केरळमध्ये एका पाच वर्षांच्या मुलीचा ‘मेंदू खाणाऱ्या अमीबा’मुळे मृत्यू झाला आहे. हा असा एक अमीबा आहे; जो पाण्याच्या माध्यमातून नाकावाटे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतो आणि मेंदूला इजा करण्यास सुरुवात करतो. ‘नेग्लेरिया फॉवलेरी’ (Naegleria fowleri) असे या अमीबाचे नाव आहे. या अमीबाचा संसर्ग झाल्यानंतर या मुलीवर केरळमधील कोझिकोड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी (२० मे) तिचा मृत्यू झाला. याआधीही या अमीबाने अनेकांचा जीव घेतला आहे. या अमीबाचा संसर्ग नक्की कसा होतो, तो कोणत्या ठिकाणी आढळतो आणि त्याचा संसर्ग झाल्यावर काय लक्षणे दिसतात, याविषयी माहिती घेऊ.

‘प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस’ म्हणजे काय?

मेंदू खाणारा अमीबा अर्थात नेग्लेरिया फॉवलेरी नावाच्या अमीबाच्या हल्ल्यामुळे प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस (Primary amebic meningoencephalitis – PAM) हा संसर्ग होतो. हा मेंदूच्या संसर्गाचा दुर्मीळ आजार आहे. नेग्लेरिया फॉवलेरी हा एकपेशीय सजीव असून, तो डोळ्यांना दिसत नाही. सूक्ष्मदर्शकाखाली त्याचे अस्तित्व दिसून येऊ शकते. हा अमीबा जगभरात कुठेही तलाव, नद्या, जलतरण तलाव, गरम पाण्याचे झरे यांसारख्या गोड्या पाण्यात, तसेच मातीमध्येही आढळतो. तो शरीरात फक्त नाकावाटे प्रवेश करून मेंदूपर्यंत जाऊ शकतो. ११५°F (४६°C)पर्यंतचे उच्च तापमान त्याच्या वाढीसाठी अनुकूल असते. तो उबदार वातावरणात अल्प काळ टिकू शकतो. खराब नद्यांमध्ये अथवा जलतरण तलावाची अवस्था आणि देखभाल खराब असेल, तर तिथे हा अमीबा आढळू शकतो.

Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
Suresh Koshta, father of Ashwini Koshta
Pune Porsche Accident:पोर्श धडकेत जागीच मृत्यू झालेल्या अश्विनीच्या वडिलांची सून्न करणारी प्रतिक्रिया, “आमची स्वप्नं..”
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Muslim Sultan of Kashmir, 'Vishnu's Avatar' history of Kashmir
‘या’ तुर्की सुलतानाला मानले जात होते ‘विष्णूचा अवतार’? काश्मीरचा इतिहास नक्की काय सांगतो?
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाची आई कॅमेरासमोर ढसाढसा रडली, म्हणाली; “प्लीज..”

हेही वाचा : ‘या’ तुर्की सुलतानाला मानले जात होते ‘विष्णूचा अवतार’? काश्मीरचा इतिहास नक्की काय सांगतो?

नेग्लेरिया फॉवलेरीचा संसर्ग नेमका कसा होतो?

नेग्लेरिया फॉवलेरी नाकावाटे शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे तलाव आणि नद्यांमध्ये पोहताना किंवा डुबकी मारताना जर त्याच्याशी संपर्क आला आणि तो नाकावाटे आपल्या शरीरात प्रवेश करू शकला, तरच त्याचा संसर्ग होतो. नाकावाटे प्रवेश करून तो मेंदूपर्यंत जातो आणि मेंदूच्या उतींना इजा करायला लागतो. त्यामुळे मेंदूतील उतींना सूज येऊ लागते. या संसर्गाला बळी पडलेल्या कोझिकोडमधील पाच वर्षांच्या मुलीला स्थानिक नदीमध्ये पोहताना हा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. १ मे रोजी तिने चार मुलांसह नदीत अंघोळ केली होती; परंतु इतरांमध्ये ही लक्षणे दिसून आलेली नाहीत. त्यांची या संसर्गाबाबतची चाचणी नकारात्मक आली. विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्यात हा अमीबा असला आणि त्याचे तोंडावाटे सेवन केले तरीही तो मेंदूपर्यंत पोहोचून, त्याचा प्राणघातक संसर्ग होऊ शकत नाही. फक्त नाकावाटे शरीरात प्रवेश केल्यावरच त्याचा संसर्ग होऊ शकतो. तसेच PAM हा असंसर्गजन्य आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने तो होत नाही.

मेंदू खाणाऱ्या अमीबाच्या संसर्गाची लक्षणे

हा संसर्ग झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात डोकेदुखी, ताप, मळमळ व उलट्या, अशी लक्षणे दिसून येतात. तसेच मान ताठ होणे, फिट येणे, गोंधळ उडणे, भास होणे यांचा समावेश असू शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये संक्रमित व्यक्ती कोमात जाऊ शकते आणि तिचा मृत्यू होऊ शकतो. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशनने (CDC) दिलेल्या माहितीनुसार, PAM चा संसर्ग झालेले बहुतांश रुग्ण लक्षणे सुरू झाल्यापासून एक ते अठरा दिवसांत मृत्युमुखी पडतात. सहसा पहिले पाच दिवस कोमा आणि नंतर मृत्यू होण्याची शक्यता सर्वाधिक असते.

मेंदू खाणाऱ्या अमीबावर उपाय काय?

शास्त्रज्ञांना या संसर्गावर प्रभावी उपचार शोधण्यामध्ये अद्याप तरी यश आलेले नाही. सध्या डॉक्टर ॲम्फोटेरिसिन बी, ॲझिथ्रोमायसिन, फ्लुकोनाझोल, रिफाम्पिन, मिल्टेफोसिन व डेक्सामेथासोन या औषधांचा वापर करून उपचाराचे प्रयत्न करतात. हा अमीबा आणि त्याच्यामुळे होणारा संसर्गही दुर्मीळ आहे. त्यामुळे योग्य निदान चाचण्यांच्या अभावामुळे या संसर्गाचे निदान करणे बरेचदा कठीण होऊ शकते.

हेही वाचा : सिंगापूर एअरलाइन्स विमानात एका प्रवाशाचा एअर टर्ब्युलन्समुळे मृत्यू… एअर टर्ब्युलन्स कशामुळे होतो? किती धोकादायक?

याआधी घडलेल्या घटना

भारतात आजवर हा संसर्ग झाल्याची २० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. कोझिकोडमधील पाच वर्षांच्या मुलीचे प्रकरण हे केरळमधील सातवे संक्रमण आहे. जुलै २०२३ मध्येही याच संक्रमणामुळे अलप्पुझा येथे एका १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. केरळमधील पहिली घटना २०१६ मध्ये अलप्पुझा येथेच नोंदवली गेली होती. कदाचित इथे मोठ्या प्रमाणात जलसाठे असल्याने या घटना वारंवार घडताना दिसतात. तेव्हापासून आजवर मलप्पुरम, कोझिकोड व त्रिशूरमध्ये या संसर्गाची नोंद झाली आहे.