बोत्सवानाच्या राष्ट्राध्यक्षांनी जर्मनीला २० हजार हत्ती पाठवण्याची धमकी दिली आहे. जर्मनीच्या पर्यावरण मंत्रालयाच्या सूचनेनंतर दक्षिण आफ्रिकी देश बोत्सवानाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. शिकार केल्यानंतर प्राण्यांचे अवयव आयात करण्याबाबत देशात कडक कायदे असायला हवेत, असंही वर्षाच्या सुरुवातीला जर्मनीने सांगितले होते. त्यावर बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मासी यांनी असे केल्यास बोत्सवानातील लोक आणखी गरीब होणार असल्याचं सांगितलं. जर्मनीसह मोठ्या संख्येने पर्यटक हत्तीची शिकार करण्यासाठी बोत्सवानाला जातात. लोक मनोरंजनासाठी प्राण्यांची शिकार करतात आणि नंतर त्या प्राण्यांच्या शरीराचे अवयव जसे की, डोके, त्वचा किंवा शरीराचा कोणताही भाग वेगळा करून ठेवतात. हत्तीच्या शिकारीनं बोत्सवानाला काय फायदा होतो आणि २० हजार हत्ती जर्मनीला पाठवून बोत्सवानाला काय मेसेज द्यायचा आहे ते समजून घेऊ यात.

बोत्सवानासाठी हत्तीची शिकार महत्त्वाची का आहे?

जगातील हत्तींच्या लोकसंख्येपैकी सुमारे एक तृतीयांश हत्ती बोत्सवानामध्ये आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बोत्सवानामध्ये १,३०,००० हून अधिक हत्ती राहतात. बोत्सवानात हत्ती ठेवायला जागा कमी पडते. प्राण्यांच्या संरक्षणासाठी राबवलेल्या धोरणांमुळे देशात हत्तींच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. मात्र, यामुळे रहिवाशांना त्रास होत आहे. हत्तींचे कळप मालमत्ता आणि शेतीचे नुकसान करीत आहेत आणि पिके खात आहेत. रहिवाशांनाही पायदळी तुडवले जात आहे, असंही राष्ट्राध्यक्ष मोक्ग्वेत्सी मासी यांनी सांगितले. बोत्सवानामध्ये असे काही भाग आहेत, जिथे लोकांपेक्षा हत्तीच जास्त राहतात. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांची हत्तीमार्फत नासधूस होत आहे. हत्तींच्या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोत्सवानाला शिकारीची मोठी मदत होत आहे. शिवाय यातून सरकारी तिजोरीही भरते. खरं तर पश्चिमेकडील श्रीमंत लोक बोत्सवाना आणि इतर दक्षिण आफ्रिकन देशांमध्ये शिकारीसाठी येतात. प्राण्यांची शिकार करण्याच्या परवानगीसाठी पर्यटक हजारो डॉलर्स सरकारला देतात आणि नंतर हत्तीचं कातडं, दात आणि इतर वस्तू घरी घेऊन जातात. हा पैसा संवर्धनासाठी आणि स्थानिक लोकांच्या मदतीसाठी वापरला जात असल्याचा दावा बोत्सवाना सरकारने केला आहे. दुसरीकडे प्राणी प्रेमींकडून की प्रथा क्रूर असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यावर बंदी घालण्याचीही मागणी केली जात आहे.

हेही वाचाः विश्लेषण : ईव्हीएममध्ये नोंदलेल्या प्रत्येक मताची पडताळणी शक्य आहे का? ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅट वाद वारंवार का उद्भवतो?

बोत्सवाना जर्मनीला हत्ती पाठवण्याची धमकी का देत आहे?

बोत्सवानाने २०१४ शिकारीवर बंदी घातली होती, परंतु स्थानिक लोकांच्या दबावानंतर २०१९ मध्ये बंदी उठवण्यात आली. ह्युमन सोसायटी इंटरनॅशनलच्या २०२१ च्या रिपोर्टनुसार, जर्मनी हा युरोपियन संघामध्ये आफ्रिकन हत्ती शिकारीतून मिळणाऱ्या अवयवांचा सर्वात मोठा आयातदार आहे.’जर्मनीतील लोक आम्हाला प्राण्यांबरोबर एकत्र राहण्याचा प्रयत्न करा, असा सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा काही विनोद नाही.’ याआधीही बोत्सवानाने इतर देशांमध्ये हत्ती पाठवले आहेत. बोत्सवानाने आपल्या शेजारी अंगोलाला ८ हजार हत्ती दिले आहेत. तसेच मोझांबिकलाही आणखी ५०० हत्ती दिले आहेत. त्यावेळी हत्तींची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले होते. आम्हाला जर्मनीलाही अशीच भेट द्यायची आहे. तसेच जर्मनीकडून या भेटीसाठी आम्ही नकार ऐकणार नसल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितले. बोत्सवानाचे वन्यजीव मंत्री दुमझ्वेनी मिथिमखुलु यांनीसुद्धा गेल्या महिन्यात लंडनमध्ये १०,००० हत्ती पाठवण्याची धमकी दिली होती, जेणेकरून ब्रिटिश लोकांना त्यांच्याबरोबर कसे राहतात हे समजेल. मार्चमध्ये यूकेच्या खासदारांनी शिकारी करून प्राण्यांचे अवयव आयात करण्यावर बंदी घालण्याच्या समर्थनासाठी मतदान केले होते.