Indian Students Canada Visa Decline : भारतातील अनेक विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी विदेशातील अभ्यासक्रमांना प्राधान्य देतात. कॅनडा, अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि सिंगापूर यांसारख्या देशांत मोठ्या प्रमाणावर भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, अलीकडील काही महिन्यांत कॅनडाकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पारपत्रांची (व्हिसा) संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे. २०२५ च्या पहिल्या तिमाहीत कॅनडाने केवळ ९६ हजार १५ परदेशी विद्यार्थ्यांना शैक्षणिक पारपत्र दिले आहे. विशेष बाब म्हणजे, २०२४ मधील याच कालावधीत कॅनडाकडून दिल्या जाणाऱ्या पारपत्राची एकूण संख्या एक लाख २१ हजार ७० इतकी होती. एका आकडेवारीतून या संदर्भातील माहिती समोर आली आहे. दरम्यान, कॅनडाने विद्यार्थ्यांना व्हिसा देण्याचे प्रमाण कमी का केले, त्या संदर्भातील घेतलेला हा आढावा…

कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक पारपत्राची संख्या कमी केली आहे. २०२४ च्या पहिल्या तिमाहीत ४४ हजार २९५ भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा मंजूर झाले होते. हा आकडा व्हिसा मंजूर झालेल्या एकूण अर्जांपैकी ३६.५ टक्के इतका होता, तर यावर्षी २०२५ मध्ये कॅनडाने केवळ ३० हजार ६४० भारतीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिसा दिला आहे. व्हिसासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जात असल्यामुळे कॅनडाकडून त्यांचे अर्ज नाकारले जात असल्याचं समोर आलं आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी याबाबत कुठलीही दक्षता न घेता थेट एआयच्या क्षमतेवर खापर फोडलं आहे.

‘एआय’कडून चुकीची माहिती दिली गेल्याने आमचा व्हिसा (पारपत्र) नाकारण्यात आला, असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा फटका आता विद्यार्थ्यांनाही बसल्याचं दिसून येत आहे. तज्ज्ञांचं असं मत आहे की, विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिसा नाकारण्याच्या प्रक्रियेमागे कृत्रिम बुद्धिमत्तेचा काही प्रमाणात प्रभाव असू शकतो; पण त्यामागचं कारण वेगळं असू शकतं. एआयच्या वापरापेक्षा अधिक धोरणात्मक आणि प्रशासकीय स्तरावरील बदलांमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक पारपत्र नाकारले गेले असावे, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

आणखी वाचा : समुद्राच्या पाण्यावर तरंगणारा जगातील एकमेव विमानतळ बुडतोय; कारण काय?

पारपत्र अर्जासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा अतिरेक

  • कॅनडाकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पारपत्रांत घट झाल्यामुळे तज्ज्ञांनी या विषयावर चिंता व्यक्त केली आहे.
  • अनेक विद्यार्थी व त्यांचे एजंट कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने पारपत्राचे अर्ज सादर करीत आहेत.
  • मात्र, या अर्जांची गुणवत्ता कमी असून आवश्यक असलेली कागदपत्रे नीट दिली जात नाहीयेत.
  • या कारणामुळेच विद्यार्थ्यांना पारपत्र मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
  • पारपत्रासाठी अत्यावश्यक असलेल्या स्टेटमेंट ऑफ पर्पज (SOP) हे दस्तऐवज कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केली जात आहेत.
  • या अर्जांमध्ये असलेल्या चुका नीट तपासल्या जात नाही आणि परिणामी अनेक विद्यार्थ्यांना पारपत्रासाठी नकार मिळत आहेत, असंही ते म्हणाले.

तज्ज्ञांनी कोणती चिंता व्यक्त केली?

