19 January 2020

News Flash

उत्सुकता, हुरहुर अन् विजयोत्सव..!

गोडसे यांचे मताधिक्य फेरीनिहाय वाढत गेले. सहाव्या फेरीअखेर गोडसेंचे मताधिक्य ५० हजारापर्यंत विस्तारले

(संग्रहित छायाचित्र)

नाशिक : संथपणे सुरू झालेल्या मतमोजणीमुळे नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची फेरीनिहाय आकडेवारी जाहीर होण्यास प्रारंभी बराच विलंब लागला. यामुळे निकालाकडे कान आणि डोळे लावून बसलेल्या राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सहनशीलतेची अक्षरश: परीक्षा पाहिली गेली.

नाशिक, दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांत प्रारंभापासून आघाडीवर असणारे सेना-भाजप महायुतीचे अनुक्रमे हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार यांनी अखेपर्यंत ती कायम ठेवली.

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या दिवशी हे चित्र पाहायला मिळाले. अंबड येथील वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीचा अधिकृत निकाल जाहीर होण्यासाठी तीन तास लागले. दोन्ही मतदारसंघांची एकाच वेळी मतमोजणी झाली. तरीदेखील फेरीनिहाय आकडेवारी जाहीर करण्यात दिंडोरी आघाडीवर राहिले. त्याबाबतीत नाशिक मतदारसंघात यंत्रणेला बराच विलंब लागला. सकाळी साडेसात वाजता मतपेटय़ांचे सुरक्षा कक्ष उघडण्यात आले. तेव्हा राजकीय पक्षांचे उमेदवार उपस्थित नव्हते. त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. टपाली आणि ईटीपीबीएस मतपत्रिकांची मतमोजणी झाली. नंतर इव्हीएमच्या मतमोजणीला विधानसभा मतदारसंघनिहाय सुरुवात झाली. सर्व टेबलवर उमेदवारांचे प्रतिनिधी लक्ष ठेवून होते. केंद्राबाहेर ध्वनिक्षेपकाद्वारे निकाल ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली होती. राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते त्याकडे कान लावून बसले होते. परंतु, त्यांना मतफेरीच्या आकडेवारीऐवजी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सूचनाच वारंवार ऐकाव्या लागल्या. त्यांची तीन तासानंतर प्रतीक्षा संपली. नाशिक मतदारसंघाचे संथपणे फेरीनिहाय निकाल जाहीर होऊ लागले. नाशिकची पहिली फेरी जाहीर झाली, तेव्हा दिंडोरीची तिसरी फेरी सांगण्यात येत होती. दिंडोरीच्या तुलनेत नाशिकची मतमोजणी जाहीर करण्यास विलंब होण्यामागे उमेदवारांची मोठी संख्या हे कारण असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. दिंडोरीमध्ये आठच उमेदवार आहेत. नाशिकमध्ये ही संख्या १८ असून विधानसभा मतदारसंघनिहाय मोजणीत सर्व आकडेवारी हाती आल्याशिवाय एका फेरीचा निकाल जाहीर करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिकमध्ये महायुतीचे हेमंत गोडसे यांनी पहिल्या फेरीत विरोधी उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे समीर भुजबळ यांच्यावर सुमारे नऊ हजार मतांची आघाडी घेतली. गोडसेंना २५००५, तर भुजबळांना १६४२० मते मिळाली. भाजपचे बंडखोर माणिक कोकाटे ७२१८, वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांना २८६८ मते मिळाली. गोडसे यांचे मताधिक्य फेरीनिहाय वाढत गेले. सहाव्या फेरीअखेर गोडसेंचे मताधिक्य ५० हजारापर्यंत विस्तारले. या फेरीअखेर गोडसेंना १,४३,९३४ तर भुजबळ यांना ८६,७७९ मते मिळाली. कोकाटेंना ४०,५०७ तर पवारांना २०,४३५ मते मिळाली. दिंडोरी मतदारसंघात पहिल्या फेरीपासून महायुतीच्या भारती पवार यांचे मताधिक्य उत्तरोत्तर वाढत गेले. अकरा फेऱ्यांमध्ये त्यांनी एक लाखाहून अधिक मतांची आघाडी घेतली. पहिल्या फेरीत ११ हजारांची आघाडी घेऊन त्यांना २५,८३४ मते मिळाली. काँग्रेस आघाडीचे धनराज महाले यांना १५,०५९, तर माकपच्या जिवा पांडू गावितांना ६८२२ मते मिळाली. अकराव्या फेरीअखेर पवार यांनी २,७९,७५८ मते मिळवत विजयाचा मार्ग सुकर केला. विरोधी महाले यांना १,७०,५५२, तर गावितांना ५६,१३९ मते मिळाली. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या मोजणी वेळी राष्ट्रवादीने हरकत घेतली होती. टेबल क्रमांक तीनवर प्रत्यक्षात ३२४ मतदान झाले असताना यंत्रात ५५३ मतदान झाल्याचे दर्शविले गेल्याची तक्रार राष्ट्रवादीने केली.

फेरीनिहाय वाढत्या मताधिक्याबद्दल युतीच्या गोटात उत्सुकता वाढली असताना दुसरीकडे विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या गोटात एखाद्या फेरीत तरी बदल घडेल हा आशावाद होता. सर्व फेऱ्यांची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर सेना-भाजपकडून विजयोत्सव सुरू झाला

First Published on May 24, 2019 4:17 am

Web Title: nashik election results 2019 dindori lok sabha result 2019
Next Stories
1 विजेत्यांना आश्वासनांचा विसर पडू नये
2 भाजप-सेना कार्यालयात आनंदोत्सव
3 मतमोजणी प्रक्रियेसाठी उच्चशिक्षित प्रतिनिधी
Just Now!
X