नऊशेहून अधिक साहित्यिक, कलाकारांचे आवाहन

नवी दिल्ली : भाजपप्रणीत सरकारच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन देशातील काही कलावंत व साहित्यिकांनी अलीकडेच केलेले असतानाच;  नऊशेहून अधिक कलाकारांनी बुधवारी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले.

देशाला ‘मजबूर सरकारची’ नव्हे, तर ‘मजबूत सरकारची’ गरज असल्याचे त्यांनी यासाठी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. कुठल्याही दबावाशिवाय आणि पूर्वग्रहाशिवाय मतदान करण्याचे आवाहन या कलाकारांनी लोकांना केले आहे. भाजपचे खासदार परेश रावल यांचे नाव यात नाही मात्र त्यांच्या पत्नी स्वरूप रावल यांचा यात समावेश आहे.

गेल्या पाच वर्षांत देशाने भ्रष्टाचारमुक्त तसेच विकासाभिमुख सरकार पाहिले आहे अशी आमची धारणा असल्याचे या कलावंतांनी म्हटले आहे. तसेच जगात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार यापुढेही कायम राहावे, ही काळाची गरज असल्याचे कलावंतांनी नमूद केले आहे. याशिवााय, दहशतवादासारखी आव्हाने आम्हा सर्वापुढे असताना आम्हाला ‘मजबूर सरकार’ नव्हे, तर ‘मजबूत सरकार’ हवे आहे. त्यामुळेच सध्याचे सरकार यापुढेही कायम राहणे आवश्यक आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

पंडित जसराज, उस्ताद गुलाम मुस्तफा खान, शिल्पकार राम सुतार, प्रख्यात नाटय़कर्मी वामन केंद्रे, कवी अर्जुन डांगळे, संगीतकार शंकर महादेवन, गायिका अनुराधा पौडवाल, त्रिलोकीनाथ मिश्रा इत्यादींचा हे संयुक्त निवेदन जारी करणाऱ्या कलाकारांमध्ये समावेश आहे. गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचारमुक्त सुशासन आणि विकासाभिमुख प्रशासन देणारे सरकार देशाने पाहिले असल्याचा त्यांनी उल्लेख केला आहे.

अमोल पालेकर, नसीरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड व उषा गांगुली यांच्यासह सहाशेहून अधिक कलाकारांनी लोकांना ‘भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना’ सत्तेवरून घालवण्यासाठी मतदान करावे असे आवाहन करणारे पत्र जारी केल्यानंतर आठवडाभराने हे संयुक्त निवेदन जारी करण्यात आले आहे.