16 October 2019

News Flash

पत्नी भाजपात, वडील आणि बहीण काँग्रेसमध्ये; जडेजाने दिला या पक्षाला पाठिंबा

मार्च महिन्यात रवींद्र जडेजाची पत्नी रिवावाने भाजपात प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर रवींद्र जडेजा नेमका कोणाला पाठिंबा देणार, याची उत्सुकता निर्माण झाली होती.

रवींद्र जडेजा (संग्रहित छायाचित्र)

वडील आणि बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने अखेर कोणत्या पक्षाला पाठिंबा जाहीर करणार, याचे उत्तर दिले आहे. रवींद्र जडेजाची पत्नी  रिवावाने महिनाभरापूर्वीच भाजपात प्रवेश केला होता. आता रवींद्र जडेजानेही ट्विटरवरुन भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे.

रवींद्र जडेजाची मोठी बहीण नयनाबा जडेजा आणि वडील अनिरुद्ध सिंह यांनी रविवारी जामनगरमधील कार्यक्रमात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नयनाबा या सरकारी रुग्णालयात परिचारिका होत्या. महिला सशक्तीकरणासाठी काम करायचे असल्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी म्हटले होते.

मार्च महिन्यात रवींद्र जडेजाची पत्नी रिवावाने भाजपात प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर रवींद्र जडेजा नेमका कोणाला पाठिंबा देणार, याची उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर रवींद्र जडेजाने ट्विटरवरुन भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. मी भाजपा, नरेंद्र मोदी आणि रिवावा जडेजा यांचे समर्थन करतो, असे रवींद्र जडेजाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

रवींद्र जडेजाच्या आईचे १५ वर्षांपूर्वी निधन झाले असून नयनाबा यांनीच घराची जबाबदारी सांभाळल्याचे सांगितले जाते. सध्या नयनाबा या राजकोटमध्ये कुटुंबाने सुरु केलेले हॉटेल चालवतात.

रिवावा जडेजा करणी सेनेच्या महिला संघटनेच्या अध्यक्ष असून त्यांना क्षत्रीय समाजाचा पाठिंबा आहे. लोकसभा निवडणुकीत गुजरातमधून उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

First Published on April 16, 2019 11:05 am

Web Title: sister father in congress cricketer ravindra jadeja supports narendra modi bjp