850,000-Year-Old Cannibalism Evidence Discovered in Spain: अलीकडेच स्पेनमधल्या पुरातत्त्व अभ्यासकांनी एक धक्कादायक पुरावा शोधून काढला आहे. ८ लाख ५०हजार वर्षांपूर्वी मानवाच्या पूर्वजांनी लहान मुलांच्या मांसाचे भक्षण केले होते. पुरातत्त्व अभ्यासकांना याविषयीचे पुरावे ग्रॅन डोलिना या गुहेत सापडले. ही गुहा स्पेनच्या Atapuerca या भागात आहे. अतापुएरका (Atapuerca) हे स्पेनमधील बुर्गोस प्रांतात असलेले एक महत्त्वाचे पुरातत्त्वीय आणि जीवाश्म स्थळ आहे. २००० साली युनेस्कोने अतापुएरकाला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे.
हे ठिकाण मानवी उत्क्रांतीच्या अभ्यासासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. अतापुएरका याच भागात असलेल्या ग्रॅन डोलिना या गुहेत अभ्यासकांना एका मुलाच्या मानेचे हाड सापडले असून त्या हाडावर कापल्याच्या खुणा आहेत. या खुणांच्या विश्लेषणातून असे समजले की, दोन ते चार वर्षे वयोगटातील या मुलाची हत्या करून त्याचे मांस खाण्यात आले होते. या नव्या शोधामुळे होमो अँटेसेसर नावाची मानवाची प्रजाती नरभक्षक होती, या पूर्वीच्या सिद्धांताला बळकटी मिळाली आहे. ही प्रजाती स्वतःच्याही मुलांच्या मांसाचे भक्षण करत होती. हा त्यांच्या सामाजिक वर्तनाचा भाग असावा, असे अभ्यासक सांगतात.
होमो अँटेसेसर कोण होते?
ग्रॅन डोलिना (Gran Dolina) या गुहेत सापडलेल्या अवशेषांमुळे वैज्ञानिकांनी होमो अँटेसेसर (Homo antecessor) नावाच्या मानवी प्रजातीचा शोध लावला. ही प्रजाती सुमारे १२ लाख ते ८ लाख वर्षांपूर्वी अस्तित्त्वात होती. या प्रजातीचा मेंदू आधुनिक मानवांच्या तुलनेत लहान होता, पण शारीरिकदृष्ट्या ते मजबूत होते. ग्रॅन डोलिनामध्ये दोन ते चार वर्षांच्या मुलाचे हाड सापडले आहे. या हाडावर कापल्याच्या खुणा होत्या. या खुणा नेहमी शिकार केलेल्या प्राण्यांवर दिसतात. यावरून स्पष्ट होते की, त्या मुलाची हत्या करून त्याचे मांस खाल्ले होते. याशिवाय, इतर हाडांवरही मांस काढण्याच्या खुणा आणि मानवी दातांचे ठसे सापडले आहेत.

- या गुहेत सापडलेल्या हाडांच्या विश्लेषणातून असे स्पष्ट झाले आहे की, प्राचीन मानवाने लहान मुलांची शिकार केली होती. मानवी पॅलेओइकोलॉजी आणि सामाजिक उत्क्रांतीच्या कॅटलान इन्स्टिट्यूट (IPHES) येथील तज्ज्ञांनी येथे केलेल्या उत्खननात त्यांना लहान मुलांच्या कण्याचे हाड सापडले आहे.
- त्या हाडावर ज्या ठिकाणी खुणा आहेत त्या ठिकाणी सामान्यतः डोक वेगळं केल जात किंवा शिकरीचे तुकडे केले जातात. या उत्खननाचे सह-निदेशक डॉ. पालमिरा सलादिये यांनी संगितले की, या हाडांवर आढळणार्या खुणा मांस काढण्यासाठीच्या प्रक्रिया सूचित करतात.
- या ठिकाणी गेल्या ३० वर्षांत अनेक व्यक्तींची हाडे सापडली आहेत. त्यातील बऱ्याच हाडांवर मांस काढण्याच्या खुणा आणि मानवी दातांच्याही खुणा दिसून आल्या आहेत. त्यात प्रौढ व्यक्तींचाही समावेश आहे.
- नरभक्षण ही एखादी वेगळी घटना नसून, होमो अँटेसेसर या महत्त्वाच्या मानवपूर्वज प्रजातीमध्ये ही एक नियमित प्रथा होती, असे हा शोध सूचित करतो.
- होमो अँटेसेसरच्या मेंदूची क्षमता आधुनिक मानवांच्या तुलनेत कमी आणि शरीर अधिक मजबूत होते. पण कदाचित त्यांनी उजव्या हाताचा वापर करण्याची सवय आणि प्राथमिक प्रतिकात्मक भाषा विकसित केली असावी, असे तज्ज्ञ सांगतात.
- तज्ज्ञांच्या मते, नरभक्षणाचे अनेक उद्देश असू शकतात. यात पोषणाची गरज भागवणे, धार्मिक विधींचा भाग म्हणून मांस वापरणे किंवा सामाजिक नियंत्रणासाठी ही कृती करणे यांचा समावेश होत होता. हा शोध मानवाच्या पूर्वजांमधील पद्धतशीर नरभक्षणाचा सर्वात जुना थेट पुरावा असू शकतो, असे तज्ञ सांगतात.
जगातील इतर भागांतील समान शोध प्राचीन मानवांच्या इतिहासातील नरभक्षण केवळ स्पेनपुरते मर्यादित नव्हते. केनियातील पुरातत्त्वीय स्थळांवर सापडलेल्या मानवी हाडांचे वय सुमारे १४.५ लाख वर्षे असल्याचे समजते आणि त्यावर कापल्याच्या खुणा दिसतात. युनायटेड किंगडममध्ये सोमरसेटमधील चेडर गॉर्ज येथे सापडलेल्या कवटींवरून असे संकेत मिळतात की, प्राचीन मानवांनी मानवी कवटींपासून पिण्याच्या भांड्यांची निर्मिती केली होती. अतापुएरकातील हा ताजा शोध आपल्याला प्राचीन काळातील जगण्यासाठीचे उपाय आणि सामाजिक संरचनेबद्दल अधिक अस्वस्थ करणारी माहिती देतो. तसेच, यामुळे आपल्या आदिम नातलगांच्या भावनिक आणि संज्ञानात्मक क्षमतांबद्दल नवे प्रश्नही उपस्थित होतात.
अतापुएरकातील हा शोध केवळ भूतकाळातील क्रूर वास्तव उघड करत नाही, तर मानवजातीच्या उत्क्रांतीच्या गुंतागुंतीकडेही आपले लक्ष वेधतो. जगण्यासाठीची झुंज, सामाजिक रचना, आणि मानसिकतेचा आरंभिक प्रवास समजून घेण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. कदाचित आपल्या पूर्वजांचे जगण्याचे मार्ग आज आपल्याला अस्वस्थ करणारे वाटतात, पण तेच मानव इतिहासाच्या या दीर्घ प्रवासाचे अनिवार्य सत्य आहे.