पाच राज्यांमध्ये मुख्यमंत्रिपद तर एका राज्यात उपमुख्यमंत्रिपद असलेल्या राज्यांपैकी कोणत्या राज्यात काँग्रेसला चांगले यश मिळते याची पक्षात उत्सुकता आहे. काँग्रेसशासीत राज्यांमध्ये जास्तीत जास्त जागा मिळाल्या पाहिजेत, असे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना बजाविल्याने प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, पंजाब आणि पुड्डुचेरी या पाच राज्यांमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. कर्नाटकात जनता दलाबरोबर काँग्रेस सत्तेत असून, उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या पाच राज्यांमध्ये लोकसभेच्या ७९ जागा आहेत. जनता दलाबरोबर सत्तेत असलेल्या कर्नाटकात लोकसभेच्या २८ जागा आहेत. म्हणजेच पक्षाची सत्ता किंवा सत्तेत भागीदार असलेल्या राज्यांमधील १०७ जागांमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

पंजाबमध्ये सर्व १३ जागा जिंकण्याचा निर्धार (मिशन -१३ ) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी केला आहे. पंजाबमधील सर्व जागांवर मुख्यमंत्र्यांना जोर लावला आहे. राजस्थानातील सर्व २५ जागा जिंकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी अलीकडेच व्यक्त केला. छत्तीसगडमध्ये पक्षाला विधानसभा निवडणुकीत तीन चतुर्थाश जागा मिळाल्या होत्या. यातून ११ पैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा प्रयत्न आहे. मध्य प्रदेशात भाजपला रोखण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या पुढे आहे. मध्य प्रदेशातील २९ पैकी किमान १५ तरी जागा िंजकण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे. पुड्डुचेरीतील एकमात्र जागा जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री नारायणस्वामी यांनी व्यक्त केला आहे.

कर्नाटकात काँग्रेस पक्ष सत्तेत भागीदार आहे. लोकसभेसाठी जनता दलाबरोबर आघाडी झाली होती. पण कर्नाटकात अपेक्षित यश मिळणे कठीण असल्याचे काँग्रेस नेत्यांचे मत झाले आहे. कर्नाटकात  भाजप सर्वाधिक जागाजिंकेल, असे चित्र आहे. काँग्रेस व जनता दलात योग्य समन्वय राहिला नाही. यातच काँग्रेसमधील काही नेत्यांच्या अति महत्त्वाकांक्षेमुळे पाडापाडीचे प्रकार अधिक झाले आहेत. लोकसभा निकालानंतर कर्नाटकातील सरकार केव्हाही गडगडू शकते या निष्कर्षांपर्यंत काँग्रेस आणि जनता दलाचे नेते आले आहेत.

एखाद्या निवडणुकीत चांगले यश मिळाल्यास हा कल पुढे सहा महिने तरी कायम राहतो, असा अनुभव आहे. यातूनच मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये काँग्रेसला चांगल्या यशाची अपेक्षा आहे. काँग्रेसशासित राज्यांमध्ये चांगल्या जागा मिळाल्यास काँग्रेसचे संख्याबळ वाढू शकते.

गेल्या पाच वर्षांत लोकांसाठी काय केले याचे उत्तर भाजपला देता आलेले नाही. त्यामुळे राजस्थानमध्ये लोकसभेच्या सर्व २५ जागा काँग्रेसच जिंकेल. भाजपचा कुणीही नेता रोजगाराच्या मुद्दय़ावर बोलायला तयार नाही.     – सचिन पायलट, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये

  • मध्य प्रदेश -२९
  • राजस्थान -२५
  • छत्तीसगड -११
  • पंजाब -१३
  • पुड्डुचेरी -१
  • कर्नाटक -२८