पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना आणि वृत्तपत्रांना मुलाखती देत आहेत. एका मुलाखतीत त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे माझे मित्र असून मी त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करण्यासाठी सर्वात आधी हजर असेन असं वक्तव्य केलं आहे. यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मोदींच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले, राजकारणात कधी काय होईल हे सांगता येणार नाही. राजकारणात आजचा मित्र उद्या शत्रू बनू शकतो, तर आजचा शत्रू उद्याचा मित्र असू शकतो.

छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी भुजबळ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्धव ठाकरेंबद्दलच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही वेगळं चित्र दिसू शकतं का? किंवा मोदींनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना भाजपाचे दरवाजे तुमच्यासाठी अजूनही उघडे आहेत असा संदेश दिला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ खळखळून हसले आणि म्हणाले, खरंतर राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही राजकारणात आजचा शत्रू उद्याचा मित्र असू शकतो, तर आजचा मित्र उद्या शत्रू बनू शकतो.

छगन भुजबळ म्हणाले, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनीदेखील अशाच प्रकारचं एक वक्तव्य केलं होतं. ते कुठेतरी म्हणाले, “ठीक आहे, आमचे काही लोक, काही नेते पक्ष सोडून गेले असतील, परंतु ते जर परत येत असतील तर आम्ही निश्चितपणे त्याबद्दल सकारात्मकपणे विचार करू”. याचाच अर्थ शरद पवार यांनीसुद्धा कुठेतरी एक खिडकी उघडी ठेवली आहे. शरद पवार यांनी या वक्तव्याद्वारे एक वेगळ्या प्रकारचा संदेश दिला आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शिवसैनिकांना, शिवसेनेच्या नेत्यांना एक वेगळा संदेश दिला आहे असं मला वाटतं. परंतु, त्यावर मी काही ठामपणे बोलू शकत नाही किंवा काही ठाम प्रतिक्रिया देऊ शकत नाही.

हे ही वाचा >> “पवारांचा डीएनए सुप्रिया सुळेंमध्येच”, सुनेत्रा पवारांच्या सख्ख्या जाऊबाईंचं विधान; म्हणाल्या, “माझ्या नणंदेची जागा…”

यावेळी भुजबळ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया विचारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दलही वक्तव्य केलं होतं. मोदी म्हणाले होते की, “शरद पवार स्वतःचं कुटुंब सांभाळू शकत नाहीत, तर ते देश काय सांभाळणार? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये वारस कोण किंवा कोणाला वारस नेमायचं याबाबत वाद आहे. हा शरद पवारांच्या घरातला खासगी वाद आहे.” मोदींच्या या वक्तव्यावरही छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ म्हणाले, शरद पवार हे देश सांभाळू शकणार नाहीत हे मोदींचं वैयक्तिक मत आहे. खरंतर शरद पवार यांनी ते देशाचे संरक्षणमंत्री असताना ते पद खूप चांगल्या रीतीने सांभाळलं होतं. शरद पवार आपल्या देशाचे कृषिमंत्री असताना आपल्या देशाचं कृषी उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. त्यासाठी त्यांनी पिकांना दिला जाणारा हमीभाव तिप्पट, चौपट केला होता. गहू आणि तांदळाला देखील मोठ्या प्रमाणात हमीभाव मिळत होता. मोदींनी शरद पवार यांच्या कुटुंबाबद्दल जी टिप्पणी केली आहे, ते देश सांभाळू शकणार नाहीत वगैरे… जे काही वक्तव्य केलंय त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही.