नाशिक : मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी उमेदवारांना आपले प्रतिनिधी नियुक्त करता येतात. हे प्रतिनिधी नेमताना उमेदवार पक्षाचे पदाधिकारी, एकनिष्ठ कार्यकर्ते आणि आपल्या विश्वासातील मंडळींना प्राधान्य देतात. नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात उमेदवारांनी बहुसंख्येने तसेच प्रतिनिधी नेमले होते. हे सर्व प्रतिनिधी व्यवस्थापनशास्त्र, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे होते.

मतमोजणी प्रक्रियेतील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी उमेदवारांना काही विशिष्ट प्रमाणात आपले प्रतिनिधी नियुक्त करण्याची मुभा आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी फेरनिहाय आकडेमोडीची नोंद करतात. कुठे काही त्रुटी किंवा संशय वाटल्यास आक्षेप घेऊ शकतात. उमेदवार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, मतमोजणीची सखोल माहिती असणारे कार्यकर्ते आणि विश्वासातील मंडळींना प्रतिनिधी म्हणून नियुक्त करतात. त्यांची छायाचित्रासह संपूर्ण माहिती आधीच निवडणूक यंत्रणेला द्यावी लागते. त्याआधारे संबंधितांना उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून प्रवेशपत्र दिले जाते. दोन्ही मतदारसंघात बहुसंख्य उमेदवारांनी आपल्या विश्वासातील मंडळी, प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती. मतमोजणी केंद्रात ठाण मांडून संबंधितांनी या प्रक्रियेवर लक्ष ठेवले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा शुभम करमाळे हा त्यापैकीच एक. त्याने गुरुवारच्या रेल्वेच्या परीक्षेला दांडी मारली. शुक्रवारी अभियांत्रिकीचा पेपर आहे. तरीदेखील मतमोजणी पाहण्यासाठी आपण आल्याचे त्याने सांगितले. व्यवस्थापनशास्त्र अर्थात एमबीएचे शिक्षण घेणारा सचिन भडके हा व्यावसायिक, प्रतिनिधी म्हणून आल्याने प्रत्यक्ष मतमोजणीची अनुभूती मिळाल्याचे तो सांगतो. सागर पाटीलला यंदा प्रथमच मतदान यंत्राला जोडलेल्या व्हीव्ही पॅटच्या चिठ्ठय़ांच्या मोजणीबद्दल उत्सुकता होती. स्थापत्य अभियंता शिवम पवारने मतमोजणी प्रक्रिया पाहण्याच्या इर्षेतून प्रतिनिधी झाल्याचे सांगितले. मतदान प्रक्रिया प्रत्यक्षात पाहण्याच्या इच्छेतून संबंधितांनी नातेवाईक, मित्रांच्या माध्यमातून उमेदवारांशी संपर्क साधत प्रतिनिधी म्हणून काम केले.