सिद्धार्थ खांडेकर
देशात नुकत्याच दोन प्रवासी विमानांना उड्डाण केल्यानंतर लगेच पक्ष्यांची धडक बसल्यामुळे आणीबाणी उद्भवून ही विमाने तातडीने उगम विमानतळांवर उतरवावी लागली. पक्ष्यांची धडक प्रवासी विमानांना बसणे ही तशी नित्याची बाब. पक्ष्यांचे अधिवास विमानतळाजवळ असतील, तर हे प्रकार अधिक सातत्याने संभवतात. या धडकांमुळे अजूनपर्यंत तरी भीषण अपघात उद्भवलेला नसला, तरी त्यांचे गांभीर्य हवाई वाहतूक उद्योगाशी संबंधित सर्व जण ओळखून आहेत. तरीदेखील हे धोक करण्याचे नेमके उपाय अजून सापडलेले नाहीत.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

अलीकडच्या दोन घटनांमध्ये काय घडले?

इंडिगो कंपनीचे ए-३२० निओ बनावटीचे विमान रविवारी गुवाहाटी विमानतळावरून नवी दिल्लीच्या दिशेने झेपावले. या विमानाच्या डाव्या इंजिनाला पक्ष्याची धडक बसल्याचे १६०० फुटांवर लक्षात आल्यानंतर वैमानिकांनी विमान गुवाहाटीत पुन्हा उतरवले. त्याच दिवशी दुपारी पाटण्याहून स्पाइस जेट कंपनीचे बोईंग-७३७-८०० बनावटीचे विमान नवी दिल्लीच्या दिशेने उडाले. सुरुवातीस पक्ष्याची धडक बसल्याचा भास वैमानिकांना झाला. परंतु विमान आणखी वर गेल्यानंतर डाव्या इंजिनातून ठिणग्या निघत असल्याचे केबिन सेवकांनी सांगितल्यानंतर विमान पुन्हा पाटणा विमानतळावर उतरवण्यात आले.

पक्ष्याची धडक कशी बसते? त्यातून किती नुकसान होऊ शकते?

हवेत उड्डाण केलेल्या कोणत्याही वस्तूला पक्ष्याची धडक बसू शकते. परंतु जेट विमानांना – त्यातही छोट्या व मध्यम आकाराच्या विमानांना विशेषतः उड्डाण आणि उतरण्याच्या वेळी पक्ष्यांची धडक बसण्याची शक्यता अधिक असते. विमानतळ सहसा मोकळ्या जागांवर असतात. येथे झाडी किंवा गवताचे प्रमाण अधिक असेल, पावसामुळे तात्पुरती पाणथळ जागा निर्माण झाली असेल, तर पक्ष्यांच्या अधिवासासाठी ती पोषक असते. प्रजनन, संगोपन अशा अनेक कारणास्तव अशा जागांवर पक्ष्यांचा राबता असतो. मोठ्या शहरांमध्ये विशेषतः अहमदाबाद आणि मुंबईत विमानतळांजवळ उकीरडे निर्माण होतात. अशा ठिकाणी अन्नभक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर पक्षी जमतात. हेही पक्षी धडकण्याचे कारण ठरू शकते. पक्षी विशेषतः विमानाच्या पुढच्या भागाला धडकतात. अनेकदा जेट इंजिनांच्या शक्तिशाली शोषणक्षमतेमुळे पक्षी इंजिनात खेचले जाऊन भस्मसात होतात. त्यांचा आकार मोठा असल्यास किंवा संख्या अधिक असल्यास इंजिनातील पंख्यांच्या पात्यांचे नुकसान होऊ शकते. तसे झाल्यास त्या इंजिनाचा ‘थ्रस्ट’ किंवा रेटा क्षीण होऊन उड्डाणक्षमताच धोक्यात येऊ शकते. त्यामुळे बहुतेकदा अशी धडक बसलेले इंजिन तात्काळ बंद करून विमान तातडीने नजीकच्या विमानतळावर उतरवले जाते. काही वेळा विमानाच्या समोरील काचेवर किंवा प्रवासी खिडकीच्या काचेवर पक्ष्याची धडक बसून तिला तडा जाण्याचे प्रकारही घडले असते. काच पूर्ण नष्ट झाल्यास विमानातील हवेचा दाब अचानक कमी होऊ शकतो. मात्र असे प्रकार दुर्मीळ असतात.

