scorecardresearch

भाजपाकडून फार महत्त्व नाही; पण वसंधुरा राजे त्यांच्या बालेकिल्ल्यात अजूनही ‘राणी’

काँग्रेसने २०१८ च्या निवडणुकीत सत्ता मिळवली; पण हाडोती प्रांतात भाजपानेच अधिक जागा मिळविल्या होत्या.

Vasundhara-Raje-BJP-Rajasthan-Assembly-Eelction-2023
माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे हाडोती प्रांतात आजही वर्चस्व आहे. याठिकाणच्या १७ जागा जिंकून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. (Photo – PTI)

Rajasthan Assembly Polls : राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सत्ताधारी काँग्रेसकडून सत्ता हिसकावण्यासाठी भाजपाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. राजस्थानमध्ये अनेक संस्थानिकांचे राज्य होते. आता संस्थानिक नसले तरी त्यांच्या संस्थानावर म्हणजे मतदारसंघावर राजकीय पक्षांचे वर्चस्व आहे. त्यापैकीच बुंदी राज्याचा भाग असलेला हाडोती प्रांत अनेक वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. बिगरकाँग्रेस मुख्यमंत्री झालेले भैरोसिंह शेखावत आणि वसुंधरा राजे हे दोघेही याच प्रांताचे प्रतिनिधित्व करतात. शेखावत यांनी छाब्रा येथून १९७७ रोजी पहिल्यांदा विजय मिळविला होता; तर वसुंधरा राजे झालरापाटन मतदारसंघाचे मागच्या २० वर्षांपासून प्रतिनिधित्व करीत आहेत.

या निवडणुकीतही भाजपाला या प्रांतातून चांगला पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. या प्रांतात येणाऱ्या कोटा, बुंदी, बारा व झालावाड या जिल्ह्यांमध्ये १७ विधानसभा मतदारसंघ येतात. तथापि, आतापर्यंत या प्रांतांतील मतदारांनी कोणत्याही एका राजकीय पक्षाबद्दल उत्साह दाखविलेला नाही किंवा राज्यातील इतर भागांप्रमाणे इथे कुणाचीही लाट दिसून आलेली नाही.

Jyotiraditya-Scindia-and-Yashodhara-Raje-Scindia
एका सिंदियामुळे दुसऱ्या सिंदियाला फायदा? यशोधरा राजे यांची निवडणुकीतून माघार, भाजपामध्ये खळबळ
priyanka gandhi
छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना : प्रियंका
vanchit bahujan aghadi alliance with congress party, adv prakash ambedkar and congress, lok sabha elections 2024
काँग्रेस व वंचितमध्ये ‘पहिले पाढे पंचावन्न’!
PM narendra modi rajasthan meeting
काँग्रेसवर शहरी नक्षल्यांचा ताबा!; पंतप्रधानांची घणाघाती टीका; मध्य प्रदेश, राजस्थानात प्रचाराला धार

या संदर्भात मुख्यत्वे दोन कारणे सांगितली जातात. एक म्हणजे प्रत्यक्षात येथील लोकांमध्ये विद्यमान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याबाबत फारशी नाराजी दिसत नाही. या प्रांतातील विद्यमान आमदार आणि काँग्रेस पक्षाबाबत नाराजी असली तरी गहलोत सरकारच्या योजना आणि सामाजिक न्यायाबाबत घेतलेल्या पुढाकारांबद्दल लोकांच्या मनात कौतुक आहे. दुसरे कारण म्हणजे वसुंधरा राजे यांचे भाजपामधील अनिश्चित स्थान. या प्रांतातील दारा स्थानकाजवळ छोटासा व्यवसाय करणाऱ्या राकेश मीना यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, वसुंधरा राजेच आमच्यासाठी सर्व काही आहे. भाजपामध्ये त्या एकमेव अशा नेत्या आहेत की, ज्या मुख्यमंत्रिपदाला शोभू शकतात. “माझ्या गावातील प्रत्येक जण त्यांचीच चर्चा करतो. त्यांनीच आमच्या शहरात विकास योजना राबविल्यामुळे आज आमचे शहर विकसित दिसत आहे”, असे सोनिया सैनी या गृहिणीने सांगितले.

राजे या प्रांतात आधीपासूनच मोठ्या नेत्या मानल्या जात आहेत. एक तर राजेशाही वंशाशी त्यांची जोडलेली नाळ, निर्णय घेण्याची क्षमता व शक्तिशाली नेतृत्वगुण यामुळे त्यांचे सर्वांनाच कौतुक वाटते. भाजपामध्ये त्यांच्या नेतृत्वाला लागलेले ग्रहण लोकांच्या नजरेतून सुटलेले नाही. दीर्घ काळापासून भाजपाच्या कार्यक्रमांना त्यांची अनुपस्थिती, त्यांच्या समर्थकांना तिकीट मिळण्यात झालेला उशीर, अशा अनेक बाबी लोकांनी लक्षात ठेवल्या आहेत.

