मी बॉम्बस्फोट घडवला आणि मुस्लिमांना मारले हे तुरुंगात त्यांना माझ्याकडून वदवून घ्यायचे होते. सकाळी झाली की तुरुंगात मला मारहाण सुरु व्हायची. फक्त मारणारे लोक बदलायचे पण मार खाणारी मी एकटीच होती असे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी तुरुंगातील आपल्या अनुभवाबद्दल बोलताना सांगितले.

साध्वी प्रज्ञा सिंह आता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्या भोपाळमधून भाजपाच्या उमेदवार आहेत. त्यांची लढत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या बरोबर आहे. मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या उमेदवारी विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

मालेगाव बॉम्ब स्फोटातील पीडिताच्या वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एनआयए कोर्टाकडून जामीन मिळवताना साध्वी प्रज्ञा यांनी खराब प्रकृतीचे कारण दिले होते. साध्वी यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

भाजपाचे नेते राम माधव यांनी साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद हे शब्द काँग्रेस प्रणीत संपुआने काढले. दिग्विजय सिंह यांच्यासारख्या माणसासमोर साध्वी प्रज्ञा सिंह योग्य उमेदवार आहेत. हिंदू दहशतवाद हा चुकीचा प्रचार करण्यासाठी दिग्विजय सिंह जबाबदार आहेत. त्यांच्यासमोर योग्य आव्हान निर्माण करणे आवश्यक होते असे राम माधव म्हणाले.