Air India Plane Crash Ahmedabad Fuel Control Switches : गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला होता. तपास यंत्रणांकडून या अपघाताचा प्राथामिक अहवाल नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. विमानाच्या फ्लाइट व व्हॉइस रेकॉर्डरमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास यंत्रणांनी इंजिनाच्या इंधन नियंत्रित करणाऱ्या बटणाकडे विशेष लक्ष दिल्याची माहिती आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला आणि तपास यंत्रणांनी अहवालात नेमकं काय नमूद केलं? त्याबाबत जाणून घेऊ…
गुजरातहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात १२ जून रोजी झाला होता. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर हे विमान केवळ ३२ सेकंदांतच एका निवासी इमारतीवर कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील २६२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, ज्यामध्ये १० केबिन क्रू सदस्यांचा समावेश होता. विशेष बाब म्हणजे विमानाच्या ११ अ क्रमांकाच्या सीटवर बसलेला एक प्रवासी अपघातातून चमत्कारिकरीत्या बचावला.
विमान वाहतूक क्षेत्रातील प्रसिद्ध प्रकाशन ‘The Air Current’च्या माहितीनुसार, अहमदाबाद येथील विमान अपघाताचा तपास करणाऱ्या पथकानं या अपघाताचं कारण शोधून काढलं आहे. तपासकर्त्यांनी विमानाचं इंधन नियंत्रित करणाऱ्या बटणाकडे विशेष लक्ष्य केंद्रित केलं आहे. अपघाताच्या वेळी वैमानिकानं या बटणाचा वापर केल्याचं समोर आलं असून इंधन नियंत्रित ठेवणारं बटण चुकून दाबलं गेल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
आणखी वाचा : निवृत्तीनंतरही माजी सरन्यायाधीशांनी का सोडला नाही सरकारी बंगला? कारण काय?
अहवालात नेमकं काय म्हटलंय?
- अहवालानुसार, विमान हवेत असताना ‘रन’वरून ‘कट-ऑफ’चं बटण दाबलं गेलं, तर इंजिनाला होणारा इंधनपुरवठा बंद होतो.
- इंधन नियंत्रित ठेवणारं बटन दाबल्यानं विमानाचं इंजिन लगेच बंद होतं आणि त्याची सर्व शक्ती (थ्रस्ट) कमी होते.
- त्यानंतर विमानाच्या इंजिनाबरोबर जोडलेली दोन्ही विद्युत जनरेटर्स बंद पडतात आणि त्याचा परिणाम कॉकपिटमधील महत्त्वाच्या स्क्रीनवर होतो.
- विमानाला इंधनाचा पुरवठा करणारे हे बटण थ्रॉटल लीव्हर्सच्या खाली असलेल्या एका इंधन नियंत्रण पॅनेलमध्ये बसवलेले असते.
- वैमानिकाकडून हे बटन चुकून दाबले जाऊ नये म्हणून त्याभोवती संरक्षणात्मक ब्रॅकेट्स लावलेले असतात.
- प्रत्येक बटणात एक मेटल स्टॉप लॉकही लावलेला असतो, जो बटण दाबण्याआधी वैमानिकाला उचलावा लागतो.
वैमानिकाने बटण दाबले होते का?
एअर इंडिया अपघाताशी संबंधित प्राथमिक तपास अहवालात महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. १५ पानांच्या अहवालात कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये काय संवाद झाला, याची माहिती देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच दोन्ही इंजिन बंद झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे स्विचेस बंद झाल्यानंतर विमानाचे इंजिन बंद झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. विमानाच्या एखाद्या इंजिनाला आग लागली, तर त्या इंजिनाशी जोडलेले फ्युएल कंट्रोल बटण लाल रंगात प्रकाशमान होते. त्यामुळे वैमानिकाला त्वरित आणि स्पष्ट इशारा मिळतो.
कॉकपिटमध्ये रेकॉर्ड झालेल्या संवादात एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकाला विचारले की, “तू इंधन पुरवठा का बंद केलास?” तर दुसऱ्या वैमानिकाचे उत्तर होते की, ‘मी काहीही केलेले नाही’ असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचे मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल आणि सह-वैमानिक क्लाइव्ह कुंदर होते, दोघांनाही विमान उड्डाणाचा पुरेसा अनुभव होता. सभरवाल यांना बोईंग विमान उड्डाणाचा ८,६०० तास तर कुंदर यांना १,१०० तासांहून अधिक विमान उड्डाणाचा अनुभव होता. उड्डाणापूर्वी दोन्ही वैमानिकांना पुरेसा विश्रांतीचा कालावधी मिळाला होता,
ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय आढळलं?
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार, अपघातस्थळावरून ताब्यात घेतलेल्या ब्लॅक बॉक्सची तपासणी सुरू आहे. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरोच्या प्रयोगशाळेत त्याच्या मेमरी मॉड्यूलमधून डेटा यशस्वीरीत्या डाऊनलोड करण्यात आला आहे. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी चुकीमुळे झाला हे स्पष्ट करण्यासाठी आता तपासकर्त्यांकडून या डेटाचं विश्लेषण केलं जात आहे.

अमेरिकेतील तज्ज्ञांनी काय सांगितलं?
अमेरिकेतील विमान सुरक्षा तज्ज्ञ जॉन कॉक्स यांनी सांगितलं की, हे बटण चुकून दाबलं जाण्याची शक्यता अत्यंत कमी असते. कारण- कितीही चुकून धक्का लागला तरी ते सहसा चालू किंवा बंद होत नाहीत. दरम्यान, रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेनं विमान अपघातातील तपासाशी संबंधित सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलंय की, आतापर्यंतच्या तपासात कोणत्याही तातडीच्या यांत्रिक बिघाडाचं चिन्ह आढळलेलं नाही. त्यामुळे बोईंग ७८७ विमानांचं संचालन करण्याच्या पद्धतीत कोणताही बदल करण्याच्या सूचना विमान कंपन्यांना देण्यात आलेल्या नाहीत.
हेही वाचा : पाकिस्तानचे लष्करप्रमुख मोठं बंड करणार? सत्तापालटाची आवई कशामुळे उठली?
६५० फूट उंचीवरून कोसळलं होतं विमान
एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच कोसळलं होतं. धावपट्टीवरून उड्डाण भरल्यानंतर विमानान जवळपास ६५० फूट उंची गाठली आणि त्यानंतर ते झपाट्यानं खाली येऊन एका इमारतीवर कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याशिवाय विमानाचा स्फोट झाल्यानं इमारतीत राहणाऱ्या काही नागरिकांनाही आपले प्राण गमवावे लागले. या भीषण दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, भारत सरकारच्या सरकारच्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो (AAIB) मार्फत या अपघाताचा तपास केला जात आहे.
मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी एक कोटीची मदत
विमानाचे अपघात हे बहुतेक वेळा अनेक कारणांमुळे होतात; पण अहमदाबाद येथील अपघात विमानाच्या इंजिनाची गती कमी झाल्यामुळे झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, शुक्रवारी एअर इंडियानं जाहीर केलंय की, या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे. अपघातानंतर लगेचच टाटा समूहानं मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत दिली होती. सध्या या अपघाताचा सखोल तपास सुरू असून, अंतिम निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात, असं सांगितलं जात आहे.