दिल्लीत पक्षनेत्यांचा भोजन समारंभ; पुढील रणनीतीवर चर्चा

भाजप आघाडीला तीनशेहून अधिक जागा मिळण्याची शक्यता मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केल्यानंतर भाजपने ‘एनडीए-३’चे सरकार बनवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीचा वेग मंदावला आहे.

‘एनडीए’ला पूर्ण बहुमत मिळण्याचा विश्वास भाजपचे नेते आधीपासूनच व्यक्त करत होते. मतदानोत्तर चाचण्यांनीही भाजपच्याच बाजूने कौल दिल्याने पक्षनेत्यांचा विश्वास दुणावला आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी लागणार असले तरी त्यापूर्वीच भाजपच्या केंद्रात सरकार स्थापनेच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांचा भोजनाचा कार्यक्रम भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आयोजित केला आहे. मंगळवारी दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये होणाऱ्या या भोजनासाठी पक्षप्रमुखांना निमंत्रण देण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदीही या समारंभास उपस्थित राहणार आहेत.

भाजपप्रणीत ‘एनडीए’मध्ये शिवसेना, अकाली दल, अण्णा द्रमुक अशा २१हून अधिक प्रादेशिक पक्षांचा समावेश आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए-२’मध्ये भाजप नेतृत्वाने प्रादेशिक पक्षांशी समन्वय साधला नसल्याची तकार शिवसेनेसह अनेक पक्षांनी केली होती. भोजनाच्या निमित्ताने नव्या ‘एनडीए’मध्ये भाजप आणि घटक पक्षांमध्ये अधिक सुसंवाद साधण्याचा प्रयत्न  केला जात आहे. सरसंघचालक मोहन भागवत मंगळवार-बुधवार दिल्लीत येण्याची शक्यता असून ते मोदी-शहा यांची भेट घेतील.

विरोधकांच्या गोटात शांतता

दोन दिवसांपूर्वी बिगरभाजप आघाडी स्थापन करण्यासाठी विरोधी पक्षांचे  प्रयत्न सुरू केले होते. मात्र मतदानोत्तर चाचण्यांचा कल पाहिल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सोमवारी ठरलेली दिल्लीवारी रद्द केली. दिल्ली दौऱ्यात मायावती ‘यूपीए’च्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार होत्या. विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी तेलुगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारपासून चंद्राबाबू दिल्लीत असून त्यांनी सलग दोन दिवसांमध्ये राहुल गांधी आणि शरद पवार यांची दोनदा भेट घेतील. लखनऊ येथे मायावती आणि अखिलेश यादव यांच्याशीही चर्चा केली. मतदानोत्तर चाचण्यांमधील अंदाजानुसार भाजप आघाडीला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केल्यामुळे विरोधी पक्षांच्या राजकीय हालचाली थंडावल्या आहेत. प्रत्यक्ष निकाल पाहूनच विरोधी आघाडी बनवण्याचे प्रयत्न  केले जातील. सोनिया गांधी यांनी निकालाच्या दिवशी (२३ मे) विरोधी पक्षांची बैठक आयोजित केली असली तरी त्याचे भवितव्यही निकालांवर अवलंबून असेल.