लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेते एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडताना दिसत नाही आहेत. मात्र यावेळी अनेक नेत्यांची जीभ घसरतानाही दिसत आहे. राजकीय नेत्यांमध्ये कोण जास्त वादग्रस्त वक्तव्य करत आहे अशी स्पर्धाच लागली असल्याचं चित्र आहे. यादरम्यान पंजाब सरकारमधील मंत्री मनप्रित सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

मनप्रित सिह यांनी म्हटलं आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला भारताचे वाघ म्हणतात. खरंच वाघ असतील पण वाघदेखील दोन प्रकारचे असतात. एक जंगलातील वाघ असतो आणि एक सर्कशीतला असतो. त्यामुळे आम्हाला तरी हे सर्कशीतले वाघ वाटतात’.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत त्यांनी पुढे म्हटलं की, खोटे अश्रू वाहण्यासाठी ते ओळखले जातात. लोकांच्या भावनांशी खेळून मतं मिळवण्याची कला त्यांच्याकडून शिकली पाहिजे. भाजपाला जेव्हा वाटतं की त्यांचा मोठा पराभव होणार आहे तेव्हा ते अर्थहीन मुद्दे उचलण्यास सुरुवात करतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भावनांच्या आधारे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. पण पंजाबमधील जनतेसोबतच पूर्ण देशाला भाजपाची विचारसरणी समजली आहे. या निवडणुकीत लोक भाजपाला धडा शिकवणार आहेत. पंजाबसोबत देशातील दुसऱ्या भागांतही काँग्रेसचा विजय होणार हे नक्की आहे. यासंबंधी कोणतीही शंका असण्याचं कारण नाही असंही ते म्हणाले आहेत.