Mizoram Vidhan Sabha Election Result 2023 Updates, 4 December 2023: अलीकडेच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. रविवारी (३ डिसेंबर) मिझोराम वगळता अन्य चार राज्यांची मतमोजणी झाली. या चारपैकी तीन राज्यांत भाजपाने बाजी मारली आहे. तर काँग्रेसला केवळ एका राज्यात विजय मिळवता आला. विशेष म्हणजे मिझोरामची विधानसभा निवडणूक उर्वरित चार राज्यांसोबत घेण्यात आली होती. मात्र भारतीय निवडणूक आयोगाने ऐनवेळी मिझोराम राज्यातील मतमोजणी एका दिवसाने पुढे ढकलली. आज (४ डिसेंबर) येथे मतमोजणी होत आहे.

इतर चार राज्यांबरोबर मिझोराम विधानसभेची मतमोजणीही ३ डिसेंबर रोजीच होणार होती. मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर मिझोराम एनजीओ कोऑर्डिनेशन कमिटीने (एनजीओसीसी) नाराजी व्यक्त केली होती. ३ डिसेंबर हा ख्रिश्चन धर्मीयांसाठी पवित्र दिवस आहे. त्यामुळे या दिवशी मतमोजणी करू नये, अशी मागणी एनजीओसीसीने केली होती. याच विनंतीमुळे निवडणूक आयोगाने मिझोराम राज्यातील मतमोजणी एका दिवसाने पुढे ढकलली. आज ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मिझोराममध्ये कोण जिंकणार?

मिझोराममध्ये ‘मिझो नॅशनल फ्रन्ट’ (एमएनएफ) आणि झोराम पीपल्स मुव्हमेंट (झेडपीएम) या दोन आघाड्यांत अटीतटीची लढत होणार असल्याचं बोललं जात आहे. असे असले तरी या दोन्ही आघाड्यांकडून आमचेच सरकार बहुमतात येणार, असा दावा केला जात आहे. त्यामुळे कोणता पक्ष बाजी मारणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. मिझोराममध्ये ४० विधानसभेच्या जागांसाठी ७ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिझोराम विधानसभा निवडणुकीत यंदा त्रिशंकू लढत होण्याची अपेक्षा आहे. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रन्ट (एमएनएफ) ने आणखी एक टर्मचं लक्ष्य ठेवलं आहे. तर २०१८ मधील खराब कामगिरीनंतर काँग्रेस पुनरागमन करण्याची आशा आहे. पण सध्याच्या निवडणुकीत झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) हा एक प्रबळ दावेदार मानला जात आहे.