How Raghunandan Kamath Built Naturals: बहुतांश लोकांसाठी विशेषतः ज्यांना शैक्षणिक पार्श्वभूमी नाही अशांसाठी अल्प भांडवलात आणि कोणतीही जाहिरात न करता यशस्वी व्यवसाय उभा करणं जवळजवळ अशक्य गोष्ट वाटते. मात्र, कर्नाटकातील एका छोट्याशा गावात आंब्यांचा व्यवसाय करणाऱ्या एका साध्या विक्रेत्याचा मुलगा असलेले रघुनंदन कामत यांनी हे अवघड काम यशस्वी करून दाखवलं आणि ‘नॅचरल्स आईस्क्रीम’ची स्थापना केली. आज त्यांच्या ब्रॅण्डची किंमत ३०० कोटी रुपयांहून अधिक आहे. त्याच पार्श्वभूमीवर ‘नॅचरल्स’चे संस्थापक रघुनंदन कामत यांच्याबद्दल जाणून घ्या

बालपणापासूनच उद्योगाची आवड

रघुनंदन कामत यांचा जन्म कर्नाटकमधील मंगळूर येथील एका छोट्या गावात झाला. वडिलांना लहानपणापासून आंबे विकण्याच्या व्यवसायात ते मदत करत होते. शालेय शिक्षणात त्यांना फारशी आवड नव्हती आणि त्यांनी १४ व्या वर्षी शाळा सोडली. त्यानंतर ते आपल्या मोठ्या भावाच्या लहानशा हॉटेलमध्ये काम करू लागले. लहान वयातच रघुनंदन कामत यांनी योग्य फळ ओळखण्याचं आणि त्याचा उपयोग करून नैसर्गिक घटकांपासून आईस्क्रीम तयार करण्याचं तंत्र आत्मसात केलं आणि त्याच कल्पनेवर त्यांनी पुढे काम सुरू केलं.

मुंबईत जुहूला सुरुवात

शाळा सोडल्यानंतर एका वर्षाने १९८४ साली अधिक संधी मिळाव्यात म्हणून ते मुंबईला आले. इथूनच त्यांच्या यशस्वी आईस्क्रीम व्यवसायाची सुरुवात झाली. मुंबईतील जुहू स्कीम परिसरातील विलेपार्ले येथे त्यांनी पहिलं लहानसं आईस्क्रीम पार्लर सुरू केलं. सुरुवातीला कामत यांच्यासह फक्त सहा कर्मचारी होते. आंबा, फणस, टरबूज यांसारख्या खऱ्या फळांच्या गरापासून तयार केलेल्या १२ फ्लेवर्समुळे हे पार्लर लवकरच स्थानिक रहिवाशांमध्ये आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय झालं.

आईच्या स्वयंपाकपद्धतीतून प्रेरणा

कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, रघुनंदन कामत यांना त्यांच्या आईच्या स्वयंपाकपद्धतीतून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी उत्पादन प्रक्रियेत सातत्य ठेवण्यासाठी आणि ती जलद करण्यासाठी विशेष यंत्रसामग्री तयार केली.

क्रिकेटर ठरला प्रसिद्धीस कारणीभूत

असं म्हटलं जातं की, कामत यांनी कधीही ब्रॅण्डची जाहिरात केली नाही. पण १९८६ साली वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू सर विव्हियन रिचर्ड्स यांनी त्यांच्या आईस्क्रीमचं कौतुक केलं आणि तेव्हापासून कामत यांचं आईस्क्रीम पार्लर घराघरात पोहोचलं. १९९४ साली वाढत्या मागणीमुळे कामत यांनी मुंबईत आणखी पाच शाखा सुरू केल्या. ते सांगतात, त्यांनी ब्रॅण्डसाठी कधीही जाहिरात किंवा मार्केटिंग केलं नाही, तर केवळ नैसर्गिक स्वादावर भर दिला.

