राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांच्या पत्नीचा म्हणजेच सुनेत्रा पवार यांचा प्रचार करत आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांना बारामतीतून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे (विद्यमान खासदार – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) यांच्यात सामना रंगणार आहे. अजित पवार हे बारामतीत पक्षाची मोर्चेबांधणी करत असतानाच बुधवारी (१८ एप्रिल) त्यांनी इंदापूर येथे मतदारसंघातील डॉक्टर आणि वकिलांचा मेळावा घेतला. यावेळी अजित पवारांनी केलेल्या एका मिश्किल टिप्पणीमुळे त्यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे.

इंदापूरच्या मेळाव्यात अजित पवार यांनी एका डॉक्टर महिलेचं नाव घेतलं आणि त्यांना म्हणाले, “तुम्ही इंदापुरात सून म्हणून आलेल्या आहात, मात्र आम्ही तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही, तुम्ही आमच्या लक्ष्मी आहात.” या वक्तव्याद्वारे अजित पवार यांनी सुनेत्रा पवारांना ‘बाहेरच्या पवार’ म्हणणाऱ्या शरद पवार यांना टोला लगावला. तसेच अजित पवार सर्व डॉक्टरांना म्हणाले, रुग्ण तुमच्याकडे बरे होण्यासाठी येतात, ते डॉक्टरांशी सगळं काही खरं बोलतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या रुग्णांना राजकारणात नक्की काय चाललंय हे विचारा, त्यांनी आमचं नाव घेतलं तर जरा चांगले बोला आणि जर त्यांनी दुसऱ्यांचं (विरोधी पक्ष) नावं घेतलं तर त्याला जोरात इंजेक्शन द्या.

अजित पवार यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. आव्हाड म्हणाले, नशीब त्यांनी डॉक्टरांना सांगितलं नाही की मी विष आणून देतो, तुम्ही त्या रुग्णांना विषाचं इंजेक्शन द्या. अजित पवार हे या आणि अशा थराला जाऊन राजकारण करतात. जो माणूस मोक्का कायद्यांतर्गत तुरुंगात असलेल्या आरोपींना तुरुंगातून सोडवून आणतो. जो अख्ख्या मतदारसंघात वेगवेगळ्या कुख्यात गुन्हेगारांचे फोन आणतो तो हे सगळं करू शकतो. मुळात या गुन्हेगारांचे मतदारसंघातल्या लोकांना फोन कसे येतात? अजित पवारांनी सांगितल्याशिवाय येतात का?

हे ही वाचा >> अजित पवार स्पष्टच बोलले, “काल-परवा प्रतिभा काकीला प्रचारात पाहिलं आणि मी कपाळावरच हात मारला”

अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांमध्ये डॉक्टर आणि वकिलांचा मेळावा घेणार आहेत. त्यांनी कालपासून या मेळाव्यांना सुरुवात केली. काल त्यांना इंदापुरात डॉक्टर आणि वकिलांचा मेळावा घेतला. आता ते बारामती आणि दोंडमध्ये असा मेळावा घेणार आहेत. इंदापूरच्या मेळाव्याला अजित पवार यांच्यासह स्थानिक आमदार दत्तात्रय भरणे, आमदार यशवंत माने उपस्थित होते.