पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन भागात रविवारी (१९ मे) पहाटे नंबरप्लेट नसलेल्या एका आलिशान कारने मोटरसायकलला धडक दिली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर पोलिसांनी कार चालवणाऱ्या अल्पवयीन (साडेसतरा वर्षे) आरोपीला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर रविवारी दुपारी त्याला विशेष हॉलिडे कोर्टात हजरही करण्यात आलं. मात्र न्यायालयाने तो अल्पवयीन आहे म्हणून त्याचा जामीन मंजूर केला. तसेच त्याला अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहायला लावला. याशिवाय पोलिसांनी कुठल्याही प्रकारची मोठी कारवाई केली नव्हती. दरम्यान, याप्रकरणी समाजमाध्यमं आणि लोकांकडून प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर गृह मंत्रालय आणि प्रशासन जागं झालं. पुणे पोलिसांनी अपघाताच्या तीन दिवसांनंतर अल्पवयीन आरोपीच्या वडिसांसह बार मालक (ज्या बारमध्ये आरोपीने मद्यप्राशन केलं होतं) आणि मॅनेजरला अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, प्रशासनाच्या या भोंगळ कारभारावर सर्व स्तरातून टीका होत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने समाजमाध्यमांवर राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी म्हटलं आहे, बस चालक असो, ट्रकचालक, ओला, उबर, ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी चालक असो, यांच्यापैकी कुठल्याही चालकाने चुकून एखादा अपघात केला, त्या अपघातात कोणाचा बळी गेला तर त्या चालकाला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होते. त्यांच्या वाहनाची चावी घेऊन ती फेकून दिली जाते. परंतु, त्यांच्याजागी एखादा श्रीमंतांच्या घरातला १७ वर्षांचा मुलगा असेल, जो दारू पिऊन पोर्शसारख्या कंपनीची महागडी कार चालवत असेल आणि त्याने एखादा अपघात केला, त्यात दोन जणांची हत्या केली तर त्याला काय शिक्षा होते? त्याला केवळ निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली जाते.

राहुल गांधी म्हणाले, निबंध लिहिणे हाच नियम असेल तर ट्रक, बस. उबर, ओला, ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी चालकाने अपघात केला तर त्याला तुम्ही निबंध लिहायला का लावत नाही? नुकताच एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातल्या श्रीमंत आणि गरिबांमधल्या वाढत्या दरीबद्दल प्रश्न विचारला होता. त्यांना विचारण्यात आलं होतं की, आपल्या देशाचे दोन भाग तयार झालेत, एक श्रीमंतांचा भारत आणि दुसरा गरिबांचा भारत, यावर तुमचं मत काय? ही स्थिती कशी सुधारता येईल? यावर मोदी पत्रकारांना म्हणाले, तुमची काय अपेक्षा आहे? मी सगळ्यांनाच गरीब करू का?

हे ही वाचा >> “त्यांनी शिंदेंना सलाम ठोकणं मला पटलं नाही”, पत्नीच्या वक्तव्यावर गजानन कीर्तिकर म्हणाले, “माझ्यावर…”

काँग्रेस नेते म्हणाले, मोदींनी त्या प्रश्नावर काय उत्तर दिलं हे महत्त्वाचं नाही. इथे महत्त्वाचा मुद्दा आहे तो न्यायाचा. श्रीमंतांना आणि गरिबांना वेगवेगळा न्याय दिला जातोय तो महत्त्वाचा मुद्दा आहे. आमच्या मते व्यक्ती गरीब असो अथवा श्रीमंत, प्रत्येकाला सारखा न्याय मिळायला हवा. यासाठीच आम्ही लढत आहोत, न्याय मिळवण्यासाठी आम्ही लढतोय. यांच्या (सत्ताधाऱ्यांच्या) अन्यायाविरोधात आम्ही लढत आहोत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi slams govt over pune porsche accident asc