राजेंना दुखावणे भाजपाला या प्रांतात कठीण जाऊ शकते. कारण- राज्याच्या इतर भागांत काँग्रेसला मतदान झाले असले तरी हाडोती भागाने मागच्या निवडणुकीत भाजपाला मतदान केलेले आहे. २०१३ साली भाजपाने या ठिकाणी १७ पैकी १६ जागा जिंकल्या होत्या; तर २०१८ मध्ये काँग्रेसने राज्यात सत्ता मिळविली. तेव्हाही या भागात १७ पैकी १० जागा भाजपाने जिंकल्या होत्या; तर सात जागी काँग्रेसला विजय मिळाला होता. गहलोत सरकारने १२०० कोटींचा हेरिटेज चंबळ नदी प्रकल्प कोटा येथे योजिला असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून या प्रदेशात स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस करीत आहे.

झालरापाटनमधील रहिवासी व ट्रकचालक असलेल्या जहांगीर पठाण यांनी सांगितले की, हे मॅडमचे राज्य आहे. जरी त्यांनी मॅडमना मुख्यमंत्री बनविले नाही तरीही येथे त्यांचेच राज्य चालणार.

पण, भाजपासमर्थकांचे म्हणणे वेगळेच आहे. २५ नोव्हेंबर रोजी जरी भाजपाचा विजय झाला तरी राजे यांचे मुख्यमंत्री बनने कठीण असल्याचे ते म्हणतात. “भाजपामध्ये अनेक नेते आहेत. केंद्रातील नेते त्यांना मुख्यमंत्री बनविणार नाहीत. तसेच मोदीजींकडे पाहून लोक मतदान करतात हेदेखील सत्य आहे”, अशी प्रतिक्रिया कोटामधील निवृत्त सरकारी अधिकारी जी. एल. गौर यांनी दिली. १९७० पासून जनसंघ ते भाजपा असे ते भाजपाचे समर्थक आहेत, असेही गौर सांगतात. आणखी एक भाजपासमर्थक व दारा येथे रस्त्यालगत कचोरी विकणाऱ्या पवन कुमार यांनी सांगितले की, राजे इथल्या नैसर्गिक निवड आहेत आणि लोक त्यांनाच ओळखतात. आता हे पक्षावर निर्भर करते की ते कोणाला निवडतात?

भाजपाने राजे यांना बाजूला काढल्यामुळे भाजपाच्या कामगिरीवर परिणाम होईल, अशी शक्यता राजस्थान केंद्रीय विद्यापीठाच्या सार्वजनिक धोरणाचे प्राध्यापक एस. नागेंद्र आंबेडकर यांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, हाडोती प्रांत आणि आसपासच्या मतदारसंघांत कोणता संदेश दिला यावर सर्व अवलंबून आहे. जर राजे यांच्याबद्दलचा नकारात्मक संदेश गेला, तर भाजपाला विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात; पण जर त्यांनी (राजे) आशा जिवंत ठेवल्या, तर त्याचा पक्षावर इतका वाईट परिणाम होणार नाही.

राजे यांनीही मुख्यमंत्रिपद किंवा पक्षाबाबत कोणतीही प्रतिक्रिया न देण्याची काळजी घेतली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांचा मुलगा व तीन टर्म खासदार राहिलेल्या दुष्यंतच्या चांगल्या कामगिरीचे कौतुक करताना निवृत्त होण्याची इच्छा बोलून दाखविली होती. मात्र, काही वेळातच त्यांनी आपल्या वक्तव्यावरून घूमजाव करीत राजकारणात सक्रियतेने कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. तसेच आताच निवृत्त होण्याचा कोणताही विषय समोर नसल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपामधील एका महत्त्वाच्या नेत्याने सांगितले की, त्या खूप काळजीपूर्वक विधान करतात. त्या पक्षश्रेष्ठींसाठीही पर्याय खुला ठेवत आहेत.

खरे तर दोन वेळा मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या वसुंधरा राजे या भाजपाच्या एकमेव नेत्या आहेत, ज्या राज्यभर फिरून जाहीर सभा घेत आहेत आणि ‘रोड शो’ करीत आहेत. निवडणुका जाहीर झाल्यापासून राजे यांनी किमान २८ मतदारसंघांचा दौरा केला आहे. राजे यांचे समर्थक सांगतात त्याप्रमाणे अलीकडच्या काळात त्यांची अनेक कार्यक्रमांना अनुपस्थिती असल्याचे कारण म्हणजे त्यांना आमंत्रणच देण्यात आलेले नव्हते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व निवडणूक २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Not much importance from bjp but the vasandhura kings are still queens in her bastion kvg

First published on: 21-11-2023 at 11:15 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×