वैशाली चिटणीस
वेतनाच्या संदर्भात लैंगिक भेदभाव केला असा आरोप करत केली एलिस, होली पीस, केली विसुरी आणि हैदी लॅमर या चौघींनी २०१७ मध्ये दाखल केलेल्या फिर्यादीवर तडजोड करायचे मान्य करून गुगलने त्यांना ११.८ कोटी अमेरिकी डॉलर्सची नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले आहे. गुगलमध्ये वेगवेगळ्या २३६ पदांवर काम करणाऱ्या १५ हजार ५०० स्त्रियांच्या वतीने या चौघींनी गुगलवर गुदरलेल्या या खटल्यामुळे अमेरिकी वेतनपद्धतीत सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

वेतन संदर्भातील लैंगिक भेदभावाचा आरोप काय आहे?

केली एलिस, होली पीस, केली विसुरी आणि हैदी लॅमर या चौघींनी सप्टेंबर २०१३ पर्यंत गुगलच्या कॅलिफोर्निया येथील कार्यालयामध्ये तंत्रज्ञ म्हणून काम केले आहे. त्यांच्यापैकी केली एलिसने सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून गुगलच्या माऊंटन व्ह्यू कार्यालयात चार वर्षे, होली पीसने गुगलच्या माऊंटन व्ह्यू तसेच सनीवेल कार्यालयात विविध तांत्रिक जबाबदाऱ्या सांभाळत साडेदहा वर्षे, केली विसुरीने वर्षे गुगलच्या माऊंटन व्ह्यू कार्यालयात तांत्रिक पदावरच्या मोठ्या जबाबदाऱ्या अडीच वर्षे सांभाळल्या आहेत. तर हैदी लॅमरने गुगलच्या पालो अल्टो येथील चिल्ड्रन सेंटरमध्ये चार वर्षे शिक्षिका म्हणून काम केले आहे. कंपनीत फक्त वेतनाच्या संदर्भातच लैंगिक भेदभाव होतो असे नाही तर स्त्रियांना काम देतानाच कमी पातळीवरचे दिले जाते, त्यांची पदोन्नती पुरुषांच्या तुलनेत कमी पातळीवरची आणि कमी सातत्याने होते, असा या चौघींचा आरोप आहे.

यासंदर्भात गुगलचे म्हणणे काय आहे?

गुगलने आपल्या निवेदनात कंपनीमध्ये वेतनाच्या पातळीवर अशा पद्धतीचा लैंगिक भेदभाव होतो, ही गोष्टच नाकारली आहे. कंपनी म्हणते, ‘आमच्या धोरणांमध्ये आणि कार्यवाहीमध्ये समानतेचा अंतर्भाव आहे. पाच वर्षे चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर दोन्ही बाजूंनी सर्वमान्य असा तोडगा मान्य केला. नोकरीवर घेणे, वेतन आणि नंतरच्या सर्व संबंधित गोष्टींमध्ये गुगलने नेहमीच समानतेला प्राधान्य दिले आहे. गेली नऊ वर्षे आम्ही या पद्धतीचे असमान वागणूक दिली जाणार नाही, यावर कटाक्ष ठेवून आहोत. असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव झाल्याचे आढळलेच तर पुढच्या वेळी त्याची भरपाई केली जाते. २०२० या वर्षातच आम्ही दोन हजार ३५२ कर्मचाऱ्यांना ४.४ कोटींची नुकसानभरपाई दिली आहे.’

अमेरिकेत वेतन तसेच इतर पातळीवर लैंगिक असमानता आहे का?

