US soldiers South Korea Women Abuse : अमेरिकेचं सैन्य जगभरातील सर्वात शक्तिशाली आणि बलाढ्य सैन्यांपैकी एक मानलं जातं. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच त्यांच्या सैनिकांचं तोंडभरून कौतुक करीत असतात. मात्र, आता याच सैनिकांवर दक्षिण कोरियातील महिलांनी गंभीर आरोप केले आहेत. अमेरिकेतील अनेक सैनिकांनी आमच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच आम्हाला जबरदस्तीनं वेश्याव्यवसायात ढकललं असा आरोप कोरियन महिलांनी केला आहे. त्यासंदर्भात या महिलांनी न्यायालयात धाव घेत खटलाही दाखल केला आहे. मंगळवारी पीडित महिलांच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना या खटल्यासंदर्भातील माहिती दिली आहे. दरम्यान, हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? त्यासंदर्भात घेतलेला हा आढावा…
इतिहासकार व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, १०५० ते १९८० या काळात उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन देशांमध्ये युद्ध भडकलेलं होतं. त्यावेळी दक्षिण कोरियाची मदत करण्यासाठी अमेरिकेनं त्यांच्या देशात आपल्या सैनिकांची तैनाती केली. मात्र, या सैनिकांनी संरक्षणाच्या नावाखाली तेथील महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप होत आहे. २०२२ मध्ये दक्षिण कोरियातील सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी घेताना महिलांच्या बाजूने निकाल दिला होता. अमेरिकेतील सैनिकांसाठी सरकारने बेकायदा वेश्यागृहे चालविली असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली होती. त्यावेळी १२० तक्रारदार महिलांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले होते.
पीडित महिलांचा लढा निर्णायक टप्प्यावर
दक्षिण कोरियातील महिलांचा अमेरिकेन सैनिकांविरुद्धचा लढा आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे. गेल्या आठवड्यात तब्बल ११७ पीडित महिलांनी अमेरिकन सैन्यावर थेट आरोप ठेवत नवीन खटला दाखल केला आहे. यामध्ये त्यांनी अमेरिकेकडून औपचारिक माफीची मागणीही केली आहे. कोरियन महिलांच्या या आरोपांमुळे जगभरातील अनेक देश अमेरिकन सैनिकांकडे आरोपीच्या तसेच संशयाच्या नजरेनं पाहत आहेत.
आणखी वाचा : पाकिस्तानी वंशाच्या महिलेकडे ब्रिटनचं गृहमंत्रिपद; शबाना महमूद भारतविरोधी आहेत का?
पीडिता म्हणाली- नोकरीच्या नावाखाली माझी फसवणूक झाली
एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना कोरियातील ६० वर्षीय पीडित महिला म्हणाली, “मी अजूनही अमेरिकन सैनिकांनी केलेल्या मारहाणीला विसरू शकत नाही. ते आमच्यावर अमानुषपणे अत्याचार करीत होते. काही सैनिकांनी मला ग्लासमध्ये मद्य भरायला सांगितले, त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर हास्य नसल्याने त्यांनी मला विनाकारण मारहाण केली होती. मी १७ वर्षांची असताना नोकरीच्या नावाखाली माझी फसवणूक करण्यात आली होती. दक्षिण कोरियात असलेल्या अमेरिकन सैनिकांच्या छावण्यांमधील दुकानांमध्ये मला काम देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर तेथील सैनिकांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले.”
पीडिता म्हणाली- दररोज रात्री आमच्यावर लैंगिक अत्याचार केले जायचे.
पीडित महिला पुढे म्हणाली, “मी अनेकदा छावणीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र अमेरिकन सैनिकांनी मला पकडले आणि बेदम मारहाण केली. पुन्हा जर छावणी सोडण्याचा प्रयत्न केला तर तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना ठार मारले जाईल, अशी धमकीही त्यांनी मला दिली होती. माझ्याबरोबर इतर तरुण मुली तसेच महिलाही होत्या. अमेरिकन सैनिक दररोज रात्री आमच्यावर लैंगिक अत्याचार करायचे. दर आठवड्याला लैंगिक रोगांसाठी तपासणी करण्याची सक्ती केली जायची. जर काही लक्षणे आढळली तर आम्हाला एका लहान खोलीत बंद करून इंजेक्शन दिले जायचे. हे इंजेक्शन इतके वेदनादायक होते की- माझे पाय सुन्न झाले आणि मी चालूही शकत नव्हते.”

महिला हक्क संघटनांनी केली नुकसानभरपाईची मागणी
दक्षिण कोरियातील महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या महिला हक्क संघटनांनी मंगळवारी एक निवेदन जारी केलं. अमेरिकन सैन्याने दक्षिण कोरियाच्या राज्यघटनेची पायमल्ली केल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला. इतकंच नाही तर या कोरियन महिलांचे वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतले आणि त्यांची आयुष्ये उद्ध्वस्त केली असंही या निवेदनात नमूद करण्यात आलं. या नव्या खटल्यात प्रत्येक महिलेला १० दशलक्ष वॉन (सुमारे ७,२०० डॉलर्स) इतकी नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये अमेरिकन सैन्याला थेट जबाबदार धरण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
हेही वाचा : तालिबानी नेत्यांना भारतात येण्यास मनाई, संयुक्त राष्ट्रांनी परवानगी नाकारली; नेमकं कारण काय?
पीडित महिलांच्या वकिलांनी काय सांगितलं?
पीडित महिलांचे वकील हा जू-ही यांनी एएफपीला सांगितले की, कोरियन महिलांवर झालेल्या या अमानुष अत्याचाराबद्दल न्यायालयानं केंद्र सरकारसह अमेरिकन सैनिकांनाही जबाबदार धरायला पाहिजे. अमेरिकन सैनिकांच्या अत्याचारामुळे शेकडो कोरियन महिला गरोदर झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सध्या अमेरिकेचे सुमारे २८ हजार ५०० सैनिक दक्षिण कोरियात तैनात आहेत. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांच्या धोक्यापासून दक्षिण कोरियाचे संरक्षण करण्यासाठी या सैनिकांची तैनाती करण्यात आलेली आहे. कोरियन महिलांच्या आरोपांनंतर एएफपी या वृत्तवाहिनीने अमेरिकन सैनिकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पीडित महिलांची न्यायाची मागणी
अमेरिकन सैनिकांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या एका ६३ वर्षीय पीडितेनं ‘एएफपी’ला सांगितलं की- तिच्यावर अनेक अमेरिकन सैनिकांनी लैंगिक अत्याचार केले. एका सैनिकाने तर अत्याचारावेळी गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न केला होता. “आमच्या सरकारने आम्हाला जबरदस्तीनं अमेरिकन सैनिकांच्या छावण्यांमध्ये पाठवलं. तिथे आमच्यावर दिवसातून अनेकदा लैंगिक अत्याचार केले जात होते. आम्हाला हे कशामुळे सहन करावे लागले? याचे उत्तर मला हवे आहे. अमेरिकन सैनिकांनी आमची बिनशर्थ माफी मागावी त्यासाठी आम्ही हा खटला दाखल करीत आहोत, असंही त्या पीडितेनं सांगितलं.