतात. ‘‘या मांडलेकर! श्टार झाला च्यायला तू! वेळच नाही तुझ्याकडे.’’ नांदीच्या आधीचा हा कटाव आता ठरलेला आहे. ‘‘तसं नाही सर, मध्यंतरी जरा अडकलो होतो.’’आपणही सवयीचंच उत्तर पुढे करतो. ‘‘गोस्ट करू या रे नवीन..’’ या नांदीनं पुढचा प्रवेश सुरू होतो. पाच मिनिटांपूर्वी कुठल्या तरी बिचाऱ्यावर काढलेल्या रागाचा लवलेशही आता नसतो. आणि मग आम्ही ‘गोस्ट’ करू लागतो. गेली १४ वर्षें आम्ही हेच करतोय. आणि पुढेही हेच करत न राहण्याचं काहीच कारण नाही. इच्छा तर त्याहून नाही.

(उत्तरार्ध)

चिन्मय मांडलेकर

aquarian2279@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2017 1:05 am

Web Title: chinmaymandlekar articles in marathi on shashank solanki part 2
Next Stories
1 शशांक गणेश सोळंकी
2 बज्जूभाई
3 चेतन
Just Now!
X