माणसाचे आयुष्य अधिकाधिक सुकर करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात नवनवे प्रयोग सातत्याने सुरू असतात. त्यातील महत्त्वाचा टप्पा परवा अमेरिकेतील डॉक्टरांनी गाठला. प्रथमच मानवी शरीरात डुकराच्या हृदयाचे प्रतिरोपण करण्याचा प्रयोग अमेरिकेत नुकताच करण्यात आला. अमेरिकेतील युनिर्व्हसिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरमध्ये ५७ वर्षीय डेविड बेनेट यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. बेनेट यांचे हृदय निकामी झाल्यामुळे जगण्याची आशा नव्हती. हृदयप्रतिरोपणाशिवाय कोणताही अन्य पर्याय उपलब्ध नव्हता. परंतु त्यांच्यावर मानवी हृदयाचे प्रतिरोपणही यशस्वी होणारे नसल्यामुळे शेवटी या रुग्णालयातील डॉक्टरांनी डुकराचे हृदय प्रतिरोपित करण्याचा अनोखा प्रयोग करण्याचे ठरविले. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे गेल्या आठवड्यात पार पडली असून सोमवारी तीन दिवसांनी यंत्राच्या मदतीने बेनेट यांनी स्वत:हून श्वसनप्रकियादेखील सुरू केली आहे. पुढील काही दिवसांत बेनेट यांच्या प्रकृतीमध्ये अशीच सुधारणा होत राहिल्यास हा प्रयोग यशस्वी झाल्याचे म्हणता येईल, असे मत या रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केले आहे.

काय आहे हा प्रयोग?

मानवी शरीरामध्ये प्राण्यांचे अवयव प्रतिरोपण करण्याच्या प्रक्रियेला झेनोट्रान्सप्लांटेशन असे म्हटले जाते. डुकराचं हृदय मानवी शरीरात रोपण करण्यापूर्वी यामध्ये १० जनुकीय बदल करण्यात आले. यामध्ये डुकराच्या हृदयातून रॅपिड अन्टीबॉडी म्हणजे डुकराचे अवयव असल्यामुळे मानवी शरीर स्वीकार करणार नाही, अशी तीन जनुके काढून टाकण्यात आली. याऐवजी मानवी शरीर डुकराच्या अवयवांचा स्वीकार करेल अशी सहा नवीन जनुके समाविष्ट करण्यात आली. डुकराच्या हृदयामध्ये अतिरिक्त प्रमाणात ऊतींची वाढ करणारी जनुकीय रचनाही काढून टाकण्यात आली आहे, असे एकंदरीत दहा प्रकारचे जनुकीय बदल मानवी शरीरात प्रत्यारोपण करण्यापूर्वी डुकराच्या हृदयामध्ये केले गेले. या प्रक्रियेमध्ये मानवी शरीर डुकराचे अवयव नाकारण्याचा धोका अधिक असल्याने मानवी शरीरातील रोगप्रतिकार शक्ती क्षीण करणाऱ्या औषधांचा (इम्युनोसप्रेसंट) वापर उपचारादरम्यान करण्यात आला. जेणेकरून शरीर डुकराच्या अवयवांचा प्रतिकार करणार नाही.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?

नव्या पर्यायाची आशा

अवयव प्रतिरोपणासाठी जगभरात अनेकजण प्रतीक्षेत असून अवयवदानाबाबत अजून पुरेशी जनजागृती न झाल्यामुळे आवश्यकतेच्या तुलनेत फार कमी प्रमाणात अवयव उपलब्ध होतात. त्यात मरणोत्तर अवयवदानाचे प्रमाण अल्प असल्यामुळे हृदयासारख्या काही अवयवांसाठी रुग्णांना अनेक वर्षे वाट पाहावी लागते. मानवी शरीरात डुकराच्या हृदयाचे प्रतिरोपण करण्याचा हा जगातील पहिला प्रयोग आहे. डुकराच्या हृदयामध्ये जनुकीय बदल करून मानवी हृदयाप्रमाणे कार्यक्षम करण्याचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास प्रतिरोपणासाठी अवयवांची प्रतीक्षा करत रुग्णांना ताटकळत बसावे लागणार नाही आणि एक नवीन पर्याय खुला होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

परवानगीचा पेच

झेनोट्रान्सप्लांटेशन या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्षे संशोधन केले जात आहे. मानवी शरीरामध्ये डुकराच्या हृदयाचे प्रत्यारोपण करण्याच्या वैद्यकीय चाचण्या करण्याची मागणी अमेरिकेतील काही संस्था तेथील अन्न व औषध प्रशासनाकडे करत आहेत. परंतु त्यासाठी प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. नुकत्याच बेनेट यांच्यावर झालेल्या या शस्त्रक्रियेमध्ये जीव वाचविण्यासाठी आपत्कालीन परवानगी प्रशासनाने दिल्यामुळे ही शस्त्रक्रिया करण्यात आली. येत्या काळात समर्पक बदल केलेले डुकराचे मूत्रपिंड प्राप्त झाल्यास त्याचेही मानवी शरीरात प्रत्यारोपण करण्याच प्रयोग लवकरच अमेरिकेत करण्यात येणार आहे.