अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पुण्याच्या नऊ पर्यटकांना कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी तरुणीच्या भावाला मारहाण केल्याचाही आरोप होता. मंगळवारी संध्याकाळी कळंगुट बीचवर ही घटना घडली होती. पोलिसांनी कारवाई करत नऊ जणांना अटक केली आहे. हे सर्वजण पुण्याचे आहेत.

पोलीस निरीक्षक दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंगुट पोलिसांना ११ पर्यटक जबरदस्तीने एका अल्पवयीन तरुणीचे फोटो काढत असल्याची तक्रार मिळाली होती. जेव्हा तिच्या अल्पवयीन भावाने मध्यस्थी करत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला मारहाण करण्यात आली. संध्याकाळी ५.३० वाजता हा सगळा प्रकार घडला.

जेव्हा शॅक मालकांनी आरोपींना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि घटनास्थळावरुन पळ काढला. यानंतर पोलिसांना तात्काळ कारवाई करत काहीजणांना हॉटेलमधून अटक केली तर काहीजण गोव्यातून पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींपैकी दोघे अल्पवयीन असल्याची माहिती दळवी यांनी दिली आहे. त्यांना अपना घरमध्ये ठेवण्यात आलं असून, इतरांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रमेश कांबळे, संकेत भंडाळे, कृष्णा पाटील, सत्यम लांबे, अंकित गुरव, ह्रषिकेश गुरव, आकाश सुवसकर, सनी मोरे आणि ईश्वर पंगारे अशी आहेत. हे सर्वजण पुण्याचे रहिवासी आहेत. ज्या मोबाइलमधून तरुणीचे फोटो काढण्यात आले तो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.