पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारसभा घेत आहेत. याबाबत आता मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रातल्या भाजपा नेत्यांमध्ये मराठा समाजाविषयी द्वेष आहे त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना सभा घ्याव्या लागत आहेत असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे ?
“नारायणगड या ठिकाणी आम्ही सभा घेणार आहोत. ३ मे रोजी सभेच्या ठिकाणी जाऊन तयारीची अंतिम पाहणी करणार आहोत. ९०० एकर जागेवर ही सभा होते आहे.” असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. “मराठा बांधवांमध्ये समज गैरसमज असण्याचं काही कारण नाही कारण मी राजकारण करत नाही. मी महायुतीलाही पाठिंबा दिलेला नाही आणि महाविकास आघाडीलाही पाठिंबा दिला नाही. कुठला अपक्ष उमेदवारही दिलेला नाही. त्यामुळे समज गैरसमज बाळगू नका” असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
समोरच्याला पाडणं हादेखील विजयच असतो
जे सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाजूने आहेत त्यांना मतदान करा असंच मी सांगेन. निवडणुकीत समोरच्याला पाडणं हा देखील विजयच असतो. त्यासाठी निवडणुकीला उभंच रहावं असं नाही. आम्ही जे काही बोलतो त्यातून ज्यांना जो काही मेसेज जायचा आहे तो गेला आहे असंही सूचक वक्तव्य जरांगे यांनी केलं. “मराठा समाज माझ्या बाजूने म्हणजेच त्यांच्या मुलाच्या बाजूने उभा आहे. आम्ही उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे आमचा नाईलाज आहे पण बरोबर व्हायचा तो कार्यक्रम होणार आहे. धनंजय मुंडे जे म्हणत आहेत तसं राजकारण आम्ही केलं असतं तर यांच्या चार पिढ्या निवडूनच आल्या नसत्या. आम्ही राजकारण करत नाही. आम्ही धनंजय मुंडे किंवा कुणाच्याच विरोधात नाही. आम्हाला सगे सोयऱ्यांची अंमल बजावणी असलेलं आरक्षण हवं आहे. अन्यथा विधानसभेची तयारी आम्ही सुरु केली आहे.”
हे पण वाचा- ‘सगेसोयरे’ ज्यांना मान्य, त्यांच्या पाठीशी मराठा समाज; धाराशिव दौर्यात मनोज जरांगे-पाटील यांचे मत
महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांमध्ये मराठा समाजाचा प्रचंड द्वेष
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधीही त्यांचं चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हाचा प्रचार आजवर केलेला नाही. मात्र महाराष्ट्रातले जे भाजपाचे नेत्यांनी त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आणली की महाराष्ट्रात त्यांना पाच टप्प्यांत निवडणूक घ्यावी लागते आहे. ज्या ठिकाणी ८८ उमेदवार आहेत त्या उत्तर प्रदेशात एका टप्प्यात निवडणूक पार पडते आहे. तर ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक घ्यावी लागते आहे. ही वेळ मोदींवर महाराष्ट्रातल्या स्थानिक नेत्यांनी आणली आहे. भाजपाच्या महाराष्ट्रातल्या स्थानिक नेत्यांना मराठ्यांचा द्वेष आहे. त्यामुळे मोदींना महाराष्ट्रातच जास्त सभा घ्याव्या लागत आहेत. त्यामुळेच इथेच मराठे जिंकले आहेत. सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही तर भविष्यात यापेक्षा वाईट वेळ पंतप्रधानांवर येऊ शकते. तीदेखील त्यांच्या भाजपाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांमुळेच असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.