scorecardresearch

Premium

विश्लेषण: अमेरिकेत कर्करोगावरील औषधांचा तुटवडा

अमेरिकेत कशाचा तरी तुटवडा निर्माण होऊ शकतो, याची कल्पनाही आपण करणे शक्य नाही.

cancer diseas
( कर्करोग रुग्ण )

भक्ती बिसुरे

अमेरिकेत कशाचा तरी तुटवडा निर्माण होऊ शकतो, याची कल्पनाही आपण करणे शक्य नाही. मात्र, नुकत्याच उघड झालेल्या माहितीनुसार अमेरिकेत सध्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. कर्करोगाचे अमेरिकेतील वाढते प्रमाण आणि त्यामुळेच औषधांचा होणारा अतिरिक्त वापर तसेच अमेरिकन एफडीएच्या धोरणांचा परिणाम यांमुळे हा तुटवडा पाहायला मिळत आहे. त्या निमित्ताने या प्रकरणाचा वेध घेणारे हे विश्लेषण.

UK Vs UK Tea Controversy
चहामध्ये मीठ? चहाच्या रेसिपीवरून अमेरिका आणि ब्रिटनमध्ये पेटला वाद; वाचा, नेमके प्रकरण काय?
Meta Facebook
‘मेटा’वर दररोज एक लाख मुलांचे होते लैंगिक शोषण; तुमची मुले सुरक्षित आहेत का?
Are there any real side effects of the ketogenic diet
Health Special: केटोजेनिक आहाराचे नेमके दुष्परिणाम असतात का? कोणते? (भाग दुसरा)
Integrated Circuit Texas Instruments TI company Jack Kilby Nobel Robert Noyce
चिप-चरित्र:‘इंटिग्रेटेड सर्किट’चा जन्म!

अमेरिकेतील परिस्थिती नेमकी काय?

अमेरिकेत सध्या केमोथेरपीच्या औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. तसे पाहिले तर हा तुटवडा गेल्या तीन दशकांपासून अमेरिकन रुग्ण अनुभवत आहेत. पण सध्या त्याच्या तीव्रतेत मोठी वाढ दिसून येत आहे. ‘द न्यू यॉर्क टाइम्स’सह अमेरिकेतील काही प्रमुख वृत्तपत्रांनी अलीकडेच जगाचे लक्ष या तुटवडय़ाकडे वेधले आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (‘एफडीए’ने) दिलेल्या माहितीनुसार सुमारे १३० औषधांचा तुटवडा अमेरिका अनुभवत असून त्यांपैकी बहुतांश औषधे ही कर्करोगावरील उपचारांचा भाग असलेल्या केमोथेरपीसाठी वापरली जातात. स्तनांचा कर्करोग, स्त्रीरोगांशी संबंधित विविध कर्करोग, डोके आणि मानेच्या कर्करोगांसह आतडय़ांच्या कर्करोगावर तसेच फुप्फुसांचा कर्करोग, अंडाशयाचा कर्करोग यांवर उपचार करणाऱ्या औषधांचा यामध्ये समावेश आहे.

प्रमुख औषध घटक कोणते?

काबरेप्लाटिन आणि सिस्प्लेटिन या दोन औषधांच्या पुरवठय़ावर गेल्या काही दिवसांमध्ये झालेला परिणाम हा अमेरिकेतील कर्करुग्णांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. केमोथेरपीमध्ये या दोन औषधांचे असलेले महत्त्व आणि नेमकी त्यांच्याच उपलब्धतेतील अडचण यांमुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या दोन केमोथेरपी सत्रांमधील अंतर वाढवण्याचा निर्णयही डॉक्टरांकडून घेण्यात आला आहे. तातडीने केमोथेरपीची गरज असलेल्या रुग्णांना औषधांच्या उपलब्धतेप्रमाणे दूरच्या रुग्णालयांमध्ये जाऊन केमोथेरपी घेण्यास प्राधान्य देण्याची वेळही आली आहे. औषधांचा तुटवडा सध्या ‘गेल्या तीन दशकांतील सर्वाधिक’ असल्यामुळे तेथील डॉक्टरांना कर्करोग उपचारांतील औषधांचे रेशिनग करण्याची वेळही आल्याचे जागतिक माध्यमांनी म्हटले आहे.

औषध तुटवडय़ाची कारणे काय?

अमेरिकेतील कर्करोगावरील औषधांच्या तुटवडय़ाची काही प्रमुख कारणे या निमित्ताने उघड होत आहेत. जेनेरिक औषध श्रेणीतील कर्करोग औषधांच्या कमी किमती या घटकाची सध्या दिसणाऱ्या औषध तुटवडय़ातील भूमिका महत्त्वाची आहे. या औषधांचे उत्पादन स्वस्त असले तरी नफेखोरीला आळा घालण्यासाठी तेथील औषध कंपन्यांना स्वस्त औषधांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले जात नाही. वाढते आयुर्मान आणि त्याचा परिणाम म्हणून जडणारी कर्करोगासारखी व्याधी हेही औषधांच्या तुटवडय़ाचे एक प्रमुख कारण मानले जात आहे. अमेरिकेत कर्करोगाने ग्रासलेल्या लोकसंख्येचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे औषधांचे उत्पादन आणि गरज यांचे असलेले व्यस्त प्रमाण हेही तुटवडय़ाचे एक प्रमुख कारण आहे, असे जागतिक वैद्यकीय क्षेत्रातून स्पष्ट करण्यात येत आहे. पुरवठा साखळीतील (सप्लाय चेन) कच्चे दुवे हेही औषधांच्या अनुपलब्धतेमागील एक कारण असल्याने ती साखळी निर्दोष करण्याच्या गरजेकडेही लक्ष वेधण्यात येत आहे.

या तुटवडय़ाशी भारताचा संबंध काय?

अमेरिकेतील औषध निर्मिती उद्योग हा प्रामुख्याने भारत आणि चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या औषध निर्मिती घटकांवर अवलंबून आहे. नुकताच भारतातील एका कंपनीकडून होणारा सिस्प्लॅटिन नामक घटकाचा पुरवठा त्याच्या गुणवत्तेतील त्रुटींमुळे थांबवण्यात आला. त्याचाही परिणाम अमेरिकेतील औषध उपलब्धतेवर दिसून येत आहे. या सगळय़ाचा परिणाम म्हणून जो बायडेन यांच्या प्रशासनाने दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी वेगवान पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

तुटवडय़ाचे परिणाम किती गंभीर?

औषध तुटवडय़ाची सध्या दिसणारी तीव्रता ही रुग्ण, त्यांचे कुटुंबीय आणि वैद्यकीय वर्तुळासमोरील ताण वाढवणारी ठरत आहे. या तुटवडय़ावर मार्ग काढण्यासाठी रुग्णालये आणि डॉक्टरांकडून औषधांचा साठा करून ठेवण्याकडे कल वाढत आहे. अशी साठवणूक करून ठेवण्यामुळे उपचारांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उपलब्धतेवर वेळीच मार्ग न काढल्यास हजारो रुग्णांच्या जिवावर हे संकट बेतण्याची भीतीही अमेरिकेसमोर सध्या आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cancer drug shortage in america print exp 0623 amy

First published on: 14-06-2023 at 02:23 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×