‘मोदी तेरे नाम उत्तर प्रदेश..’

मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्येही भाजपने मिळविलेले यश भुवया उंचावणारे आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या विजयानंतर शनिवारी लखनौमध्ये पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला. 

 

३१२ जागा जिंकून लोकप्रियतेचा कळस ; समाजवादी- काँग्रेस भुईसपाट तर बसपची नीचांकी कामगिरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाराणसी ऊर्फ बनारसमध्ये तीन दिवस रोड शो केले, तेव्हा या काशीनगरीच्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये एकच घोषणा घुमत होती..

सुबह बनारस, श्याम बनारस,

मोदी तेरे नाम बनारस..

पण शनिवार सकाळपर्यंत कोणालाही अंदाज नव्हता, की नवी घोषणा जन्माला आली आहे..

सुबह उत्तर प्रदेश, श्याम उत्तर प्रदेश,

मोदी तेरे नाम उत्तर प्रदेश..

मोदींची लाट फक्त बनारसपुरती राहिली नाही. किंबहुना ती धार्मिक ध्रुवीकरणाचे आगर असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशपासून चालू झाली आणि वाराणसीला पोटात घेतलेल्या पूर्वाचलमध्ये अंतिमत: थडकली. वाटेतील यादवलँड असलेल्या अवधला, दुष्काळी असलेल्या बुंदेलखंडलाही आपल्याकडे ओढले.  अतिशय मर्यादित सामाजिक पाया असलेल्या भाजपला एवढय़ा जागा अगदी रामजन्मभूमी आंदोलनाच्या परमोच्च शिखरावरही मिळाल्या नव्हत्या. १९९१मधील २२१ ही भाजपची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या. पण मोदी त्सुनामीने नुसता पंधरा वर्षांचा राजकीय वनवासच संपविला नाही, तर समाजवादी पक्ष व काँग्रेस यांच्या आघाडीला आकार देणाऱ्या ‘यूपी के लडकें’ना (अखिलेशसिंह यादव व राहुल गांधी) भुईसपाट केले आणि बहेनजींवर तर लाजिरवाण्या पराभवाची वेळ आणली. मायावतींना लोकसभेत एकही जागा मिळाली नव्हती आणि आता फक्त १९ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

मोदींनी लोकसभेत असाच चमत्कार केला होता. ८०पैकी तब्बल ७३ जागा जिंकल्या होत्या. पण नंतर दिल्ली व बिहारमध्ये नाक कापल्याने मोदींची लोकप्रियता घटल्याचे मानले जात होते. पण उत्तर प्रदेशच्या निकालांनी त्यांच्याबद्दलच्या साऱ्या प्रश्नचिन्हांना एका झटक्यात दूर केले. जवळपास लोकसभेसारखीच कामगिरी भाजपने केली आहे. तेव्हा भाजप तीनशेहून अधिक मतदारसंघांमध्ये आघाडीवर होता. साधारणत: तेवढे मतदारसंघ भाजपने काबीज करून दिल्ली व बिहारमधील लाजिरवाण्या पराभवाचा तितकाच शानदारपणे वचपा घेतला.

मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्येही भाजपने मिळविलेले यश भुवया उंचावणारे आहे. त्यामध्ये देवबंद, कैराना, मुझफ्फरनगरपासून ते रामपूपर्यंतच्या अनेक मतदारसंघांचा समावेश आहे.

अमेठी जिल्ह्य़ातील चारही जागा काँग्रेसने गमावल्या

  • गांधी-नेहरू घराण्याचा परंपरागत बालेकिल्ला असलेल्या अमेठी जिल्ह्य़ातील चारही जागा काँग्रेसने गमावल्या असून त्यापैकी तीन भाजपने हिसकावल्या आहेत.
  • समाजवादी पक्षाचे आमदार राकेश प्रताप सिंह यांनी गौरीगंज मतदारसंघात काँग्रेसचे मोहम्मद नईम यांना २६ हजारांहून अधिक मतांनी हरवून आपली जागा राखली.
  • तिलोइमध्ये भाजपचे मयंकेश्वर शरण सिंह यांनी बसपचे मोहम्मद सौद यांना हरवले.
  • जगदीशपूर (राखीव) मतदारसंघात भाजपचे सुरेश पासी यांनी निकटचे उमेदवार काँग्रेसचे आमदार राधेश्याम धोबी यांचा पराभव केला.
  • २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत अमेठीत खातेही उघडू न शकलेल्या भाजपने या वेळी तीन जागा जिंकल्या आहेत.