या संदर्भात माहिती देताना गेल्या १० वर्षांपासून पिन्नॅकल इमिग्रेशन ही संस्था चालवणारे तीरथ सिंह म्हणाले, “विद्यार्थी आणि त्यांचे सल्लागार दोघंही कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करून फाईल्स तयार करत आहेत, त्यामुळे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. योग्य मार्गदर्शन, स्पष्ट दस्तऐवज आणि वैयक्तिक प्रयत्न हेच पारपत्र मिळण्याचे प्रमुख घटक ठरतात. मात्र, त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे योग्य नाही आणि तसे केल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्यावर धोका निर्माण होऊ शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

canada study visa indian student decline
कॅनडाच्या शैक्षणिक पारपत्रासाठी रांगेत उभे असलेले भारतीय विद्यार्थी

अर्जावेळी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्याने काय होते?

परदेशात शिक्षणासाठी अर्ज करताना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरण्यास बंदी घालणाऱ्या स्पष्ट सूचना नसल्या तरी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, त्याचा वापर केल्यामुळे अर्जातील मजकूर एकसारखा वाटतो आणि अर्जदार खरे वाटण्याऐवजी बनावट असल्याचे वाटतात. उदाहरण द्यायचे झाल्यास कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार केलेले ‘स्टेटमेंट ऑफ पर्पज’ (SOP) हे बहुतेक वेळा एकसारखाच मजकूर वापरकर्त्यांना पाठवतात. अशा प्रकारचे स्टेटमेंट ऑफ पर्पज वाचून पारपत्राची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना शंका येते आणि अर्ज फेटाळून लावण्याची शक्यता वाढते. कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून राहणं हे अर्जदाराच्या गांभीर्याचा आणि मेहनतीचा अभाव दर्शवतं, त्यामुळे त्याच्या व्हिसा अर्जावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असं ‘i Can’ या परदेश शिक्षण सल्लागार संस्थेचे संस्थापक गुरप्रीत सिंह यांनी सांगितलं.

हेही वाचा : Gingee Fort: शिवरायांच्या इतिहासात जिंजी किल्ल्याला एवढे महत्त्व कशासाठी? दक्षिण दिग्विजय मोहीम इतिहासात का ठरली अनोखी?

पारपत्र मंजूर करणारे अधिकारी कोणत्या गोष्टी तपासतात?

“विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या सल्लागारांनी ‘स्टेटमेंट ऑफ पर्पज’ तयार करताना मेहनत घेणं आवश्यक आहे. त्यात अर्जदाराच्या करिअरची उद्दिष्टं, निवडलेल्या कोर्सचं महत्त्व, कॅनडा हा देशच का निवडला आणि त्यांच्या दीर्घकालीन योजनांशी काय संबंध आहे, हे सर्व स्पष्टपणे नमूद केलेलं असावं. पारपत्र देणारे अधिकारी हे बघत असतात की, अर्जदार खरोखर अभ्यासासाठी प्रामाणिक आहे का, त्याच्या उद्देशात स्पष्टता आहे का आणि त्याने अभ्यासक्रमासाठी स्वतःची शैक्षणिक यात्रा विचारपूर्वक ठरवली आहे का,” असं तीरथ सिंह यांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पारपत्रासाठी इतर कागदपत्रांनाही तितकेच महत्त्व

शैक्षणिक पारपत्रासाठी अर्ज करताना ‘स्टेटमेंट ऑफ पर्पज’ जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच इतर कागदपत्रांचा तपशीलवार पुरावा देणंही महत्त्वाचं ठरतं. कोणताही विसंगत किंवा फुगवून सांगितलेला दावा हा पारपत्रासाठी केलेला अर्ज फेटाळून लावण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो, असं तीरथ सिंह यांनी म्हटलं आहे. “कृत्रिम बुद्धिमत्तेला दोष देऊन काहीही होणार नाही. विद्यार्थ्यांना स्वतःच्या अर्जाची पूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल. एआयसारख्या शॉर्टकट्सवर अवलंबून राहण्यापेक्षा प्रामाणिक आणि नीट तयार केलेला अर्ज यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते,” असं ते म्हणाले.