अन्वय सावंत
अनुभवी क्रीडा प्रशासक नरिंदर बात्रा यांनी काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (एफआयएच) आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे बात्रा यांना हे पाऊल उचलणे भाग पडले. मात्र, त्यांच्या राजीनाम्यानंतरही हॉकी इंडियाच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. दिल्ली उच्च न्यायालयाने हॉकी इंडियाचे कार्यकारी मंडळ बरखास्त करताना त्रिसदस्यीय प्रशासकीय समिती (सीओए) नेमली. मात्र, प्रशासकीय समितीच्या कामकाजाबाबत ‘एफआयएच’ समाधानी नाही. त्यामुळे पुढील वर्षीच्या (२०२३) विश्वचषक हॉकी स्पर्धेचे भारताला मिळालेले यजमानपद धोक्यात आले आहे.

बात्रा यांना राजीनामा का द्यावा लागला?

बात्रा यांना ‘हॉकी इंडिया’चे आजीवन सदस्यत्व देण्यात आले होते. याच्या आधारेच त्यांनी २०१७मध्ये ‘आयओए’च्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली आणि जिंकली होती. या विरोधात भारताचे माजी हॉकीपटू अस्लम शेर खान यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार, बात्रा यांना हॉकी इंडियाचे आजीवन सदस्यत्व मिळणे बेकायदेशीर असल्याचा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने २५ मे रोजी दिला होता. त्यानंतर त्वरित बात्रा यांना ‘आयओए’च्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने हॉकी इंडियाचे कार्यकारी मंडळ बरखास्त केले. त्यामुळे १८ जुलै रोजी बात्रा यांनी ‘एफआयएच’ आणि ‘आयओए’ अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) सदस्यत्वही सोडले. त्यानंतर बात्रा यांच्या दिल्ली आणि जम्मू येथील पाच कार्यालयांवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापे टाकले. बात्रा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.

India team selection for the Twenty20 World Cup expected today sport news
गिल, सॅमसनबाबत संभ्रम; ट्वेन्टी२० विश्वचषकासाठी भारताची संघनिवड आज अपेक्षित
Irfan Pathan opinion on Twenty20 World Cup team selection sport news
दोन मनगटी फिरकीपटू आवश्यक! ट्वेन्टी-२० विश्वचषक संघनिवडीबाबत इरफान पठाणचे मत
jyoti surekha vannam
ज्योतीची सुवर्ण हॅट्ट्रिक;  विश्वचषक तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड प्रकारात भारताला पाच पदके
West Indies all rounder Sunil Narine confirmed on international retirement
आंतरराष्ट्रीय निवृत्तीवर नरेन ठाम! ट्वेन्टी२० विश्वचषकात विंडीजसाठी खेळण्यास नकारच

हॉकी इंडियाचे कार्यकारी मंडळ बरखास्त का करण्यात आले?

बात्रा यांना आजीवन सदस्यत्व देऊन हॉकी इंडियाने राष्ट्रीय क्रीडा संहितेचे उल्लंघन केल्याचा दिल्ली उच्च न्यायालयाने ठपका ठेवला. त्याचप्रमाणेच एलेना नॉर्मन यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्तीही बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. त्यामुळे उच्च न्यायालयाने हॉकी इंडियाचे कार्यकारी मंडळ बरखास्त करत कामकाजाची जबाबदारी त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीकडे (सीओए) सोपवली.

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने काय चिंता व्यक्त केली?

सध्याच्या परिस्थितीत भारताला विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद भूषवता येईल का, अशी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाला (एफआयएच) चिंता आहे. गेल्या काही आठवड्यांत ‘एफआयएच’ने हॉकी इंडियाला बरीच पत्रे पाठवली. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीकडून त्यांना कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. त्यामुळे ‘एफआयएच’चे नवनियुक्त प्रभारी अध्यक्ष सैफ अहमद, मुख्य कार्यकारी अधिकारी थिएरी वेल आणि आशियाई हॉकी महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तय्यब इकराम हे त्रिसदस्यीय पथक १५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकार आणि हॉकी इंडियाच्या प्रशासकीय समितीची भेट घेणार आहे. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास आम्हाला यजमानपदासाठी अन्य पर्यायांचा विचार करावा लागेल, असे वेल यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार घटनादुरुस्ती करण्यासाठी हॉकी इंडियाला आवश्यक ती मदत करण्याची ‘एफआयएच’ची तयारी आहे. मात्र, हॉकी इंडियाने लवकरात लवकर नव्याने निवडणूक घेणे गरजेचे आहे, अन्यथा आमची चिंता वाढेल, असे वेल म्हणाले.

विश्वचषक हॉकी स्पर्धा कधी होणार आहे?

भारताला यजमानपद लाभलेली विश्वचषक हॉकी स्पर्धा पुढील वर्षी १३ ते २९ जानेवारी या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेचे सामने भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियम आणि राऊरकेला येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. मात्र, ठरल्याप्रमाणे ही स्पर्धा भारतात होण्याकरिता हॉकी इंडियाला वेगाने पावले उचलावी लागणार आहे.