scorecardresearch

विश्लेषण: ‘आशियातला मॅराडोना’ अशी ओळख असलेला अली करिमी इराणी सरकारसाठी डोकेदुखी का ठरतोय?

‘आशियातील मॅराडोना’ अशी ओळख असलेला इराणचा फुटबॉलपटू अली करिमी मागील काही दिवसांपासून इराणी सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे.

विश्लेषण: ‘आशियातला मॅराडोना’ अशी ओळख असलेला अली करिमी इराणी सरकारसाठी डोकेदुखी का ठरतोय?
इराणचा माजी फुटबॉलपटू अली करिमी (संग्रहित फोटो)

‘आशियातील मॅराडोना’ अशी ओळख असलेला इराणचा फुटबॉलपटू अली करिमी मागील काही दिवसांपासून इराणी सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे. इराणच्या संघातून खेळताना तो आक्रमक मिडफिल्डरची भूमिका पार पाडायचा. त्याने आपल्या संघासाठी अनेक महत्त्वपूर्ण खेळी केल्या आहेत. पण हा खेळाडू आता इराणी सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे. करिमीला अटक करण्यासाठी इराणी तपास यंत्रणाही मागावर आहेत. त्यामुळे करिमी गेल्या महिन्यापासून दुबईत निर्वासित म्हणून राहत आहे.

अलीकडेच अली करिमी हा संयुक्त अरब अमिराती येथील फुजैराह शहरात एका प्रसिद्ध व्यक्तीला भेटणार होता. पण शेवटच्या क्षणी करिमीच्या मोबाइलवर एक संदेश आला आणि त्याने संबंधित भेट टाळली. कारण ही भेट इराणी गुप्तचर यंत्रणांचा सापळा होती. करिमीला फुजैराह येथील बंदरातून बोटीने इराणला नेण्याची योजना गुप्तचर यंत्रणांनी आखली होती. पण ऐनवेळी करिमीच्या मोबाइलवर एक सतर्कतेचा संदेश आल्याने त्याने ही भेट टाळली. हा घटनाक्रम एखाद्या ‘थ्रिलर’ चित्रपटाप्रमाणे आहे. करिमीने आपली कारकीर्द धोक्यात घालून अनेकदा सरकारशी पंगा घेतला आहे. त्यामुळे तो इराणी सरकारसाठी डोखेदुखी ठरत आहे. या लेखातून आपण करिमी आणि इराण सरकारमधील संघर्षाचा आढावा घेणार आहोत.

नेमकं प्रकरण काय आहे?

४४ वर्षीय अली करिमी मागील अनेक वर्षांपासून इराण सरकारवर सातत्याने टीका करत आहे. अलीकडेच त्याने इराण सरकारविरोधात सुरू असलेल्या हिजाबविरोधी आंदोलनाला समर्थन दिलं. त्यामुळे ते पुन्हा एकदा सरकारच्या रडारवर आला आहे. सरकारने करिमीविरुद्ध अटक वॉरंटही जारी केला आहे.

फुजैराह शहरात इराणच्या गुप्तचर यंत्रणांनी रचलेला कट अयशस्वी ठरल्यानंतर करिमीने त्याला मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचे आभार मानले आहेत. त्याला मेसेज पाठवणारी व्यक्ती गुप्तचर यंत्रणेतील अधिकारीच असावी, असा संशय आहे. आपल्या भावना व्यक्त करताना करिमी म्हणाला, “माझी काळजी करणाऱ्या देशवासियांचा मी नम्र आभारी आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला विविध प्रकारे धमकावण्यात आले आहे. पण मी महत्त्वाचा नाही. मला अजूनही इराणमधील माझ्या देशवासियांबद्दल दु:ख वाटतं. माझ्या सर्व वेदना आणि दु:ख माझ्या देशातील लोकांसोबत आहेत.”

हेही वाचा- विश्लेषण: मेसी, रोनाल्डोसाठी सध्याचा विश्वचषक का महत्त्वाचा? हे दोघे फायनलमध्ये भिडतील का?

करिमीचा मित्र मेहदी रोस्तमपोर यानं सांगितलं की, करिमीला फुजैराह येथे जाण्यापासून सतर्क करणारी व्यक्ती नेमकी कोण आहे? हे अद्याप स्पष्ट नाही. पण ‘फुजैराह एक सापळा आहे’ (Fujairah is a trap) असा संदेश करिमीला मिळाला होता. ही व्यक्ती गुप्तचर विभागातील कोणीतरी असावी, असं रोस्तमपोरने सांगितलं. करिमीच्या अपहरणाचा कट अयशस्वी झाल्याची पहिली बातमी लंडनमधील ‘द टाइम्स’ने केली होती.

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनाची ठिणगी कशी पडली?

