आयएनएस विक्रांत या भारतीय बनावटीच्या विमानवाहू नौकेच्या प्रारंभीच्या दोन्ही चाचण्या यशस्वी झाल्यानंतर आता तिसरी चाचणी सुरू झाली आहे. पुढील काळात विविध पातळीवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर या वर्षाच्या उत्तरार्धात आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होईल. या विमानवाहू नौकेने काय साध्य होणार, या विषयीच्या प्रश्नांचा हा शोध.

विमानवाहू नौकेचे महत्त्व काय ?

लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरचा ताफा घेऊन समुद्रात तरंगणारे अवाढव्य शहर म्हणजे विमानवाहू युद्धनौका. आपल्या भूमीपासून दूरवरील युद्ध लढण्यासाठी तिचा उपयोग होतो. समुद्रात खोलवर (निळ्या पाण्यातील) कार्यवाहीसाठी नौदलास प्रचंड शक्ती देणारे हे अस्त्र आहे. लढाऊ विमानांमुळे तिची मारक क्षमता कित्येक पटीने वाढते. विमानवाहू नौकेच्या दिमतीला क्षेपणास्त्र आणि इतर आयुधांनी सुसज्ज विविध युद्धनौका, पाणबुडी, इंधन पुरविणारी जहाज असतात. समुद्रातील धोक्यांपासून युद्धनौकेच्या संरक्षणाबरोबर त्या दस्त्याचा युद्धात प्रभावीपणे वापर केला जातो.

इतिहासातील कामगिरी कशी ? 

दुसऱ्या महायुद्धात अशा विमानवाहू युद्धनौकेचा पहिल्यांदा वापर झाला होता. जपानच्या युद्धनौकेवरील लढाऊ विमानांनी पर्ल हार्बर या अमेरिकेच्या नौदल तळावर बॉम्ब वर्षाव केल्याचा इतिहास आहे. आपले प्रभुत्व राखण्यासाठी मोठ्या राष्ट्रांना विमानवाहू युद्धनौकेचे महत्त्व कळले. त्यांनी तिची बांधणी, ताफ्यात समाविष्ट करण्यावर लक्ष केंद्रित केले. मुळात विमानवाहू नौका बाळगणे प्रचंड खर्चिक विषय आहे. तिच्या संचलनासाठी एक ते दीड हजार अधिकारी, नौसैनिकांची गरज भासते. ताफ्यातील विमाने, युद्धनौकांचा दस्ता वेगळाच. आर्थिकदृष्ट्या संपन्न राष्ट्रे असा खर्च पेलू शकतात. त्यायोगे त्यांनी जगात आपला दबदबा निर्माण केला. आज विमानवाहू नौका ताफ्यात बाळगणे, तिचे संचलन जागतिक पटलावर कुठल्याही नौदलासाठी अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाते.

युद्धनौकेची गरज का ?

भारतीय नौदलाच्या ताफ्यात सध्या आयएनएस विक्रमादित्य ही एकमेव युद्धनौका आहे. रशियाकडून ती प्रचंड किंमत मोजून घेतलेली आहे. नौदलाची आयएनएस विराट ही युद्धनौका तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर जुलै २०१६ निवृत्त झाली. त्याआधी ‘आयएनएस विक्रांत’ याच नावाची विमानवाहू नौका, १९७१ ते २०१२ अशी सेवा बजावून निवृत्त झाली. देशाला पूर्व आणि पश्चिमेकडे विस्तीर्ण किनारपट्टी लाभलेली आहे. सभोवतालची बदलती परिस्थिती आणि आव्हाने, चीन आणि पाकिस्तानकडून निर्माण होणारे धोके, व्यापारी मार्गांची सुरक्षा लक्षात घेऊन दोन्ही क्षेत्रातील नौदल मुख्यालयांकडे प्रत्येकी एक आणि पर्यायी स्वरूपात एक अशा एकूण तीन विमानवाहू नौकांची गरज तज्ज्ञांकडून वारंवार मांडली गेली. भारतीय नौदलाने २०२७ पर्यंत युद्धनौकांचा ताफा १७० पर्यंत विस्तारण्याचे नियोजन केलेले आहे. त्यामध्ये तिसरी युद्धनौकाही समाविष्ट करण्यावर विचार होत आहे.

विमानवाहू युद्धनौकेची बांधणी भारतातच होण्याचे महत्त्व काय ?

विमानवाहू नौका ताफ्यात बाळगून तिचे संचलन करणारे जगात बरेच देश आहेत. पण तिच्या बांधणीची क्षमता राखणारे काही मोजकेच देश आहेत. नव्या ‘आयएनएस विक्रांत’ या विमानवाहू नौकेच्या बांधणीद्वारे भारत अशा निवडक राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. शेजारील चीनने विमानवाहू नौका बांधणीची क्षमता काही वर्षांपूर्वी प्राप्त केली होती. चीनच्या तिसऱ्या युद्धनौकेचे पुढील वर्षात जलावतरण होण्याच्या मार्गावर आहे. भारतीय नौदल आणि कोचीन शिपयार्डचा विमानवाहू नौका बांधणीचा हा पहिलाच प्रयत्न आहे.या युद्धनौकेची रचना, बांधणी आणि त्यावरील प्रणालींचे एकत्रीकरण हे सर्व काम देशात झाले. युद्धनौकेत ७६ टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला. त्यातून देशातील लहान-मोठ्या शेकडो उद्योगांना नव्या संधी उपलब्ध झाल्या. या युद्धनौकेची बांधणी, नौदलाची गरज देशांतर्गत पूर्ण होऊन परदेशांवरील अवलंबित्व कमी करणारी ठरली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

aniket.sathe@expressindia.com