लखनऊ : बसपाच्या नेत्या मायावती यांनी गुरुवारी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार हल्ला चढविला. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांमध्ये छुपा समझोता झाला असून उत्तर प्रदेशमध्ये ते एकत्रितपणे सपा-बसपा-आरएलडी आघाडीविरोधात काम करीत असल्याचा आरोप मायावती यांनी केला.

सत्तारूढ भाजपचे उमेदवार विजयी झाले तरी काही हरकत नाही, मात्र सपा-बसपा-आरएलडीचे उमेदवार निवडणुकीत विजयी होऊ नयेत असे काँग्रेसजनांना वाटत असल्याचा आरोपही मायावती यांनी केला.

भाजपप्रमाणेच आता काँग्रेसनेही सपा-बसपा आघाडीबाबत हास्यास्पद विधाने करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपने छुपा समझोता केल्याचे स्पष्ट होत आहे आणि ते आमच्या आघाडीविरोधात एकत्रित लढत आहेत, असेही मायावती म्हणाल्या.

मायावती आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नियंत्रण असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी बाराबंकी येथील जाहीर सभेत केला होता.

गेल्या पाच वर्षांत सपा अथवा बसपाने मोदींना थेट आव्हान दिले का, मायावती अथवा मुलायमसिंह यांचे एकतरी विधान तुम्ही ऐकले आहे का, आपण मोदींना घाबरत नाही, आपल्याला पर्वा नाही, जर कोण घाबरत असेल तर ते मोदी आहेत, मात्र मायावती आणि अखिलेश हे मोदींच्या नियंत्रणाखाली आहेत, असे गांधी म्हणाले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन मोदी यांनी बसपावर हल्ला केला, परंतु डॉ. आंबेडकर यांचे नाव तुम्ही मतांसाठी घेत आहात, परंतु ते बसपाचा आत्मा आहेत. परंतु बसपा भाजपप्रमाणे प्रभूरामचंद्रांचे नाव घेऊन जनतेची लूट करीत नाही, असेही मायावती म्हणाल्या.