काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शोदरम्यान गोंधळ झाला आहे. ट्रकचा रॉड तुटून पडल्याने तीन पत्रकार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी जखमी पत्रकारांसोबत रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचले होते. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी केरमळमधील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हा सगळा प्रकार घडला.

राहुल गांधी उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्यासोबत त्यांची बहिण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधीदेखील उपस्थित होत्या. राहुल गांधी यावेळी पारंपारिक मतदारसंघ अमेठी आणि वायनाड अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अमेठीत राहुल गांधींचा सामना भाजपाच्या स्मृती इराणी यांच्याशी असणार आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही स्मृती इराणी आणि राहुल गांधी यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी स्मृती इराणी यांना पराभव स्विकारावा लागला होता.

दरम्यान राहुल गांधी यांनी आपण भारत एकसंध असल्याचा संदेश देण्यासाठी केरळला आलो असल्याचं सांगितलं आहे. ‘संदेश पोहोचवणे हा माझा हेतू आहे. ज्याप्रकारे केंद्र सरकार, नरेंद्र मोदी आणि आरएसएस काम करत आहे ते पाहता हा दक्षिणेतील संस्कृती आणि भाषेवर अत्याचार होत असल्याची भावना लोकांमध्ये आहे’, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

‘मला माहिती आहे की, सीपीएममधील माझे भाऊ आणि बहिणी आता माझ्यावर हल्ला करत टीका करतील. पण मी संपूर्ण प्रचारात सीपीएमविरोधात एकही शब्द उच्चारणार नाही’, असं राहुल गांधींनी सांगितलं आहे.