प्रशांत केणी
महिलांच्या मानसिक आणि शारीरीक शोषणाच्या दोन तक्रारींमुळे खडबडून जागे झालेल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया – साइ) महिला क्रीडापटूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडक पावले उचलली आहेत. महिला क्रीडापटूंचा समावेश असलेल्या देशांतर्गत किंवा परदेशातील प्रशिक्षण/स्पर्धा अशा स्वरूपाच्या दौऱ्यांसाठी महिला प्रशिक्षकांची नियुक्ती बंधनकारक असेल, असे निर्देश ‘साइ’ने राष्ट्रीय क्रीडा संघटनांना दिले आहेत. याचप्रमाणे या पथकासमवेत शिस्तपालन अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचेही या नव्या नियमावलीत म्हटले आहे. या निमित्ताने ‘साइ’ची महिला सुरक्षाविषयक नियमावली काय आहे, सायलपटू आणि नौकानयपटूंनी प्रशिक्षकांबाबत का तक्रारी केल्या, क्रीडामंत्र्यांची याबाबत काय भूमिका आहे, हे समजून घेऊया.

‘साइ’ने महिला क्रीडापटूंच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणते निर्देश राष्ट्रीय क्रीडा संघटनांना दिले आहेत?

‘साइ’ने महिला क्रीडापटूंच्या सुरक्षेसाठी खालील पावले उचलण्याचे निर्देश राष्ट्रीय संघटनांना दिले आहेत.

१. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी महिला क्रीडापटूचा समावेश असेलल्या संघासमवेत महिला प्रशिक्षकाची नेमणूक करणे बंधनकारक असेल.

२. राष्ट्रीय किंवा परदेशातील प्रशिक्षण/सराव शिबिरांसाठी शिस्तपालन अधिकारी (पुरुष/महिला) नियुक्त करण्यात यावा. क्रीडापटूंशी नियमित संपर्कात राहून क्रीडाक्षेत्रातील लैंगिक शोषणाला रोखण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती योद्ध पद्धतीने राबवण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यावर असेल. याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीकडेन नियमांचे उल्लंघन झाल्यास त्वरित संघटनेला कळवून कारवाईचे धोरण आखणे, हेसुद्धा त्याचे कार्य असेल.

३. कोणत्याही राष्ट्रीय शिबिराच्या किंवा परदेश दौऱ्याच्या प्रारंभी जागृती कार्यक्रम आखून तो क्रीडापटू, प्रशिक्षक आणि अन्य साहाय्यक मार्गदर्शकांसमोर सादर करणे.

४. राष्ट्रीय शिबिरांना किंवा परदेश दौऱ्यांना महिला प्रशिक्षक किंवा अन्य महिला प्रशिक्षकांचे संख्याबळ वाढवणे.

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी महिला सुरक्षेबाबत काय म्हटले आहे?

‘‘महिला क्रीडा क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी करीत आहेत. मला भविष्यात महिलांच्या सुरक्षिततेवर आणि खेळांमध्ये सहभागी होण्याची संधी यावर भर द्यायचा आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत,’’ असे ठाकूर यांनी नुकतेच दिल्लीमधील एका कार्यक्रमात महिलांच्या सुरक्षेबाबत म्हटले आहे.

महिला सायकलपटूच्या तक्रारीवरून प्रशिक्षकावर का कारवाई करण्यात आली?

स्लोव्हेनिया दौऱ्यावर एका महिला सायकलपटूने राष्ट्रीय प्रशिक्षक आर. के. शर्मा यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केली. त्यामुळे एक महिला, पाच पुरुष सायकलपटूंसह प्रशिक्षक शर्मा यांना मायदेशात तात्काळ बोलावण्यात आले. ‘साइ’ने हे प्रकरण अंतर्गत शिस्तपालन समितीकडे सोपवले. या समितीने तिला पोलीस तक्रार करण्याची सूचना केली. या समितीने पथकातील सर्वांची चौकशी केली आणि प्रशिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दिल्लीत १८ ते २२ जून या कालावधीत होणाऱ्या आशियाई ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी प्रशिक्षण आणि स्पर्धेतील सहभाग या दृष्टीने हे पथक स्लोव्हेनियाला केले होते. परंतु निवास व्यवस्था दुहेरी व्यक्तींसाठी प्रति खोली अशा स्वरूपाची असल्याचे सांगत प्रशिक्षकाने आपल्यासमवेत एकाच खोलीत राहण्याचे निर्देश दिले, असा दावा महिला क्रीडापटूने केला आहे.

नौकानयनपटूने प्रशिक्षकाबाबत कोणती तक्रार केली होती?

शिडाच्या बोटींच्या शर्यतीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला नौकानयनपटूने जर्मनी दौऱ्यावर राष्ट्रीय प्रशिक्षकाच्या गैरवर्तणुकीची तक्रार केली. ४७० मिश्र दर्जाच्या ऑलिम्पिक प्रकारात सहभागी होणाऱ्या या खेळाडूने प्रशिक्षण आणि स्पर्धेसाठी आयोजित केलेल्या या दौऱ्यात प्रशिक्षकाचे ‘वर्तन अयोग्य’ असून, ते मला ‘गैरसोयीचे’ ठरत आहे. भारतीय संघाची नियमित सदस्य असलेल्या या क्रीडापटूने गतवर्षी मुंबईत झालेल्या राष्ट्रीय मानांकन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकही कमावले होते. या प्रकरणातील प्रशिक्षक हा अर्जुन पुरस्कार विजेता नौदलातील निवृत्त अधिकारी असून, तीन वेळा ऑलिम्पिक, दुहेरी जागतिक यॉटिंग विजेतासुद्धा आहे. प्रशिक्षकाने ‘मानसिक दडपण’ आणले, असा दावा या प्रकरणात महिला क्रीडापटूने केला आहे. परंतु लैंगिक शोषणाचा या तक्रारीत समावेश नसल्याचे ‘साइ’च्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. भारतीय यॉटिंग महासंघाच्या सूचनेवरून ‘साइ’ याबाबत चौकशी अहवाल सादर केला.

काही वर्षांपूर्वी भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक एम. के. कौशिक यांना का राजीनामा द्यावा लागला?

२०१०मध्ये भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक एम. के. कौशिक यांनी पदाचा राजीनामा दिला. कारण भारतीय संघातील वरिष्ठ हॉकीपटू रंजिता देवीने त्यांच्या लैंगिक शोषणाचा आरोप केला. याप्रकरणी संघातील सर्व ३२ सदस्य त्या महिला खेळाडूच्या पाठीशी होते. हॉकी इंडिया संघटनेने नेमलेल्या पपाच सदस्यीय समितीने या प्रकरणाची चौकशी केली होती.