गुगलच्या भागधारकांनी गुगलमध्ये महिलांचा लैंगिक छळ तसेच महिलांशी गैरवर्तन केले जाते असा आरोप करत कंपनीविरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यासंदर्भात २०२० मध्ये गुगलने लैंगिक वैविध्य, लैंगिक समानता  आणि सर्वांचा समान अंतर्भाव या धोरणावर ३१ कोटी डॉलर्स खर्च करण्याचे वचन दिले होते. ओरॅकल या सॉफ्टवेअर कंपनीवरही वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी वेतन दिले जाते म्हणून खटला दाखल करण्यात आला आहे. ओरॅकलमधील वेगवेगळ्या १२५ पदांवर काम करणाऱ्या तीन हजार स्त्रियांच्या वतीने तिघींनी कंपनीवर गुदरलेल्या या खटल्यात एवढ्या प्रचंड संख्येने असलेल्या स्त्रियांना नुकसानभरपाई देणे शक्य नाही, या कंपनीच्या म्हणण्याला न्यायाधीशांनी सहमती दाखवल्याच्या पार्श्वभूमीवर गुगलसंदर्भातील निकाल बाहेर आला आहे. लिंक्डइनमध्येही अभियांत्रिकी, उत्पादन आणि विपणन या तीन विभागांमधील ६८६ स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी वेतन दिले जाते असा निष्कर्ष शासकीय तपास यंत्रणेने काढल्यानंतर लिंक्डइनने  नुकतेच म्हणजे मे महिन्यामध्ये भूतकाळातील वेतनापोटी १.८ कोटी डॉलर्स भरपाई देण्याची तयारी दाखवली. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये कंपनी स्त्रिया तसेच गौरेतर लोकांच्या बाबतीत भेदभाव करते असा आरोप करत भागधारकांनी खटला गुदरल्यानंतर पिंटरेस्ट या सॅन फ्रान्सिस्को येथील कंपनीने विविधतेला चालना देण्यासाठी आणि कंपनीची कार्यसंस्कृती बदलण्यासाठी तसेच लैंगिक- वांशिक वैविध्याला चालना देण्यासाठी पाच कोटी डॉलर्स खर्च करण्याची तयारी दाखवली होती. 

या पैशांचे वाटप कसे होणार आहे?

या तडजोडीनंतर २०१३पासून गुगलमध्ये वेगवेगळ्या २३६ पदांवर आजही काम करणाऱ्या तसेच २०१३ पासून ते आजपर्यंतच्या मधल्या काळात काम सोडलेल्या १५ हजार ५०० स्त्रियांना त्यांचा गुगलमधील कार्यकाळ, त्यांच्या कामाचे क्षेत्र, स्वरूप, त्यांच्या कामाची गुणवत्ता, शिक्षण आणि अनुभव याच्या अनुषंगाने हा नुकसानभरपाईतील भाग मिळणार आहे. तर केली एलिस, होली पीस, केली विसुरी आणि हैदी लॅमर या चार फिर्यादींपैकी केली एलिसला या खटल्यातील कायदेशीर बाबी पुढे नेल्याच्या कामाचे पारितोषिक म्हणून ७५ हजार डॉलर्स आणि बाकी तिघींना प्रत्येक ५० हजार डॉलर्स मिळणार आहेत.

आता पुढे काय ?

गुगलने तडजोडीची भूमिका घेऊन या चौघींना नुकसानभरपाई देण्याचे मान्य केल्यानंतर आता तज्ज्ञांच्या एका स्वतंत्र यंत्रणेकडून गुगलमध्ये नोकरीवर घेतानाच स्त्री- पुरुषांना समान वेतन कसे दिले जाईल यावर काम केले जाईल. स्वतंत्र कामगार अर्थकारण तज्ज्ञ गुगलच्या नेतन श्रेणीचा अभ्यास करेल. संबंधित खटल्यातील तडजोडीनंतरच्या व्यवहारांवरही स्वतंत्र यंत्रणेकडून लक्ष ठेवले जाईल. गुगल ही कंपनी अगदी पहिल्यापासून तंत्रज्ञान क्षेत्राचे नेतृत्व करते आहे. आता स्त्री समानता या मुद्द्यावरदेखील ते काहीतरी दिशादर्शक करतील आणि यापुढच्या काळात या क्षेत्रात येणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या नोकऱ्यांमध्ये वेतनादी पातळीवर आणखी समान वागणूक मिळेल अशी आशा आहे, असे होली पीसचे म्हणणे आहे.

More Stories onगुगलGoogle
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained google pays 118 million dollar to female staff in gender discrimination suit print exp abn
First published on: 15-06-2022 at 17:52 IST