काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा चर्चेचे आव्हान दिले आहे. मोदींनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीची व्हिडिओ क्लिप राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. या व्हिडिओत मोदी हे मुलाखत घेणाऱ्यांना प्रश्न विचारताना दिसतात. फ्रान्सबरोबर राफेल लढाऊ विमान व्यवहाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर त्यांना (काँग्रेस) विश्वास नाही, असे मोदी यांनी म्हटले आहे. त्यावर राहुल यांनी ट्विट करत म्हटले की, ‘श्री मोदी तुम्ही पळून जाऊ शकता. पण लपू शकत नाही. तुमचे कर्म तुमचा पाठलाग करणे सोडणार नाही. देश तुमच्या आवाजात हे ऐकू शकतो. सत्यामध्ये खूप ताकद आहे. मी तुम्हाला भ्रष्टाचारावर चर्चा करण्याचे आव्हान देतो.’

तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी पक्षाच्या मुख्यालयात काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना मोदींना राष्ट्रीय सुरक्षा, भ्रष्टाचार आणि विदेश नीतीवर चर्चा करण्याचे आव्हान दिले होते.

विरोधी पक्षाकडून नव्या राफेल करारावरून मोदी सरकारवर सातत्याने टीका होताना दिसते. यूपीए सरकारच्या काळात झालेल्या करारापेक्षा हा करार महागडा असल्याचे सांगत या करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मोदी सरकारवर केला जातो. या व्यवहारात अनिल अंबानींना ३० हजार कोटींचा फायदा मिळवून दिल्याचा आरोपही काँग्रेस करते.

मात्र सरकारकडून राफेल व्यवहारात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा केला जातो. अंबानींनीही त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांना खुली चर्चा करण्याचे आव्हान दिले होते.