व्यावसायिक पथ्य पाळलं

नॅचरल्स सारखी एवढा विश्वास संपादन करणारी कंपनी उभारणे, हे रघुनंदन कामत यांचे खरे कर्तृत्व. आईस्क्रीम लोकांपर्यंत गेल्याशिवाय खपणार नाही, हे ओळखून जुहू कोळीवाड्यातल्या दुकानाखेरीज अन्य ठिकाणी त्यांनी आईस्क्रीम-दुकाने काढली… सगळीकडे चव एकसारखीच मिळेल, ताजेपणाही राखला जाईल, हे व्यावसायिक पथ्य त्यांनी पाळले. मधुमेहाचा विकार सांभाळून, ‘नॅचरल्स’च्या कामात ते ध्यासमयतेने मग्न राहिले होते.

प्रसादम्’ किंवा ‘तिळगूळ’ स्वादाचे आइस्क्रीम

‘आमच्या काही स्वादांना मागणी कमी असते, ते आम्ही कमीच प्रमाणात करतो. ‘प्रसादम्’ किंवा ‘तिळगूळ’ स्वादाचे आईस्क्रीम सर्वांना हवेच असते असे नाही; पण आम्ही हे प्रयोग करत असतो म्हणून आमचा मान राहातो! चित्रपट उद्याोग किती वाढला तरी ‘आर्ट फिल्म’ आपला आब राखून असतातच ना? तसेच हे!’ अशा गप्पा मारल्यासारख्या मुलाखती देणारे कामत हे पहिल्या वर्षीची गुंतवणूक आणि त्या वर्षीचे उत्पन्न यांचे आकडेही सहज सांगत- साडेतीन लाख आणि पाच लाख! पण ‘दूध-फळे आणि साखर’ यांखेरीज एखादा घटक ‘नॅचरल्स’मध्ये असतो का? किंवा, दुकानांची फ्रँचायझी देताना कोणकोणत्या आधारे निवड करता? ती सारीच दुकाने टिकून कशी काय राहातात? ही गुपिते मात्र त्यांच्या कुटुंबातच, दोन मुलांकडेच राहिली आहेत (संदर्भ- लोकसत्ता, २१ मे, २०२४).

पत्नीची यशस्वी साथ

मंगळूरच्या एका खेड्यातून शिक्षण सोडून, मुंबईला भावाच्याच उपाहारगृहात काम करताना रघुनंदन व्यवहारज्ञानी झाले. वडील आंबेविक्रेते, त्यामुळे ‘खऱ्या, ताज्या फळांच्या चवीचे आईस्क्रीम’ करण्याची आकांक्षा त्यांना अगदी मिसरूड फुटल्यापासून होती. पण या इच्छेला पंख मिळाले ते २९ व्या वर्षी, अन्नपूर्णा यांच्याशी विवाह झाल्यावर! त्यानंतरची ‘नॅचरल्स’ची भरभराट आज ४०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

आज ‘नॅचरल्स आईस्क्रीम’ भारतातील सर्वांत मोठ्या आईस्क्रीम उत्पादक ब्रॅण्ड्सपैकी एक आहे. देशभरातील १५ शहरांमध्ये १६५ हून अधिक आउटलेट्स आणि १२५ पेक्षा जास्त चवींचे पर्याय उपलब्ध आहेत. रघुनंदन कामत यांनी फक्त चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपले स्वप्न उभे केलं. एकेकाळी छोट्या दुकानापासून सुरू झालेल्या ‘नॅचरल्स’ ब्रॅण्डची आजची ४०० कोटींची किंमत ही त्यांची असामान्य यशोगाथा सांगते. अल्पकालीन आजारानंतर रघुनंदन कामत यांचं गेल्या वर्षी मे महिन्यात निधन झालं. त्यावेळी त्यांचे वय ७५ वर्षं होते. मरावे परी… या उक्तीनुसार ते त्यांच्या ब्रॅण्डच्या रूपाने आजही अजरामर आहेत.