“लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देतील” असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यापाठोपाठ आता उद्धव ठाकरेदेखील भाजपाबरोबर जातील असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आंबेडकर म्हणाले, “लोकसभेच्या निकालानंतर दोन्ही भाऊ तुम्हाला भाजपाबरोबर दिसतील, असं आमचं ठाम मत आहे.” यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मात्र आंबेडकरांचा दावा खोडून काढला आहे.

भारतीय जनता पार्टी लोकसभा निवडणुकीच्या आधी ‘अब की बार ४०० पार’ अशी घोषणा देत होती. मात्र निवडणुक जसजशी पुढे सरकू लागली तसतशी भाजपाची ही घोषणा मागे पडू लागले. भाजपा नेते ३९० आणि नंतर ३७० जागा मिळतील असा दावा करू लागले. दरम्यान, लोकसभेच्या प्रचाराचा आढावा घेणाऱ्या अनेक विश्लेषकांनी दावा केला की, “विरोधी पक्ष या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना जोरदार टक्कर देताना दिसत आहेत.” त्याचबरोबर भाजपानेही त्यांच्या प्रचाराचा कार्यक्रम वाढवला. एकट्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक काळात २० हून अधिक दौरे करावे लागले. यावरून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचं म्हणजेच महाविकास आघाडीचं मनोबल वाढलं आहे. अशातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दावा केला आहे की, २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत भाजपाला यावेळी खूप कमी जागा मिळतील. तसेच काँग्रेसच्या जागा वाढतील.

शरद पवार यांनी काही वेळापूर्वी पत्रकार प्रशांत कदम यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण केलं. यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, भाजपाप्रणित एनडीएला बहुमतापेक्षा काही जागा कमी पडल्या आणि त्यांनी उद्धव ठाकरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख) यांना साद घातली तर उद्धव ठाकरे एनडीएत जातील? यावर शरद पवार ठामपणे म्हणाले, अशी अजिबात शक्यता नाही, उद्धव ठाकरे अजिबात म्हणजे अजिबात तिकडे जाणार नाहीत. उद्धव ठाकरे हे भाजपा आणि नरेंद्र मोदींजवळ जाणार नाहीत, बिलकूल जाणार नाहीत.

हे ही वाचा >> “श्रीमंताच्या मुलाला निबंध लिहायला सांगता, ऑटो-टॅक्सी, ट्रक चालकाला…”, पुण्यातील अपघातावरून राहुल गांधींचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच एका मुलाखतीवेळी उद्धव ठाकरेंबाबत बोलताना मवाळ भूमिका घेतली होती. मोदी म्हणाले होते, “माझे उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबाबरोबर जिव्हाळ्याचे संबंध आहेत. भविष्यात उद्धव ठाकरे एखाद्या अडचणीत सापडले तर त्यांच्यासाठी धावून जाणारी पहिली व्यक्ती मी असेन”. मोदींच्या या वक्तव्यानंतर ते उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीएत) येण्यासाठी साद घालत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे की ते कोणत्याही परिस्थिती एनडीएबरोबर जाणार नाहीत. अशीच भूमिका आज शरद पवार यांनीदेखील मांडली.