नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचणीत भाजपला मोठे यश मिळत असल्याच्या अंदाज व्यक्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी भाजप आणि निवडणूक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. राज्य सरकार हे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे चोरत असून वाराणसीमध्ये अशा यंत्रांचा एक ट्रक पकडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मतदानोत्तर चाचण्या म्हणजे भाजपच विजयी होणार असल्याचा समज पसरविण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. अधिकाऱ्यांची भाजपशी हातमिळवणी असल्याचा आरोप त्यांनी केला. उत्तर प्रदेशचे कायदा मंत्री ब्रजेश पाठक यांनी अखिलेश यांचा आरोप फेटाळून लावला.