2,400-Year-Old Clay Figurines Unearthed in El Salvador: पुरातत्त्वज्ञांनी एल साल्वाडोरमधील एका प्राचीन पिरॅमिडच्या शिखरावर २४०० वर्षे जुने बाहुल्यांसारखे दिसणारे मातीचे पुतळे शोधून काढले आहेत. चार स्त्रिया आणि एक पुरुष असे हे एकूण पाच पुतळे आहेत. सुरुवातीला त्यांचा संबंध एखाद्या दफनसोहळ्याशी असल्याचे मानले जात होते. परंतु ते कोणत्याही मानवी अवशेषांसह न आढळल्याने ही शक्यता नाकारण्यात आली आहे. संशोधकांना एल साल्वाडोरमधील सान इसिद्रो येथील सर्वात मोठ्या पिरॅमिडच्या शिखरावर हे पाच मातीचे पुतळे सापडले. ‘अँटिक्विटी’ या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसारमध्ये या शोधाबद्दल माहिती देण्यात आली आहे. या शोधामुळे हे क्षेत्र मेसोअमेरिकन संस्कृतीशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तज्ज्ञांच्या मते, हे पुतळे पिरॅमिडच्या शिखरावर ठेवलेले असल्याने त्यांचा वापर सार्वजनिक विधींमध्ये करण्यात आलेला असावा आणि ते दफनासाठीचे नसावेत. युनिव्हर्सिटी ऑफ वॉर्सॉचे पुरातत्त्व अभ्यासक आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक जान शिमान्स्की यांनी Live Science ला सांगितले की, या पुतळ्यांचे चेहरे वेगवेगळ्या कोनांतून पाहिल्यास बदलत असल्याचे दिसते. डोळ्याच्या समोरून पाहिल्यास ते घाबरलेले वाटतात, वरून पाहिल्यास हसत असल्यासारखे दिसतात आणि खालून पाहिल्यास भयभीत वाटतात. या विशिष्ट शैलीचा उपयोग धार्मिक विधी आणि समारंभांमध्ये करण्यात आला असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. यापैकी लहान पुतळ्यांच्या कपाळावर केसांचे झुपके आणि कानात दागिने आहेत, तर मोठ्या पुतळ्यांमध्ये हे वैशिष्ट्य नाही आणि ते साधे आहेत. पाच पुतळ्यांपैकी तीन अंदाजे एक फूट उंच आहेत, तर उर्वरित दोन त्याच्या निम्म्या आकाराचे आहेत.

उंच पुतळ्यांची डोकी बाहुलीसारखी ३६० अंशात फिरणारी असून त्यांची तोंडे उघडी आहेत त्यामुळे ते बाहुल्यांसारखे दिसतात आणि त्यांचा वापर कदाचित गोष्टी सांगण्यासाठी किंवा एखाद्या घटनांचे पुनरावलोकन करण्यासाठी केला जात असावा. परंतु, त्यांचा संबंध हा मृतांशी संबंधित असावा का, असा प्रश्न संशोधकांना पडलेला होता. मात्र तसे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. या पाच सापडलेल्या अखंड पुतळ्यांशिवाय पुरातत्त्वज्ञांना त्या स्थळी इतर काही शिल्पांचे तुकडेही आढळले आहेत. अशा प्रकारचे पुतळे फक्त दुसऱ्यांदा मूळ स्थितीत सापडले आहेत आणि पहिल्यांदाच यामध्ये पुरुष पुतळ्याचा समावेश आहे. यासारखाच आणखी एक शोध २०१२ मध्ये पश्चिम ग्वाटेमालातील एका स्मशानभूमीत लागला होता. या स्मशानभूमीत इसवी सनपूर्व ३५०-१०० या कालखंडातील भग्न अवस्थेतील सहा स्त्री पुतळ्यांचे अवशेष आढळले होते. या पुतळ्यांचा शोध प्राचीन मेसोअमेरिकन संस्कृतीबद्दल नवीन माहिती देतो आणि त्या काळातील लोकांच्या धार्मिक, सामाजिक आणि कलात्मक परंपरांची झलक देतो.