मतदार यंत्रांमध्ये घोटाळा झाल्याचा बसप प्रमुख मायावती यांचा आरोप

मतदान यंत्रातील (ईव्हीएम) कुठलेही बटण दाबले तरी ते मत भाजपच्या उमेदवारालाच पडेल, अशा रीतीने या यंत्रांमध्ये घोटाळा करण्यात आला, असा आरोप निवडणुकीत धूळधाण झालेल्या बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी केला असून, उत्तर प्रदेशात फेरमतदानाची मागणी केली आहे. निवडणुकीच्या निकालांचे वर्णन ‘धक्कादायक’ असे करतानाच, निवडणूक आयोगाने मतमोजणी तत्काळ थांबवून निकाल रोखवून धरावेत, तसेच कागदी मतपत्रिकांचा वापर करून नव्याने निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी मायावती यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यात थोडी जरी नैतिकता व प्रामाणिकता शिल्लक असेल तर त्यांनी राज्यात नव्याने निवडणुका घेण्यास निवडणूक आयोगाला सांगावे, असे आवाहन केले.

सत्ताविरोधी लाटेमुळे भाजपला यश मिळाले आहे. उत्तर प्रदेशसह, उत्तराखंड, मणिपूर व पंजाबमध्ये हेच चित्र दिसले. भाजपच्या विरोधात आता एकी गरजेची आहे.

डी. राजा, भाकप नेते

समविचारी पक्षांच्या मदतीने  गोव्यात काँग्रेस सरकार स्थापन करेल. गोवा फॉरवर्डसारख्या समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा आम्ही प्रयत्न करू.

दिग्विजय सिंह, काँग्रेस नेते

 

यांच्या गळ्यात हार’..!

पाच राज्यांतील निकालाने अनेक नेत्यांना दणका दिला असून, नको असतानाही गळ्यात पडलेला पराभवाचा हा ‘हार’ मिरवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे..

अखिलेश यादव

काम बोलता है.. असे घोषवाक्य घेऊन मुख्यमंत्री अखिलेश यादव मतदारांना सामोरे गेले खरे, मात्र त्यांच्या समाजवादी पक्षाला अतिशय मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसशी आघाडी करण्याचा त्यांचा निर्णय चुकला, असे आता बोलले जाऊ लागले आहे.

प्रकाशसिंग बादल

पंजाबमध्ये अकाली दल-भाजप युतीचा पराभव होणार, हे सारेच जाणून होते. ८९ वर्षीय मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हे जणू हरलेली लढाईच लढत होते. सत्तेतील अमाप घराणेशाही, अमलीपदार्थाच्या काळ्याकभिन्न सावटाखालील तरुण पिढी आदी मुद्दे बादल यांना पराभवापर्यंत घेऊन गेले.

अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल हे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या यशाबाबत फाजील आत्मविश्वास बाळगून होते. हे राज्य जिंकून राष्ट्रीय पातळीवरील राजकीय महत्त्वाकांक्षेचा विस्तार करण्याचे केजरीवाल यांचे मनसुबे मतदारांनी धुळीस मिळवले.

हरीश रावत

मोदी यांची लाट, राज्य सरकारवरील भ्रष्टाचाराचे आरोप, काँग्रेस नेत्यांमधील बेबनाव, केदारनाथ येथील निसर्गाच्या प्रलंयकारी विध्वंसानंतर परिस्थिती आटोक्यात आणण्यात आलेले अपशय अशी अनेक मुद्दय़ांची माळच लागल्याने मुख्यमंत्रिपदी असलेले हरीश रावत यांना उत्तराखंडमधील काँग्रेसची सत्ता राखता आली नाही.

मायावती

उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या हाती सत्तेच्या चाव्या येतील, असा अंदाज वर्तविला जात होता, मात्र तो खोटा ठरला.  उत्तर प्रदेश विधानसभेतील आमदार संख्या जेमतेम विशीच्या घरात. या स्थितीमुळे या पक्षाच्या अस्तित्वापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

राहुल गांधी

काँग्रेसचे सध्याचे उपाध्यक्ष आणि भावी अध्यक्ष अशी ओळख प्रदीर्घ काळापासून बाळगत आलेले राहुल यांच्यासाठी उत्तर प्रदेशातील पानिपत लाजिरवाणे आहे. राहुल यांच्या निर्णयक्षमतेवरील,त्यांच्या नेतृत्वक्षमतेवरील प्रश्नचिन्ह या निकालाने अधिकच गडद केले.

मतदानोत्तर चाचण्या

मतदानोत्तर चाचण्यांचे पक्षीय बलाबलाचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज चुकीचे ठरले आहेत. उत्तर प्रदेशात भाजपला इतके प्रचंड बहुमत मिळेल, असा अंदाज या चाचण्यांतून आला नव्हता. ‘आप’ला पंजाबात बऱ्यापैकी यश मिळेल, हा त्यांचा अंदाजही फोल ठरला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व उत्तर प्रदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Narendra modi bjp assembly election 2017 assembly election result 2017 uttar pradesh election result 2017