– अनिश पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दैनंदिन आर्थिक व्यवहारांपासून ऑनलाइन शिक्षण, नोकरी शोध आदींकरिता स्मार्टफोन, इंटरनेट, संगणकाचा वापर वाढू लागल्याचा गैरफायदा सायबर गुन्हेगार सातत्याने घेऊ लागले आहेत. नोकरीचा शोध घेणाऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार त्यामुळेच वाढू लागले आहेत. अर्धकालीन नोकरीचे आमिष दाखवून ऑनलाइन कामे सांगून गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. त्याद्वारे सामान्य नागरिकांची जन्मभराची कमाई आरोपी लुटत आहेत. या प्रकरणांमध्ये गेल्या चार महिन्यांमध्ये साडेपाच कोटी रुपयांच्या मालमत्तेची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. सायबर फसवणुकीच्या या प्रकाराबाबत जाणून घेऊ या

‘टास्क’ फसवणूक कशी केली जाते?

सुरुवातीला व्हॉट्सॲपद्वारे अर्धवेळ नोकरीबाबतचा संदेश पाठवला जातो. त्या संदेशातील लिंक क्लिक केल्यानंतर सुरुवातीला काही चित्रफिती लाइक करायला सांगितले जाते. ते केल्यानंतर ५०-१०० रुपये खात्यात जमा केले जातात. अशा प्रकारे विश्वास संपादन करून मोठ्या गुंतवणुकीचे आमिष दाखवले जाते. त्याला बळी पडल्यानंतर कूट चलनात (क्रीप्टोकरन्सी) गुंतवणूक करण्यास सांगितले जाते. त्याबद्दल थोडा मोबदलाही दिला जातो. असे करून हळूहळू लाखो रुपये काढले जातात. ती रक्कम पुढे काढता येत नाही. रक्कम काढण्यासाठी दरवेळी अधिकाधिक रक्कम जमा करण्यास सांगितले जाते. अशा पद्धतीने पाच लाखांपासून अगदी ५० लाखांपर्यंत रक्कम जमा करण्यास भाग पाडून फसवणूक करण्यात आली आहे.

टास्क फसवणुकीचे कोणते प्रकार घडले?

मुंबईच्या सायबर पोलिसांनी या प्रकाराविरोधात मोहीम सुरू केली असून त्याअंतर्गत तीन गुन्ह्यांमध्ये सहभागी १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पूर्व विभागाच्या सायबर पोलिसांनी नुकतीच २७ लाख रुपयांच्या सायबर फसवणुकीप्रकरणी तिघांना मीरा रोड परिसरातून तिघांना अटक केली. स्नेह महावीर शक्तावत ऊर्फ आदित्य जैन (२४), महावीर सिंह (२२) व देव गुर्जर (२७) या तिघांना अटक केली. तिघेही मूळचे राजस्थान येथील रहिवासी आहेत. या प्रकरणातील तक्रारदार हे चेंबूर येथील रहिवासी असून १८ मार्चला त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून संदेश आला होता. त्यात विविध टास्क पूर्ण करून चांगला मोबदला कमावण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्याला फसून तक्रारदारांनी आरोपींनी पाठवलेल्या लिंकवरून टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी झाले. आरोपींनी त्यांना बोलण्यात अडकवून तक्रारदार यांना २७ लाख २० हजार रुपये विविध खात्यात जमा करण्यास भाग पाडले.

या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ४४ धनादेश पुस्तिका, २२ डेबिट कार्ड, १३ मोबाइल, ४४ सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांनी केलेल्या दुसऱ्या कारवाईत टास्कच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या मिलिंद शेट्ये (५५), गोरबहादूर सिंग (५२), संतोष शेट्ये (४८), लक्ष्मण सिमा (३७), शगुफ्ता खान व तुषार अजवानी यांना अटक केली. आरोपींनी कुलाबा येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेची २५ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपींनी सुरुवातीला महिलेला यूट्यूब चित्रफितींना लाइक करण्यासाठी ५० ते १०० रुपये देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर टाक्सच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास सांगून २५ लाख रुपयांची फसवणूक केली होती.

पूर्व प्रादेशिक सायबर पोलिसांनी केलेल्या तिसऱ्या कारवाईत सुमारे ११ लाख रुपयांच्या टाक्स फसवणुकीच्या प्रकरणात जोगेश्वरी पूर्व येथे राहणाऱ्या कल्पेश मेढेकर, मनोज नेरूरकर व सुभाष नागम (३५) यांना अटक केली. घाटकोपर येथे राहणाऱ्या तक्रारदाराला टास्क फसवणुकीच्या माध्यमातून १० लाख ८७ हजार रुपये विविध खात्यांत जमा करण्यास भाग पाडले. आरोपींकडून संगणक व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

आकडेवारी काय सांगते?

टास्क फसवणुकीची एकूण १७० प्रकरणे गेल्या चार महिन्यांत घडली आहेत. एप्रिल महिन्यापर्यंत मुंबईत घडलेल्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणाशी तुलना केल्यास एप्रिल २० मध्ये मुंबईत १६७० गुन्हे घडले आहेत. त्यातील १० टक्के प्रकरणे टाक्स फसवणुकीबाबतची आहेत. आकडेवारीनुसार टाक्स फसवणुकीच्या ५१ प्रकरणांमध्ये साडेपाच कोटी रुपयांच्या मालमत्तेची फसवणूक झाली आहे. टास्क फ्रॉड प्रकरणांपैकी ५१ तक्रारी सायबर पोलिसांकडे नोंदवण्यात आल्या आहेत. अलीकडेच त्यातील तीन प्रकरणांमध्ये सायबर पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली होती. त्यांनी ६२ लाख रुपयांची फसवणूक केली होती. मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये टास्क फसवणुकीचे २० गुन्हे दाखल झाले आहेत.

हेही वाचा : डोंबिवलीत वाढीव परतव्याचे आमीष दाखवून नोकरदाराची चार कोटीची फसवणूक

फसवणूक कशी टाळता येईल?

ऑनलाइन पार्ट टाइम जॉबच्या आमिषाला बळी पडून नये. अनोळखी मोबाइल क्रमांकावरून येणाऱ्या व्हॉट्सॲप संदेश किंवा एसएमएसमधील प्रलोभनाला प्रतिसाद देऊ नये. तसेच एखादी चित्रफीत पाहणे व त्याबदल्यात पैसे कमविणे हा सापळा आहे. त्यापासून दूर राहणेच योग्य आहे. कृपया अशा प्रकारे गुंतवणूक सुरू केली असल्यास ती तत्काळ थांबवून त्याबाबतची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात तातडीने द्यावी.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Analysis of online fraud on the name of job offer know how it happened print exp pbs
First published on: 07-06-2023 at 15:19 IST