पक्ष्यांच्या धडका किती सातत्याने बसतात?

इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनच्या ९० देशांमध्ये झालेल्या एका पाहणीनुसार, दररोज पक्षीधडकेच्या जवळपास ३४ घटना घडत असतात. यांतील बहुसंख्य धडका नगण्य असतात. परंतु या प्रकारांमुळे प्रवासी हवाई वाहतूक उद्योगाचे होणारे आर्थिक नुकसान प्रचंड आहे. कारण संबंधित विमान पूर्णतया दुरुस्त होईपर्यंत आणि उड्डाणयोग्य प्रमाणित ठरवले जाईपर्यंत जमिनीवरच राहते.

पक्षी धडकल्याची सर्वांत प्रसिद्ध घटना कोणती? त्यावेळी काय घडले?

१५ जानेवारी २००९ रोजी यूएस एअरवेजचे ए-३२० बनावटीचे विमान न्यूयॉर्कच्या ला गॉर्डिया विमानतळावरून उत्तर कॅरोलिनाच्या शार्लोट शहराच्या दिशेने झेपावले. जवळच्या हडसन नदीवरून झेपावलेला पाणबदकांचा थवा त्याच वेळी विरुद्ध दिशेने आला. त्यांतील काही विमानाच्या समोरील काचेवर आदळली, काही दोन्ही इंजिनांमध्ये खेचली जाऊन भस्मसात झाली. बदकांची संख्या आणि त्यांचा आकार या दोहोंमुळे दोन्ही इंजिनांतील पात्यांचे मोठे नुकसान झाले आणि दोन्ही इंजिने काही सेकंदांतच बंद पडली. बंद पडलेले हे विमान सुरुवातीच्या रेट्याच्या आधारावर आणि विशिष्ट आकारामुळे काही काळ तरंगू शकले. परंतु पॉवर संपल्यामुळे जवळच्या कोणत्याही विमानतळावर पोहोचण्याइतपत अवधीच मिळणार नाही हे ताडून वैमानिक चेल्सी सुलेनबर्गर यांनी हे विमान हडसन नदीच्या पाण्यावर अलगद उतरवले. दोन्ही वैमानिकांनी, तसेच केबिन सेविकांनी दाखवलेल्या धैर्य आणि कौशल्यामुळे विमानातील सर्व १५६ प्रवासी आश्चर्यकारकरीत्या बचावले. परंतु यानिमित्ताने पक्षी धडक ही समस्या किती गंभीर ठरू शकते हेही अधोरेखित झाले.

पक्षी धडका टाळण्यासाठी कोणते उपाय योजले जातात?

असे प्रकार टाळण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. पण निश्चित उपाय अजूनही सापडलेला नाही. गोळीबाराचे आवाज, शिकारी पक्ष्यांचे आवाज, कृत्रिम ससाणे, प्रशिक्षित जिवंत ससाणे, ड्रोन असे अनेक उपाय योजले गेले आणि जाताहेत. अशा आवाजांना पक्षी सरावतात असे आढळून आले. शिवाय जिवंत ससाणा इतर पक्ष्यांप्रमाणेच विमानांसाठी घातक ठरू शकतो, असेही दिसून आले. इंजिनांना जाळी बसवण्याची कल्पना पुढे आली, पण त्यामुळे इंजिनात येणाऱ्या हवेच्या प्रमाणावर परिणाम होईल, या कारणास्तव ती निकालात निघाली. या सर्व उपायांमध्ये पक्ष्यांचे अधिवास निर्माण होऊ नयेत यासाठी दक्षता घेणे यालाच सर्वाधिक पसंती मिळत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained bird hit are dangerous for passenger planes print exp 0622 abn
First published on: 20-06-2022 at 18:03 IST