मेसोअमेरिकन संस्कृती

मेसोअमेरिकन संस्कृती ही प्राचीन मध्य अमेरिकेतील (आजच्या मेक्सिको, ग्वाटेमाला, बेलिझ, एल साल्वाडोर, आणि होंडुरास या भागांमध्ये) इ.स.पू. १२००० ते इ.स. १५२१ या कालखंडात विकसित झालेली प्रगत संस्कृती आहे. या प्रदेशातील ओल्मेक, माया, ॲझटेक आणि झॅपोटेक यांसारख्या महान संस्कृतींनी या भागात समृद्ध धार्मिक, वास्तुशास्त्रीय आणि सामाजिक परंपरा निर्माण केल्या. मेसोअमेरिकन संस्कृती ही प्राचीन जगातील सर्वात विकसित संस्कृतींपैकी एक होती. त्यांच्या धार्मिक, वैज्ञानिक, आणि वास्तुकला परंपरा आजही अभ्यासल्या जातात. त्यांचे पिरॅमिड्स, मंदिरांचे अवशेष आणि लिपी आजही जगभरातील संशोधकांना आकर्षित करतात.

मेसोअमेरिकन संस्कृतीची वैशिष्ट्ये

मेसोअमेरिकन संस्कृतीमध्ये ओल्मेक, माया, ॲझटेक या संस्कृतींचा समावेश होतो. ओल्मेक (Olmec) (इ.स.पू. १५०० – ४००) ही पहिली ज्ञात मेसोअमेरिकन संस्कृती आहे. त्यांनी मोठे दगडी मुखवटे आणि कोरीवशिल्पं घडवली. माया (Maya) (इ.स.पू. २००० – इ.स. १५००) संस्कृती कला, गणित, खगोलशास्त्र आणि लिहिण्याच्या पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे. ॲझटेक (Aztec) (इ.स. १३४५ – १५२१) हे भव्य टेनोच्टिटलान शहर, बलाढ्य योद्धे आणि बलिदान विधींसाठी प्रसिद्ध होते. या संस्कृतीतील लोक अनेकेश्वरवादी होते. ते विशेषतः सूर्यदेव, पर्जन्यदेव आणि चंद्रदेव यांना मानत. मानवी बळी देणे हे ॲझटेक आणि माया संस्कृतीत धार्मिक विधींचा भाग होते. माया संस्कृतीत चित्रलिपी (hieroglyphs) लेखनाची परंपरा होती. या संस्कृतींमध्ये पोक-ता-पोक नावाचा एक विशेष बॉल गेम खेळला जात असे. हा खेळ धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा होता. या प्राचीन समाजाच्या रचनेत योद्धे, पुजारी, व्यापारी आणि शेतकरी यांचे स्वतंत्र स्तर होते, असे अभ्यासकांना लक्षात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेसोअमेरिकन संस्कृतीचे पतन

स्पॅनिश आक्रमणात (इ.स. १५१९ – १५२१) हर्नान कोर्टेसच्या नेतृत्वाखालील स्पॅनिश सैन्याने ॲझटेक साम्राज्याचा नाश केला. याशिवाय नवीन येणाऱ्या रोगराईमुळे (देवी, गोवर) मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या नष्ट झाली. रोगराईमुळे माया संस्कृती हळूहळू लयास गेली, तर ॲझटेक आणि इंका साम्राज्ये स्पॅनिश साम्राज्याचा भाग झाली. त्यामुळेच नवीन शोधामुळे प्राचीन मेसोअमेरिकन संस्कृतीबद्दल नवी माहिती मिळण्यास मदत झाली आहे. हे पुतळे केवळ धार्मिक विधींसाठी वापरण्यात आले होते की, त्यांचा काही वेगळा उपयोग होता याचा अजूनही सखोल अभ्यास आवश्यक आहे. या शोधामुळे त्या काळातील समाजव्यवस्था, धार्मिक परंपरा आणि कलात्मक कौशल्याचा मागोवा घेता येईल. मेसोअमेरिकन संस्कृती ही जगातील सर्वात समृद्ध आणि गूढ संस्कृतींपैकी एक मानली जाते. त्यांच्या पिरॅमिड्सपासून गणित आणि खगोलशास्त्रातील प्रगत ज्ञानापर्यंत ही संस्कृती आजही संशोधक आणि इतिहासप्रेमींसाठी एक रहस्यमय प्रेरणास्थान आहे. या नव्या उत्खननाच्या आधारावर भविष्यात आणखी महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे.