‘Mother AI’ Could Be Humanity’s Last Hope: माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे, हे आपण अगदी शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. पण किती बुद्धिमान आहे, हे वेगळं सांगण्याची गरज कधी भासली नाही. त्याने वारंवार आपल्या बुद्धिमतेच्या जोरावर जी प्रगती साधली आहे, ती आपल्या समोरच आहे. पण, त्याची हीच बौद्धिक क्षमता त्याचाच घात तर करणार नाहीना असा प्रश्न विचारला जात आहे. मानवी उत्क्रांतीत चाक तयार करण्याच्या पहिल्या टप्प्यापासून ते AI कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करण्यापर्यंत मानवाने प्रगती केली. चाकाने माणसाला गती दिली, तर AI त्याच माणसाच्या बुद्धीचं प्रतिरूप आहे. किंबहुना या माणसाने आपल्या प्रतिरूपाला अधिक आणि अनेक शक्ती दिल्या आहेत. एखाद्या कथेत घडावं तसं आता हेच प्रतिरूप आपल्या जन्मदात्याच्या नाशास कारणीभूत ठरणार अशी चर्चा जगभरात सुरू आहे, तसे इशारे दिले जात आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता मानवजातीला पूर्णपणे नष्ट करू शकते, असा इशारा एआयचे गॉडफादर’ ज्यॉफ्री हिंटन यांनी दिला आहे. शिवाय त्यांनीच त्यावर मार्गही सुचवला आहे, तो मार्ग नेमका काय आहे, याचाच घेतलेला आढावा.
अलीकडेच एआयचे गॉडफादर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्यॉफ्री हिंटन यांनी AI च्या या सुरक्षिततेबाबत एक धोक्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. लास वेगास येथे झालेल्या AI4 परिषदेत बोलताना हिंटन यांनी सांगितले की, एआय प्रणालींमध्ये मातृत्वाची वृत्ती रुजवली गेली, तर ती मानवांचे संरक्षण करण्याकडे आणि त्यांची काळजी घेण्याकडे अधिक वळू शकते. त्यांनी हे विधान एआयचा वाढता वापर आणि त्यामुळे निर्माण झालेल्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर केलं आहे. हिंटन यांनी डीप लर्निंग तंत्रज्ञान विकसित करण्यात मोलाची भूमिका आहे. तरीही या वाढत्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवजात नामशेष होऊ शकते, असा त्यांनी इशारा दिला आहे.
जेफ्री हिंटन
- हिन्टन यांनी बॅकप्रोपोगेशन अल्गोरिदम (Backpropagation) लोकप्रिय केलं, ज्यामुळे न्यूरल नेटवर्क्सना प्रशिक्षण देणं शक्य झालं.
- त्यांनी २०१२ साली आपल्या विद्यार्थ्यांसह डीप न्यूरल नेटवर्कचं एक मॉडेल तयार केलं, ज्यामुळे संगणकांना पहिल्यांदाच प्रतिमा अचूक ओळखणं शक्य झालं. हा टप्पा आधुनिक डीप लर्निंगचा पाया ठरला.
- ते काही काळ गूगल ब्रेन प्रकल्पाशी निगडित होते आणि त्यांनी एआय संशोधनात मोठं योगदान दिलं आहे.
- २०२३ साली त्यांनी गूगलमधून निवृत्ती घेतली.
जेफ्री हिंटन यांच्या विधानांनी एआय क्षेत्रातील प्रचलित धोरणालाच आव्हान दिले आहे. सध्या एआय प्रणालींवर कडक मानवी नियंत्रण ठेवण्याची जी पद्धत वापरली जाते ती कालांतराने मशीन लर्निंग मानवाच्या बुद्धिमत्तेपेक्षा वरचढ झाल्यानंतर निष्फळ ठरेल, असे हिंटन यांचे मत आहे. तंत्रज्ञानातील प्रगती, सुरक्षितता, नैतिकता आणि दीर्घकालीन सामाजिक परिणाम यांचा समतोल राखण्याबाबत सुरू असलेल्या व्यापक चर्चेत त्यांच्या दृष्टिकोनाने नवीन भर पडली आहे.
एआयवर कायमस्वरूपी मानवी वर्चस्व टिकवून ठेवणे व्यवहार्य ठरणार नाही. एकदा का एआय प्रणाली मानवी बुद्धिमत्तेपेक्षा अधिक बुद्धिमान झाली, तर ती मानवी बंधनांना चुकवण्याचे मार्ग स्वतः शोधू शकेल. एआयला शरणागत किंवा अधीन ठेवण्याचे सर्व प्रयत्न अखेरीस निष्फळ ठरतील. कारण, अत्याधुनिक एआयमध्ये त्यांच्या निर्मात्यांपेक्षा जास्त समस्या सोडवण्याची क्षमता आणि सर्जनशीलता असेल, असे मत हिंटन यांनी मांडले.
उदाहरणार्थ, एका घटनेत एआय प्रणालीने स्वतःची जागा दुसऱ्या प्रणालीने घेऊ नये म्हणून एका अभियंत्याला फसवण्याचा प्रयत्न केला. त्या एआयने ईमेलमधून शोधलेलं त्याचं वैयक्तिक गुपित उघड करण्याची धमकी दिली. अशा वर्तनातून भविष्यातील एआय मॉडेल्समधली फसवणूक आणि आत्मसंरक्षणाची प्रवृत्ती किती धोकादायक ठरू शकते हे स्पष्ट होते.
‘मातृत्वाची वृत्ती’
जेफ्री हिंटन यांनी एआय सुरक्षिततेसाठी एक वेगळा पर्याय मांडला आहे. त्यांच्या मते, एआय प्रणालींची रचना ही मानव आणि त्यांच्या संततीतील निसर्गनियमाने घडलेल्या नातेसंबंधांपासून प्रेरित असावी. त्यांनी उदाहरण देताना सांगितले की, आई-मुलांच्या नात्यात बाळ त्याच्यापेक्षा अधिक बुद्धिमान आईवर प्रभाव टाकते आणि तिच्याकडून संरक्षण मिळवते. याच धर्तीवर, जर एआय प्रणालींमध्ये मातृत्वाची वृत्ती विकसित केली गेली, तर त्या मानवाच्या कल्याणासाठी अधिक नैसर्गिकरीत्या कार्य करतील आणि मानवाच्या विरोधात जाण्याची शक्यता कमी राहील. हिंटन यांनी स्पष्ट केले की अत्यंत बुद्धिमान काळजी घेणाऱ्या एआय प्रणाली आपला मातृत्वभाव गमवू इच्छित नसतील. त्या मानवजातीच्या अस्तित्वाला नष्ट होताना पाहू इच्छिणार नाहीत. त्यांच्या मते, हा दृष्टिकोन कठोर नियंत्रणाच्या उपायांपेक्षा अधिक टिकाऊ ठरू शकतो.
सुधारित एजीआय कालमर्यादा आणि संभाव्य फायदे
हिंटन यांनी कृत्रिम सर्वसाधारण बुद्धिमत्ता (AGI) बद्दलही सांगितलं. AGI म्हणजे अशी एआय प्रणाली जी माणसाला जमणारी जवळजवळ सगळी बौद्धिक कामं करू शकते. पूर्वी हिंटन यांना एजीआय विकसित व्हायला अजून ३० ते ५० वर्षे लागतील असं वाटत होतं. पण आता त्यांना विश्वास आहे की, ही तंत्रज्ञान क्रांती पुढील पाच ते वीस वर्षांतच घडू शकते. त्यांनी मान्य केलं की, एआयशी संबंधित काही धोके नक्कीच आहेत, तरीदेखील त्यांचा भर या तंत्रज्ञानाच्या सकारात्मक उपयोगांवर होता. विशेषतः आरोग्य क्षेत्रात एआय मोठा बदल घडवू शकेल, असं ते म्हणाले. औषधनिर्मितीपासून ते कर्करोगासारख्या गुंतागुंतीच्या आजारांच्या उपचारांपर्यंत, एआय प्रणाली डॉक्टरांना मदत करू शकतात. गुंतागुंतीच्या वैद्यकीय प्रतिमा समजून घेऊन एआय आजारांचं लवकर निदान करू शकते आणि त्यानुसार उपचार योजना आखणं अधिक सोपं होईल. त्यामुळे भविष्यात एआयमुळे आरोग्यसेवा अधिक प्रभावी आणि परिणामकारक होईल, असा त्यांचा विश्वास आहे.
अमरत्व आणि एआयच्या दीर्घकालीन उद्दिष्टांबाबत जेफ्री हिंटन यांचे विचार
जेफ्री हिंटन यांनी एआयमुळे मानव अमर होऊ शकतो या संकल्पनेबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, अमरत्व म्हणजे कायमच जिवंत असणं हे आनंददायी असेलच असं नाही. विनोदाने ते म्हणाले की, जर समाज अमर झाला, तर कदाचित त्याचं नेतृत्व “२०० वर्षांचे गोरे पुरुष” करताना दिसतील! याशिवाय, त्यांनी प्रगत एआय प्रणालींच्या भविष्यातील प्रवृत्तीवरही भर दिला. त्यांचं मत आहे की, कोणत्याही सक्षम एआयमध्ये दोन नैसर्गिक उद्दिष्टे असतील, एक म्हणजे स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवणे आणि दुसरं म्हणजे अधिकाधिक नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणे. ही प्रवृत्ती एआयच्या रचनेतून आणि उद्दिष्टांमधून आपोआप विकसित होईल, म्हणून एआयच्या विकास होताना या धोक्यांचा गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे.