हृषिकेश देशपांडे
कर्नाटकमधील भाजपचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वराप्पा यांना कंत्राटदाराच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी निर्दोष ठरवले आहे. या प्रकरणी अहवाल विशेष न्यायालयात सादर करण्यात आला. ८५ पानी अहवालात २००० कागदपत्रे जोडण्यात आली आहेत. या प्रकरणावरून कर्नाटकमधील भाजप सरकारची कोंडी झाली होती. आता राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला दिलासा मिळाला आहे.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

नेमके प्रकरण काय?

कंत्राटदार संतोष पाटील यांनी गेल्या वर्षी ११ एप्रिल रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी संतोष पाटील यांनी आपल्या शेवटच्या काही संदेशांमध्ये ईश्वराप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच आपल्या मृत्यूला ईश्वराप्पा हेच जबाबदार असतील असा आरोपही पाटील यांनी केला होता. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल करत त्यात ईश्वराप्पा यांचा उल्लेख केला होता. त्यामुळे पंचायत राज तसेच ग्रामविकास मंत्री असलेल्या ईश्वराप्पा यांना पद सोडावे लागले होते. बेळगावस्थित कंत्राटदार असलेल्या संतोष पाटील यांनी २८ मार्च रोजी आपल्या मित्रांना पाठवलेल्या संदेशात ईश्वराप्पा तसेच त्यांचे सहकारी बेळगावमधील हिंडलगा गावातील एका पायाभूत सुविधांच्या चार कोटींच्या कामात ४० टक्के कमिशन मागत असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी निविदाही काढलेली नाही तसेच कार्यादेशदेखील दिलेले नाहीत असे स्पष्ट करत ईश्वराप्पा यांनी आरोप फेटाळले होते. ३१ मार्च रोजी

ईश्वराप्पा यांच्या मुलाने पाटील यांच्या विरोधात बदनामीबद्दल फौजदारी खटला दाखल केला होता. ११ एप्रिलला पाटील यांनी मित्रांना संदेश पाठवले होते. त्याच दिवशी उडपी येथील एका लॉजमध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर ईश्वराप्पा यांना राजीनामा देण्याचे निर्देश भाजप श्रेष्ठींनी दिले होते. पुढे चार दिवसांनी म्हणजेच १५ एप्रिलला त्यांनी मंत्रिपद सोडले होते. ईश्वराप्पा यांनी सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले होते.

ईश्वराप्पा यांचे पक्षातील स्थान काय?

कर्नाटकमध्ये भाजप रुजवण्यात ज्या काही व्यक्तींचे नाव त्यात ७४ वर्षीय ईश्वराप्पा यांचा समावेश आहे. बेल्लारी येथे जन्मलेल्या ईश्वराप्पा यांचे कुटुंबीय नंतर शिमोगा येथे स्थायिक झाले. संघ परिवारातील विविध संघटनांशी ते लहानपणापासूनच संबंधित आहेत. १९८९ मध्ये पहिल्यांदा ते शिमोग्यातून विधानसभेवर विजयी झाले. १९९२मध्ये ते भाजपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष झाले. नंतरच्या काळात विविध महत्त्वाची मंत्रिपदे तसेच उपमुख्यमंत्रिपदही त्यांनी भूषवले. कुशल संघटक अशी ख्याती आहे. मात्र वादग्रस्त वक्तव्याने ते अनेकदा अडचणीत येतात.

पुन्हा मंत्रिपद?

पुढील वर्षी मे महिन्यात कर्नाटक विधानसभेची निवडणूक अपेक्षित आहे. दक्षिणेतील भाजपचे प्रवेशद्वार अशी या राज्याची ओळख आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना विधानसभेला अपेक्षित आहे. काही ठिकाणी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाचा प्रभाव आहे. मात्र विधानसभेला दुरंगी सामना होईल अशी चिन्हे आहेत. बसवराज बोम्मई यांच्याकडे सूत्रे आहेत. ईश्वराप्पा यांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. राज्यातील प्रभावी अशा कुरबा समुदायातून ते येतात. ईश्वराप्पा यांचा संघ परिवारात असलेला प्रभाव पाहता ते पुन्हा मंत्रिपदाची मागणी करण्याची शक्यता आहे. अशा वेळी बोम्मई यांच्या नेतृत्वाचा कस लागेल. भाजपश्रेष्ठी याबाबत काय निर्णय घेतात ते पहावे लागेल. विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतर्गत मतभेद दूर करणे महत्त्वाचे आहे हे पक्ष नेतृत्व जाणून आहे. त्यामुळे ईश्वराप्पा यांच्याकडे पुन्हा मंत्रिपद येते काय, हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained bjp stalwart eshwarappa gets clean chit in abetment to suicide of a contractor case in karnataka sgy
First published on: 22-07-2022 at 07:47 IST