मुंगेर, बिहार : भारताने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील दहशतवादी छावणीवर हल्ला केला तेव्हा देशात आनंदोत्सव साजरा होत असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना मात्र शोक अनावर झाला होता, अशी टीका भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली.

येथील प्रचार सभेत ते म्हणाले की, गांधी यांनी पाकिस्तानशी इलू इलू ( १९९० मधील आय लव्ह यू- इलू-इलू गाण्याचा संदर्भ) करण्यात धन्यता मानली असली तरी ५६ इंच छातीच्या मोदी यांनी मात्र सीमेपलीकडील दहशतवादाला चोख उत्तर दिले व यापुढेही देत राहतील.

बालाकोट हवाई हल्ल्यानंतर दोनच प्रकारचे लोक शोक करीत होते त्यात एक पाकिस्तानमधील सरकार व दुसरे राहुल बाबा होते. १९९० पासून जेव्हा काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा  त्यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून आपल्या सैनिकांचे बळी घेतले जात असताना त्यात धन्यता मानली. माझ्यासारखा भाजप-संघ कार्यकर्ता त्यावेळी मौनीबाबा मनमोह सिंग ज्या हताश नजरेने पाहत असत ते कधी विसरणार नाही.

पाकिस्तानवर हवाई हल्ले केल्यानंतर आता विरोधक नैराश्यातून पुरावे मागत आहे. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशद्रोही घोषणा देण्यात आल्या त्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन केले होते. देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याचा त्यांचा डाव आहे.  राहुल बाबांनी लालूप्रसादांसारख्यांना जामीनावर सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत पण मोदी सत्तेवर असेपर्यंत देशद्रोही लोकांना गजाआडच जावे लागेल. जर विरोधी आघाडीला सत्ता मिळाली तर सोमवारी ममता, मंगळवारी अखिलेश, बुधवारी मायावती, गुरुवारी लालू प्रसाद, शुक्रवारी चंद्राबाबून व शनिवारी देवेगौडा पंतप्रधान असतील व रविवारी सगळा देश सुट्टीवर जाईल, अशा पद्धतीने देश चालवता येणार का, पाकिस्तानला ठोस उत्तर देता येईल का, असा प्रश्न त्यांनी केला असता लोकांनी नाही.. नाही असे उत्तर दिले.

आठ कोटी स्वच्छतागृहे. सात कोटी कुटुंबाना गॅस, आयुष्मान भारत योजना या केंद्र सरकारच्या योजनांचा उल्लेख त्यांनी केला.