इराणमधील २२ वर्षीय तरुणी अमिनी हिजाब परिधान करून रस्त्याने पायी जात होती. पण तिने इराणच्या इस्लामिक नियमांनुसार, हिजाब परिधान केला नव्हता, या आरोपावरून इराणच्या इस्लामिक पोलिसांनी अमिनीला अटक केली. यानंतर तिला तीन दिवस तुरुंगात डांबून तिच्यावर अत्याचार केले. दरम्यान, तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केलं, पण तेथे अमिनीचा मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर या घटनेचे जगभर पडसाद उमटले आणि इराणी सरकारविरोधात हिजाबविरोधी आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनाची धग इराणमधील १४० हून अधिक शहरांमध्ये पसरली. या आंदोलनात ४३ मुले आणि २५ महिलांसह ३०० हून अधिक निदर्शकांना सुरक्षा दलाने ठार केलं आहे, अशी माहिती इराणमधील मानवाधिकार विभागाने दिली.

इराणच्या फुटबॉल संघातील खेळाडूंचं हिजाबविरोधी आंदोलनाला समर्थन

करिमी हा इराणचा महान फुटबॉलपटू मानला जातो. त्याने आपल्या देशासाठी १२७ सामने खेळले असून ३७ गोल केले आहेत. सध्या करिमीच्या पाठिशी गुप्तचर यंत्रणांचा ससेमीरा आहे. त्यामुळे त्याने कतारला जाण्याचा धोका पत्करला नाही. पण कतार येथे सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकादरम्यान, इराणी फुटबॉल संघातील ११ खेळाडूंनी आपली कारकीर्द पणाला लावली आहे. सर्व खेळाडूंनी एकत्र येत हिजाबविरोधी आंदोलनाला प्रतिकात्मक पाठिंबा दिला. यासाठी त्यांनी २१ नोव्हेंबर मैदानात उतरल्यानंतर आपल्या देशाचं राष्ट्रगीत गाण्यास विरोध केला. राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर संबंधित सर्व खेळाडू भावनाशून्य चेहऱ्याने मैदानात शांत उभे होते. या सामन्यात इराणला इंग्लंडकडून ६-२ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला.

अली करिमीचा वाद आणि बंदी

अली करिमीने सर्वप्रथम २००८ मध्ये प्रशासनाविरोधात आवाज उठवला होता. राष्ट्रीय संघातील खेळाडूंच्या गैरव्यवस्थापनाबद्दल त्याने अधिकार्‍यांना लक्ष्य केलं होतं. करिमीच्या या कृत्यामुळे त्याला फुटबॉल संघातून वगळण्यात आलं आणि त्याला संघात घेण्यास बंदी घातली. परंतु इराणचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनजाद आणि इराणचा क्रांतिकारी नेता अयातुल्ला रुहोल्लाह यांचे नातू हसन खोमेनी यांच्या आदेशानुसार करिमीला पुन्हा संघात घेण्यात आलं.

हेही वाचा- विश्लेषण: सौदीकडून मेसीच्या अर्जेंटिनाला धक्का! विश्वचषकात धक्कादायक निकाल वाढू लागले आहेत का?

संघात पुनरागमन झाल्यानंतर एका वर्षाने करिमी पुन्हा एखादा बंडखोरीच्या पवित्र्यात उतरला. याला कारण होतं इराणमधील तत्कालीन विरोधी पक्षनेते मीर-हुसेन मौसावी. मौसावी यांनी राजकीय प्रचारादरम्यान निवडणूक निकालावर आक्षेप घेतला होता. यामुळे मीर हुसेन मौसावी यांच्या शेकडो समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या घटनेच्या निषेधार्थ करिमीने आणि इतर काही खेळाडूंनी सियोल येथे पार पडलेल्या विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील सामन्यात आपल्या मनगटावर हिरवी पट्टी बांधली. यामुळे इराणी सरकारने करिमीसह आणि मनगटावर हिरवी पट्टी बांधणाऱ्या खेळाडूंवर बंदी घातली. यानंतर करीमीसह, हिरवी पट्टी बांधणारे खेळाडू होसेन काआबी, वहिद हाशेमियन आणि मेहदी महदाविकिया यांनी निवृत्ती घेतली.

हेही वाचा- विश्लेषण: FIFA फुटबॉल वर्ल्डकप जिंकूनही विजेत्या संघाला ‘खरी’ ट्रॉफी मिळतच नाही! वाचा काय आहे या ट्रॉफीचा इतिहास?

निवृत्त झाल्यानंतरही करिमीने इराणी सरकारचा पिच्छा सोडला नाही. आजही करिमी इराणी सरकारविरोधात स्पष्ट भूमिका घेत आहे, त्याचा स्पष्टवक्तेपणा सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे. करिमीला इन्स्टाग्रामवर १ कोटी ४० लाख फॉलोअर्स आहेत. जिथे तो नियमितपणे पोस्ट करतो. त्यामुळे त्याचा आवाज दाबणे सोपं नाही. सध्या इराणच्या राष्ट्रीय फुटबॉल संघात खेळणाऱ्या सर्व अकरा खेळाडूंनी राष्ट्रगीत गाण्यास विरोध करून करिमी आणि इतर स्पष्टवक्ते फुटबॉलपटूंचा वारसा पुढे नेला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या