scorecardresearch

Premium

लोकसत्ता विश्लेषण: उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची अडथळ्यांची शर्यत

उत्तर प्रदेशात पक्षाच्या राज्य स्तरावरील नेत्यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे

Congress, UP Election, Uttar Pradesh Assembly Election,
(File- PTI)

महेश सरलष्कर

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या चमूतील तरुणतुर्क नेते आरपीएन सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहेच, शिवाय उत्तर प्रदेशात पक्षाच्या राज्य स्तरावरील नेत्यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक दोन आठवड्यांवर आली असताना काँग्रेसला उत्तर प्रदेशात अडथळ्यांच्या शर्यतीला सामोरे जावे लागत आहे.

congress succeeded in saving himachal pradesh
हिमाचल प्रदेशची कमळ मोहीम अयशस्वी; निरीक्षकांच्या शिष्टाईनंतर काँग्रेसमधील मतभेद दूर
SP-Congress alliance
इंडिया आघाडीसाठी यूपी बूस्टर ठरणार, प्रियंका गांधींनी अखिलेश यांना केला फोन अन् सपा-काँग्रेसची आघाडी निश्चित
Congress india alliance uttar pradesh
इंडिया आघाडीचं घोडं गंगेत न्हालं; उत्तर प्रदेशमध्ये सपा-काँग्रेसमध्ये ‘इतक्या’ जागांवर एकमत
Madhya Pradesh Congress
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनंतर आता मध्यप्रदेशचे माजी सीएम कमलनाथही भाजपाच्या वाटेवर? राजकीय चर्चांना उधाण!

काँग्रेसला कोणी सोडचिठ्ठी दिली?

उत्तर प्रदेशातील केंद्रीय स्तरावर कार्यरत राहिलेले जीतिन प्रसाद आणि आरपीएन सिंह हे दोन्ही काँग्रेस नेते भाजपमध्ये गेले आहेत. पण, विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाल्यानंतरही काँग्रेसच्या तीन नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला हे विशेष. रामपूर जिल्ह्यातील चमराऊ मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार युसुफ अली समाजवादी पक्षात गेले आहेत. ‘सप’ने मात्र त्यांना अजून उमेदवारी दिलेली नाही. स्वार-टांडा मतदारसंघातून काँग्रेसने हैदर अली खान ऊर्फ हमझा मियाँ यांना तिकीट दिले होते. ते याच मतदारसंघातून आता अपना दल (सोनेलाल) पक्षातून निवडणूक लढवत आहेत. ‘सप’ने या मतदारसंघातून आझम खान यांचा मुलगा अब्दुल्लाला उमेदवारी दिली आहे. बरेली कॅन्ट. मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया एरन आणि त्यांचे पती माजी खासदार प्रवीण सिंह यांनी ‘सप’मध्ये प्रवेश केला आहे.

‘लडकी हूँ लड सकती हूँ’ घोषणेला धक्का?

काँग्रेसने महिलाकेंद्री निवडणूक प्रचार सुरू केला होता, त्यामध्ये ‘लडकी हूँ लड सकती हूँ’चा नाराही दिला होता. ४० टक्के महिला उमेदवार उभे करण्यासह अनेक महिलाविषयक मुद्द्यांचा जाहीरनामाही काँग्रेसने प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्याच्या पृष्ठभागावर प्रियंका मौर्य या तरुणीचे छायाचित्र होते. उत्तर प्रदेशमधील महिला काँग्रेसच्या याच उपाध्यक्ष प्रियंका मौर्य यांना काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ओबीसी असल्याने आपल्याला तिकीट नाकारण्यात आल्याचा आरोप प्रियंका यांनी केला. काँग्रेसचे महिला धोरण ओबीसी विरोधात असल्याचा प्रचार केला जात असून त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसू शकतो असे मानले जाते.

जुने-जाणतेही काँग्रेसमधून बाहेर?

