PM Modi on Muslim Community : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांच्या प्रचारात मुस्लिम आरक्षण हा कळीचा मुद्दा बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींसह वेगवेगळे राष्ट्रीय नेते यावर आपापल्या भूमिका मांडत आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये यावरून वादही चालू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समुदायाला संदेश दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी मुस्लिम आरक्षणावर सविस्तर भूमिका मांडली. मोदी म्हणाले, संविधान सभेत देशातील अनेक विचारवंत आणि मान्यवर बसले होते. तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपाचा एकही सदस्य नव्हता. तिथे सर्व पंथांचे लोक उपस्थित होते. या सर्व लोकांनी प्रदीर्घ चर्चा करून निर्णय घेतला की, भारतासारख्या देशात धर्माच्या आधारावर आरक्षण दिल्यास देशाचं खूप नुकसान होईल. त्याचवेळी त्यांनी समाजातील अस्पृश्यता, जातीवर आधारित भेदभाव आणि अशाच विकृती दूर करण्यासाठी दलितांना, आदिवासांनी आरक्षण दिलं पाहिजे असा निर्णय घेतला.

नरेंद्र मोदी म्हणाले, “केवळ दलित आणि आदिवासींना आरक्षण देणं म्हणजे मुस्लिम समुदायाला कुठलाही लाभ मिळणार नाही असं नाही. आमच्या भाजपा सरकारने सामान्य जातींना १० टक्के आरक्षण दिलं आहे. त्यामध्ये मुस्लिम समुदायातील गरीबदेखील समाविष्ट आहे. तेदेखील सरकारी योजनांचे वाटेकरी आहेत. आम्ही कोणाचेही अधिकार हिरावत नाही आहोत. आम्ही केवळ आरक्षणासाठी धर्माचा आधार घेण्यास विरोध करत आहोत. या देशातील गरीब व्यक्ती जी हिंदू असेल, मुस्लिम, ख्रिस्ती किंवा पारसी यापैकी कुठल्याही धर्माची असली तरी त्यांना सर्व फायदे मिळतील.” टाईन्म नाऊला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी मुस्लिम समुदाय, त्यांचं आरक्षण, मुस्लिम मतदारांबाबत रोखठोक भूमिका मांडली.

मोदी म्हणाले, “मी आणि माझा पक्ष धर्माच्या नावाखाली व्होट बँक तयार करणे आणि निवडणूक जिंकण्याच्या खेळाविरोधात आहोत. सरकारी योजनांचा लाभ सर्वांनाच मिळतो. या योजना धर्म किंवा समाज पाहून लोकांपर्यंत पोहोचवल्या जात नाहीत.” यावेळी पंतप्रधान मोदी यांना विचारण्यात आलं की, तुमची देशात मुस्लिमविरोधी प्रतिमा तयार होतेय किंवा केली जातेय, त्याबद्दल काय सांगाल? यावर मोदी म्हणाले, मी इस्लाम किंवा मुसलमानांचा विरोधक नाही. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंपासून काही लोकांनी आमच्याबद्दल वाईट जनमत बनवलं आहे, आम्ही मुस्लिमविरोधी असल्याची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. काही लोक आम्हाला मुसलमानांचे शत्रू तसेच स्वतःला त्यांचे मित्र म्हणवतात आणि व्होट बँकेचं राजकारण करतात.

हे ही वाचा >> उर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणात बत्तीगुल, भर मंचावर अंधार झाल्यावर म्हणाले, “हमको रोक सके किसी अंधेरेमें…”

नरेंद्र मोदी म्हणाले, आमच्याबद्दल असत्य पसरवणाऱ्या लोकांचा खरा चेहरा जनतेच्या लक्षात आला आहे. आमच्या विरोधकांनी डोकं आणि हात-पाय नसलेलं खोटं पसरवण्याचा प्रयत्न केला, मात्र जनता शहाणी झाली आहे. त्यांनी मुस्लिम समुदायाला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र माझी सुशिक्षित आणि शहाण्या मुसलमानांना विनंती आहे की, त्यांनी आता आत्मचिंतन करावं. मी पहिल्यांदाच हे वक्तव्य करतोय. मुस्लिम समुदायाने विचार करायला हवा की, देश खूप वेगाने पुढे जातोय आणि त्यांच्या समाजात काही कमी राहिलं असेल तर त्याची कारणं काय आहेत?