नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘मध्यस्थी’चा प्रयत्न केल्याचा धक्कादायक दावा पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमिरदरसिंग यांनी सोमवारी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

पंजाबमधील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, पंजाब लोक काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल (संयुक्त) या तीन पक्षांमधील जागावाटप सोमवारी जाहीर करण्यात आले. या आघाडीत, भाजपकडे मोठय़ा भावाची जबाबदारी आली असून हा राष्ट्रीय पक्ष ६५ जागा लढवेल. अमिरदरसिंग यांचा पंजाब लोक काँग्रेस ३७ तर, सुखदेवसिंग िढढसा यांच्या पक्षाला १५ जागा देण्यात आल्या आहेत. सोमवारी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नड्डा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अमिरदरसिंग यांनी काँग्रेस व प्रामुख्याने नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर गंभीर आरोप केले.

२०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अमिरदर सिंग यांनी सिद्धू यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या वतीने फोनद्वारे तसेच लेखी पत्राद्वारेही सिद्धू यांना पुन्हा मंत्रिपद देण्याची विनंती करण्यात आली होती. सिद्धू हे आपले घनिष्ठ मित्र आहेत. त्यांना पुन्हा मंत्री केले जावे, ते उपयुक्त नसतील तर त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, असा संदेशही पोहोचवण्यात आल्याचा दावा अमिरदरसिंग यांनी केला.

‘मी इम्रान खान यांना व्यक्तिश: ओळखत नाही वा त्यांना मी कधीही भेटलेलो नाही. त्यांच्याकडून आलेल्या संदेशामुळे मला कोणतेही आश्चर्य वाटले नाही. पण, मंत्रिपदासाठी शेजारच्या देशाच्या पंतप्रधानाकडून एखादी व्यक्ती माझ्यावर दबाव आणत आहे, हे पाहून मला धक्का बसला’, असे अमिरदरसिंग म्हणाले. अमिरदरसिंग यांच्या विधानांवर नवज्योतसिंग सिद्धू यांनी वा काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

पंजाबमध्ये २०१७ मध्ये अमिरदरसिंग सरकार स्थापन झाल्यानंतर सिद्धू यांना मंत्रिपद देण्यात आले होते पण, दोघांमधील सातत्याने होणाऱ्या वादानंतर अमिरदरसिंग यांनी सिद्धू यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळय़ाला सिद्धू उपस्थित राहिले होते व तिथे पाकचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांना मिठी मारली होती. सिद्धू यांच्या या ‘कृत्या’वरून गदारोळ माजला होता, अमिरदरसिंग यांनीही सिद्धू यांच्यावर जाहीर टीकाही केली होती.

पंजाबच्या प्रचारातही पाकिस्तान’, भाजपचे संकेत

पाकिस्तानचा भारताला धोका असल्याने देशाच्या सुरक्षेसाठी पंजाबमध्ये सक्षम व स्थिर सरकार स्थापन झाले पाहिजे, असे मत व्यक्त करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी, उत्तर प्रदेशप्रमाणे पंजाबातही ‘पाकिस्तान’ हा काँग्रेसविरोधात निवडणूक प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवला जाणार असल्याचे संकेत दिले. पाकिस्तान सातत्याने भारताविरोधात कुरापती करत आहे. सीमेपलिकडून शस्त्रास्त्रे पाठवली जातात, अमली पदार्थाची तस्करी होते, ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला जातो. या देशविरोधी कृत्यांना आळा घालायचा असेल आणि पाकिस्तानपासून देशाचे संरक्षण करायचे असेल तर, पंजाब सुरक्षित राहिला पाहिजे, असे नड्डा म्हणाले. पंजाबकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून केंद्र व राज्य यांच्यात अधिक समन्वय असला पाहिजे. त्यासाठी दोन्हीकडे एकाच आघाडीचे सरकार असले पाहिजे, पंजाबला आता डबल इंजिनची आवश्यकता असल्याचा दावा नड्डा यांनी केला.