विद्यमान ७ पैकी ४ आमदार काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत. रायबरेलीच्या आमदार अदिती सिंह, हरचंद्रपूरचे राकेश सिंह आणि बेहटचे नरेश सैनी हे तिघे भाजपमध्ये गेले आहेत तर, सहारनपूर (ग्रामीण)चे आमदार मसूद अख्तर यांनी सपमध्ये प्रवेश केला आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट नेते व माजी खासदार हरेंद्र मलिक, त्यांचे पुत्र पंकज मलिक यांनीही सपची सायकल पकडली आहे. ललितेशपती त्रिपाठी तृणमूल काँग्रेसमध्ये गेले आहेत. प्रियंका गांधी-वाड्रा यांच्या सल्लागारांपैकी विनोद चतुर्वेदी, माजी आमदार गयादिन अनुरागी, महोबातील मनोज तिवारी, कानपूर ग्रामीणमधील काँग्रेसचे बलाढ्य नेते माजी खासदार राजाराम पाल हेदेखील सपमध्ये गेले आहेत. या सर्वांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार होती. याशिवाय, सलिम शेरवानी, उन्नावच्या माजी खासदार अनु टंडन, मिर्झापूरचे माजी खासदार बालकुमार पटेल, सीतापूरचे कैसर जहाँ, अलिगडचे विजेंद्र सिंह, माजी मंत्री चौधरी लियाकत, रामसिंह पटेल, जस्मीन अन्सारी, अंकित परिहार, रमेश राही अशा अनेक प्रादेशिक स्तरावरील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसला रामराम केला आहे.

नेता नाही, जातींचे गणितही गडबडले?

पूर्वी काँग्रेसचे बहुतांश बलाढ्य नेते उत्तर प्रदेशमधून येत असत. पण, राष्ट्रीय स्तरावर वर्चस्व गाजवेल असा एकही नेता सध्या उत्तर प्रदेशात काँग्रेसकडे नाही. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत गांधी कुटुंबाच्या पारंपरिक अमेठी मतदारसंघातून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभूत व्हावे लागले. प्रियंका गांधी यांच्याकडे काँग्रेसने उत्तर प्रदेशचे महासचिव पद दिले असले आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या निवडणुकीची धुरा सोपवण्यात आली असली तरी, त्यांनी अजून उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवण्याची तयारी दाखवलेली नाही. काँग्रेसने ब्राह्मण, दलित आणि मुस्लिम या तीन मतदारांच्या आधारावर उत्तर प्रदेशमध्ये विजय आणि सत्ता मिळवली होती. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून ब्राह्मण भाजपकडे, दलित भाजप-बसप-सपकडे आणि मुस्लिम सप-बसपकडे वळले आहेत.

काँग्रेसचे धोरण ‘’सप’’ला अधिक लाभदायी ठरेल?

२०१२ मध्ये राहुल गांधी यांनी तत्कालीन सत्ताधारी बहुजन समाज पक्षाच्या विरोधात ‘हाथी पैसा खाता है’चा नारा दिला होता, त्याचा फायदा काँग्रेसला होण्याऐवजी समाजवादी पक्षाला झाला होता व सपला सत्ताही मिळाली होती. आताही प्रियंका गांधी यांनी विद्यमान योगी सरकारविरोधातील करोनाच्या दुसऱ्या लाटेतील निष्काळजीपणा, धार्मिक हिंसाचार आदी मुद्दे मांडले असले तरी त्याचा लाभ पुन्हा सपला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसने २०१७ मध्ये सपशी युती केली होती पण, त्यातून दोन्ही पक्षांचे नुकसान झाले. त्यामुळे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सपने बसपशी आघाडी केली. दोन्ही निवडणुकांत भाजपने भरघोस यश मिळवले. आता काँग्रेस आणि सप दोन्हीही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained congress facing hurdles in up assembly election 2022 print exp 0122 sgy

First published on: 28-01-2022 at 07:46 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×