लोकसभा निवडणूक १९ एप्रिलपासून सुरु होते आहे. महाराष्ट्रात पाच तर देशात सात टप्प्यात मतदान पार पडणार आहे. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असं या निवडणुकीला निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या ४८ पैकी किती जागा महायुतीला मिळणार? किती जागा महाविकास आघाडीला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महाराष्ट्रातली सर्वात लक्षवेधी लढत आहे ती म्हणजे बारामतीतली. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा हा सामना आहे. अजित पवार यांनी बारामतीत बोलताना प्रतिभा काकींना प्रचारात उतरवलं आणि डोक्यावर हात मारला असं म्हटलं आहे.

बारामतीतल्या सभेत काय म्हणाले अजित पवार?

” डॉक्टरांना आणि वकिलांना मी सांगू इच्छितो, तुम्हा सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याची धमक आजही अजित पवारमध्ये आहे हे विसरु नका. बारामतीत चांगले मॉल आले आहेत, ब्रांड आले आहेत. बारामतीतले फोटोही सोशल मीडियावर पोस्ट करतात. रस्त्यांची कामंही आपण पूर्ण करत आणली आहेत, इतकं सगळं करुनही काही लोक माझ्याविरोधात प्रचार करतात तेव्हा डोक्यात ती गोष्ट खटकते. पण मी पण ते सगळं लक्षात ठेवणार आहे. काही जण नाही का..आत्ता तिकडे (शरद पवार गट) विधानसभेला इकडे… मी त्यांना सांगू इच्छितो विधानसभेलाही तिकडेच राहा. विधानसभेला माझे बारामतीकर मला ढिगाने मतदान करुन निवडून आणतील. त्यामुळे मला काळजी नाही.”

“प्रतिभाकाकीला प्रचारात पाहिलं आणि…”

“जे काही लोक माझ्या विरोधात बोलत आहेत मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांचाही फायदा करुन दिला आहे. कुणालाही रिकाम्या हाताने पाठवलेलं नाही. त्यावेळी इतकं फिरावंही लागायचं नाही. आता माझा परिवार सोडून राहिलेला माझा सगळा परिवार माझ्या विरोधात फिरतो आहे, बोलतो आहे. पायाला भिंगरी लागल्यासारख्या सभा घेत आहेत. काल-परवा तर प्रतिभाकाकीला प्रचारात उतरवलं मी तर डोक्यावर हात मारला. काकी पण १९९० पासून प्रचाराला आलेल्या तुम्हीही पाहिल्या नाहीत मी पण पाहिल्या नाहीत.”

हे पण वाचा- “द्रौपदीचा विचार करावा लागतो की काय?”, मुलींच्या जन्मदरावर बोलताना अजित पवार काय बोलून गेले?

मला सांगा माझं काय चुकलं आहे?

“मला फक्त एक सांगा माझं काय चुकलं? मागची दहा वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हा देश विकास करतो आहे. देशाकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोन चांगला होत असेल, देशाच्या पंतप्रधानांना आदराने पाहिलं जात असेल. एक हजार कोटी एका दिवसात पुण्याच्या विकासासाठी आले. भारताची अर्थव्यवस्था त्यांनी पाचव्या क्रमांकावर पोहचवली आहे. याचा फायदा समाजातल्या लोकांना होतोच मग विरोध का करायचा? निवडणूक आली की सांगायचं संविधान बदललं जाणार आहे. २०१४ ला मोदी निवडून आले त्यांनी संविधान बदललं का? २०१९ ला निवडून आले त्यांनी संविधान बदललं का? माझा तर दावा आहे की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत संविधान बदललं जाणार नाही.” असं अजित पवार म्हणाले आहेत.